Cover

भूत असतं?

भूत हा शब्द जरी उच्चारला तरी लगेच मनात भिती निर्माण होते. खरंच भूतं असतात का? कोणाला खरंच त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आलाय का? उगाच मीठ मसाला लावून गोष्टी बनवल्या जातात, अख्यायिका सांगितल्या जातात, पण तथ्य काय आहे? कोणालाच काही माहित नाही. शास्त्रज्ञान्नुसार तर भूत म्हणजे मनाचे खेळ आहेत, मनाच्या आत १ लहानपणापासून दडलेली भिती आहे त्याचा तो परिणाम आहे. आजी आजोबा म्हणतात की भूत असतं, त्यांनी पूर्वी कोकणात बरेच वेळा बघितलं आहे. नेमकं कशावर विश्वास ठेवायचा आपण मग? मी आज जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या आयुष्यात घडलेली आहे आणि अगदी खरी आहे, अजिबात मीठ मसाला वगैरे लावलेली नाही. तो माझा प्रत्यक्ष अनुभव आहे.

आमच्या घरी लहानपणापासूनच कायम आम्ही लवकर स्वतंत्र (independent) होण्याच्या दृष्टीने संस्कार झाले. म्हणजे मी तिसरीत असताना मला आई वडिलांनी बसने शाळेला जायला शिकवलं, शाळा तशी लांबच होती तेव्हा. आणि परिस्थिती ही अशी होती की आई वडील दोघे ही नोकरी करत होते आणि दोघेही संगीतातले मोठे कलाकार असल्याने बरेच वेळा मैफिलींसाठी दौऱ्यावर जात असत. त्या दृष्टीने मी घरातला मोठा मुलगा असल्याने माझ्यावर साहजिकच लवकरात लवकर स्वतंत्र आणि समंजस व्हायची जबाबदारी आली. अगदी १-२ वेळाच दोघं माझ्याबरोबर शाळेत सोडायला आले असतील. नंतर मी माझा माझा व्यवस्थित जावू लागलो. आणि एकदा हे असं जमू लागल्यावर मग काय मी कुठे ही एकटा जबाबदारीने फिरू लागलो. अतिशयोक्ती नाही पण पाचवीत असताना तर मी अंधेरीहून सांताक्रुझला २ बसेस करून तबला शिकायला जात होतो. सगळं मस्त चालू होतं, मध्येच वडिलांच्या डोक्यात मला अजुन छान गुरूंकडे तबला शिकायला पाठवावं असं आलं. ते तसं सांताक्रुझ पेक्षा जवळ होतं पार्ला वेस्टला. बिस्कीट factory च्या मागे रेल्वे क्रॉसिंग ओलांडून जायचं होतं. अंधेरी आणि विलेपार्ले स्टेशन मधलं हे रेल्वे क्रॉसिंग होतं. तेव्हा मी सातवीत होतो, म्हणजे वयाने १२ वर्षांचा. म्हणजे जरी मी घरातून मोठा असलो, जबाबदारीने राहत आणि स्वतंत्र झालो असलो तरी कोवळं, नाजुक मन होतं ते. आठवड्यातून २ वेळा मी शाळेनंतर पोहोण्याचा क्लास संपला की साधारणपणे ५ वाजता तबल्याच्या क्लासला जात होतो. १-२ महिने झाले, छान सुरुवात झाली, दर वेळेस जेव्हा केव्हा रेल्वे क्रॉसिंग जवळ यायचो तेव्हा जवळुन ट्रेन बघायची उत्सुकता वाढायची. मग मी नेहेमी क्लासला जाताना १० मि. आधी निघायचो आणि रेल्वे क्रॉसिंग क्रॉस करून एका लोखंडी रॉड वर बसुन १ नंबरवरून जाणारी ट्रेन खुप जवळुन बघायचो. आपल्या जवळुन जाताना किती तो मोठ्ठा आवाज यायचा, रेल्वे रुळ कसे त्या वजनाने हलायचे हे बारीक निरीक्षण करायचो. त्या वयात म्हणा सगळीच मुलं हे करतात, एवढंच कशाला ट्रेन येण्यापूर्वी रूळावर १० पैश्याचं नाणं ठेवायचो, जोरात वेगाने ट्रेन त्यावरून गेली की ते बदललेलं नाणं भारतीय रेल्वे चं सौवेनिएर म्हणुन पाकिटात किंवा घरातल्या अभ्यासाच्या शेल्फ मध्ये जपून ठेवायचो. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधायचो तेव्हा, नाहीतर आत्ताची मुलं, मोबाईल, व्हिडिओ गेम्स च्या पलीकडे जग आहे हे दिसतच नाही त्यांना. असो, पिढी मधला फरक.

बरेच दिवस हा खेळ चालु होता माझा जवळुन ट्रेन बघायचा. एकदम असं काहीतरी रोमांचकारी वाटायचं. एके दिवशी असंच मी लवकर जावून त्या माझ्या जागेवर बसलो. १ नंबर वरून अंधेरी स्लो लोकल येत होती. ती गेली आणि मग घड्याळाकडे बघितलं तर अजुन माझ्या हातात १० मि. होती, म्हटलं १ अजुन लोकल ट्रेन बघु आणि मग निघुया क्लासला जायला. २-३ मि. नी लांबून बोरीवली लोकल येताना दिसत होती. एकीकडे माझं लक्ष घड्याळाकडे होतं आणि एकीकडे लांबून येणाऱ्या ट्रेनकडे. निघायच्या तयारीत मी उभा राहिलो आणि अगदी ट्रेन निघुन गेली की लगेच आपण पण पळायचं असं मी ठरवलं, अगदी उठुन उभा राहून तसा पवित्रा ही घेतला. मी माझ्या उजव्या बाजुला मान करून उभा होतो, डाव्या बाजूला ५ पावलांवर फाटक होतं. फाटकाच्या मागे कुठल्या तरी २-३ मुली शाळेतून सुटून तिकडे आलेल्या होत्या. बरीच इतर लोकं, स्कूटर्स आणि गाड्या फाटक उघडायची वाट बघत उभ्या होत्या. ट्रेन अगदी फाटकाच्या जवळ येत होती आणि मी उजव्या बाजुलाच बघत उभा होतो. तेवढ्यात फाटका पलीकडून अचानक आरडा ओरडा ऐकू आला, मी लगेच माझी मान त्या दिशेने फिरवली. ह्या सगळ्या हालचाली इतक्या झटकन होत होत्या तेव्हा. त्या लोकांकडे आणि मुलींना जोरजोरात ओरडताना आणि हात वारे करताना बघितलं, ते सगळे कोणाला तरी ट्रेनच्या समोर येत होतं म्हणुन ओरडून सांगत होत्या. माझं लक्ष पटकन क्रॉसिंग कडे गेलं. अगदी ट्रेन फाटकाच्या जवळ येत असतानाच माझ्या समोरच्या बाजूने १ म्हातारा माणूस गोंधळलेल्या अवस्थेत ट्रेन च्या विरुद्ध दिशेला बघुन क्रॉस करत होता. तो धावत ट्रेनला पाठमोरा झाला, त्याने त्या सगळ्यांचं ओरडणं ऐकलं आणि त्याला समजलं की ट्रेन त्याच्या पाठीमागुन येत आहे. काही उलगडयाच्या आतच तो मागे वळला आणि पुढच्या २ सेकंदात सगळं संपलं होतं. हे सगळं मी त्या वयात माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलं होतं. तो जेव्हा मागे वळला तेव्हा त्याची ती नजर मला अजूनही आठवते आणि मी अस्वस्थ होतो. त्याने त्याचा मृत्यू समोर बघतानाचा मी आणि तिथे जमली ते सगळेच साक्षीदार होते. तो जेव्हा मागे वळला तेव्हा तो पटकन ए sssss असं काहीतरी ओरडला होता आणि ट्रेनच्या वरच्या भागाला जो हुक असतो त्याने त्याची मान धडापासून वेगळी केली आणि ती वर हवेत उडाली. ट्रेनच्या खालच्या भागाला असलेल्या लोखंडी जाळीने त्याचे दोन्ही पाय कंबरेपासून तोडले आणि ते चाकाखाली येवून चिरडले गेले. मान आणि कंबर ह्या मधला भाग डावीकडे कुठेतरी झुडपात जावून पडला. हे सगळं मी इतक्या झटकन बघितलं होतं. आजुबाजूला उभ्या असलेल्या बायकांच्या ओरडण्याने तर अजुनच त्या सगळ्याची मला भिती वाटू लागली. पुढे ते सगळे तुकडे बघण्याच्या पलीकडे होणार ह्या विचाराने मी लगेच तिकडून काढता पाय घेतला. ह्या सगळ्यामुळे फाटकाच्या पलीकडे खुप गर्दी जमली होती. त्या सगळ्यातुन रस्ता काढुन जायचा मी प्रयत्न करत असतानाच समोर १ बाई प्रचंड मानसिक धक्क्यामुळे आक्रोश करत होती. ते बघुन मी अजुनच हादरलो आणि त्यावेळी आपण त्या लहानशा वयात बरंच काही भयानक बघितलंय असं वाटू लागलं. तिकडुन बाहेर पडताना डोकं सुन्न झालं होतं आणि अनाहुतपणे मी कर्ज सिनेमातली धुन गुणगुणु लागलो. आपणहून च ती धुन त्यावेळी माझ्या डोक्यात आली. पुढे ५-१० मि. चालत चालत क्लासपाशी आलो. सुचेना की लक्ष तरी लागणार आहे का तबल्यात? तरी बळे बळे गेलो, मास्तरांना २ मि. तच मी नॉर्मल नाही हे समजलं, त्यांनी मला आपुलकीने विचारलं, मी इतका भेदरलो होतो की काहीच सांगू शकलो नाही. पुन्हा ५ मि. ने त्यांनी विचारल्यावर मात्र मी बघितलेला सगळा प्रकार सांगितला. सुरुवातीला ते सहजपणे हसले आणि म्हणाले पहिलाच होता का हा अपघात तु असा उघड्या डोळ्यांनी बघितलेला? मी हो म्हटलं, ते म्हणाले, असे २-३ अपघात अजुन बघितलेस की सवय होईल तुला. मग काहीच वाटणार नाही. मी कशी प्रतिक्रिया देवू हेच कळत नव्हतं मला. ते सगळं इतकं ताजं होतं माझ्या मनात आणि मास्तर काय मला वेगळंच सांगत होते. मी अस्वस्थ बघून त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला मला रेल्वे क्रॉसिंग पार करून बस stop पर्यंत सोडायला सांगितलं. मला थोडं हायसं वाटलं. परतीच्या रस्त्यात ताईने मला त्या सगळ्याबद्दल विचारलं आणि म्हणाली तिने ही येताना काहीसं बघितलं. ते सगळे तिकडे लहानपणापासून राहत असल्याने त्यांनी त्यांच्या आयुष्यात कितीतरी असे अपघात बघितले होते, त्यामुळे त्यांना काही विशेष त्याचं वाटलंच नाही. रेल्वे लाईन क्रॉस करताना माझी नजर त्या झुडपाकडे गेली आणि त्या मागच्या १ तासात सगळं तिथलं पूर्ववत झालं होतं. इतर ट्रेन नियमितपणे चालु होत्या, जणु काही घडलंच नाही. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, आज त्या म्हातारयाचा शेवटचा दिवस होता त्याच्या आयुष्याचा त्या ठिकाणी. मी बस पकडून घरी आलो. डोक्यात आणि डोळ्यासमोर फक्त तेच दृष्य येत होतं सारखं. मानसिक धक्का बसला होता जबरदस्त मला. घरी आल्यावर हात पाय धुतले आणि आतल्या खोलीत जावून शरीराची घडी करून बसलो होतो. आई वडिल जे काही विचारात होते ते मला ऐकूच आलं नाही. आमचे अण्णा (आईचे वडील) तेव्हा राहायला आले होते. ते आणि माझे वडील बाहेर टीव्ही बघत बसले होते. वडिलांनी त्यांचा नियमित व्हिस्कीचा पेग भरला होता आणि ते त्यात मग्न होते. आई आत किचनमध्ये पोळ्या करत होती. मी काहीच उत्तर देत नाही बघून आई माझ्याजवळ आली आणि तिने माझ्याजवळ विचारपूस केली. काही सांगण्याच्या आतच मी धायमोकलून रडायला लागलो. आईला ही काहीच कळेना, तिने लगेच वडिलांना बोलावलं. मग आई वडिलांना सगळा प्रकार सांगितला. त्यावर आईने मला लगेच जवळ घेतलं, पण वडील मात्र माझी त्यावेळेला चेष्टा करायच्या मूडमध्ये होते. ते हसायला लागले आणि म्हणाले एवढंच ना अरे मला वाटलं तुलाच काही झालं की काय? मी रडतच होतो, त्यात ते अजुन चेष्टेने म्हणाले की तो कोण म्हातारा बाब्या येईल आज तुला धरायला स्वप्नांत. आई आणि अण्णा त्यांना जरासे ओरडले आणि म्हणाले त्या कोवळ्या मनाचा विचार करा ज्याने आज पहिल्यांदा इतका भीषण प्रकार उघड्या डोळ्यांनी बघितलाय. वडील बाहेरच्या खोलीत गेले आणि मी आई आणि अण्णांच्या कुशीत बसून रडत राहिलो. थोड्या वेळाने सावरलोय असा स्वत:चाच समाज करून जेवलो आणि झोपलो. वडिलांचे ते शब्द कानात होते की तो बाब्या रात्री येवून धरेल त्यामुळे त्या भितीने रात्रभर जागाच होतो. पूर्ण रात्र फक्त तेच सगळं दिसत होतं डोळ्यासमोर. बरेच वेळा वाटलं ही अजुन १ ट्रेन बघण्याचा हावरटपणा नडला. ती ट्रेन न बघताच गेलो असतो तर असा अडकलो नसतो. पण जे लिहिलेलं असतं तेच होतं म्हणतात ना ते हे असं. लहानपणी खेळताना कितीतरी वेळा खेळण्यातली जोडलेली माणसं झटकन तुटताना सहज बघितली होती, पण इथे तर १ जिवंत माणुस आपल्या समोर ५ सेकंदात जातो आणि ते ही अशा छिन्नविछिन्न रुपात, शरीराचे असे अनेक तुकडे झालेले, ५ सेकंदात त्याचं ह्या जगातलं अस्तित्वच नाहीसं झालेलं. कसं पचवणार होतो मी ते त्या वयात?

दुसऱ्या दिवशीपासुन दैनंदिन आयुष्य सुरु झालं, आतुन मला त्या सगळ्याची खुपच भिती बसली होती मनात. शाळेतुन येताना ज्या बस stop वरून बस पकडत असे तो त्या बिस्कीट factory जवळच असल्याने त्या बिस्कीट factory मधुन जो वास यायचा तो माझ्या डोक्यात बसला असल्याने त्यानेही मी खुप अस्वस्थ व्हायचो. पुन्हा दर बुधवारी तबल्याच्या क्लासला जाताना रेल्वे लाईन क्रॉस करताना त्या आठवणी असायच्याच कायम. खुप विचित्र झालं होतं तेव्हा आयुष. बरं मनात येईल तेव्हा पटकन कोणाशी मोकळं बोलता ही येत नव्हतं. मनात यायचं की आई वडील फार फार तर काय म्हणतील की अरे बरेच दिवस झाले त्याला, आता विसर आणि अभ्यासाकडे लक्ष दे. तरी पुढचे १-२ क्लासेस वडील आले होते मला क्लासला सोडायला. पण नेहमी त्यांना तसं जमणार नव्हतं, आणि मी तसं सांगितलं ही नसतं. लहानपणापासून खुप काही दुख: आतच पचवायची सवय मला. बुधवार आला की मला सकाळी शाळेत जातानाच खुप टेंशन यायचं. त्या सगळ्या आठवणींची नेहमी उजळणी होवूच नये असं वाटायचं. १-२ वेळा काहीतरी कारणं सांगुन क्लासला दांडी मारली, पुढचे १-२ क्लास मी तापच घेतला अंगावर. क्लासचं नाव घेतलं की लगेच मला ताप यायचा. आई वडिलांनी हे जाणून घेतलं आणि माझा तो क्लास अखेरीस १-२ महिन्यांनी बंद केला. खरंच तेव्हा मला एवढं हलकं वाटलं होतं काय सांगू? आता पुन्हा त्या वाटेला जायालाच नको ह्याच विचारानेच बरं वाटत होतं. तरी त्या वेळेस मी दर रविवारी अंधेरीवरून कुलाब्याला सकाळी ५ वाजता निघायचो नेव्ही च्या कोर्सला जायला. पहाटेला निघताना अंधाराची भिती वाटायला लागली मला, ट्रेनने जाताना त्या सगळ्याची आठवण तर व्हायचीच. खुप मित्र असायचे बरोबर तेव्हा पण मित्रांना हे सगळं काय सांगणार? पुन्हा आतल्या आत ठेवायचा स्वभाव. त्यानंतर कुठेही कोणी ट्रेनमधून पडलंय, त्यामुळे ट्रेन थांबलीय वगैरे कानावर जरी ऐकू आलं तरी मी दुर्लक्ष केल्याचा आव आणायचो. ते सगळं पुन्हा बघायला लागूच नये वाटायचं. घरात संगीतमय वातावरण असल्याने त्यात रमलो की मग बरेच वेळा त्या सगळ्याचा विसर पडायचा, पण मग पुन्हा त्या गोष्टी आठवायच्या एकांतात. कदाचित मी मोकळेपणाने तेव्हा घरातल्यांशी बोललो असतो तर फरक पडला असता असं नंतर वाटू लागलं पण धीरच होत नव्हता. सगळं एकटाच सहन करत बसलो पुढचे १-२ महिने. मग कालांतराने शाळेचा अभ्यास, इतर काही उपक्रमांनी व्यस्त होत गेलो आणि मग दिवसातून त्या गोष्टींची आठवण येण्याची frequency कमी होवू लागली. मग मी तसं रात्री झोपताना विचार करायचो की आज दिवसभरातून किती वेळा त्या प्रसंगाची आठवण झाली आणि मग थोडं समाधान वाटायचं. असाच पुढे १ महिना गेला आणि हळू हळू मी त्यातून बाहेर पडू लागलो.

एके दिवशी मी संध्याकाळी कुठल्या तरी क्लासला जायला घराच्या जवळच्या बस stop वर आलो. बसची वाट बघत होतो, आजूबाजूला त्या दिवशी बरीच गर्दी होती. मला हवी असलेली १ बस तेवढ्यात आली, मी त्या गर्दीत बसमध्ये चढायच्या तयारीत असताना अचानक मला कोणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात टाकुन बसमध्ये चढायचा प्रयत्न करत होतं, त्यामुळे मी थोडासा खाली खेचला जात होतो. बस काही निघाली नव्हती, पण मी वैतागून मागे वळून बघितलं आणि पूर्णत: मनातुन कोसाळूनच गेलो. मला ओढणारा तो माणूस खुप म्हातारा होता आणि जेव्हा मी मागे आलो आणि बस गेली तेव्हा मला आठवलं की हाच तो माणूस ज्याला मी ट्रेनने उडवताना बघितलं होतं. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता, अगदी हुबेहूब तोच माणूस. बस stop वर गर्दी ही होती, तरीही त्या गर्दीत मी त्याचं बारीक निरीक्षण करत होतो. त्याला जेव्हा ते समजलं तेव्हा तो बराच वेळ मला निरखू लागला. मी त्या वेळेला अनेक विचित्र तर्क वितर्क लावत बसलो. म्हणजे हा कदाचित त्यातुन वाचला असेल, त्याचे दोन्ही पाय फेन्गडे होते, त्यावरून ही वाटलं की तुटलेले पाय नंतर जोडून असे झाले असतील, वगैरे वगैरे. पण आतुन मी प्रचंड हादरलो होतो. पुढे आलेल्या बस मध्ये तो ही चढला आणि लगेच ३-४ बस stop नंतर उतरला. मला वाटलं की इतक्या दिवसांनी मी त्यातुन बाहेर आलोच होतो की नेमकं हे असं काहिसं घडलं आणि पुन्हा डोक्यात वेगवेगळे विचार डोकावू लागले, ज्याने मी पुन्हा आणखी जास्त अस्वस्थ झालो. आमच्या घराजवळ कुठे येत असेल नेहमी हा ह्याचा माझा मग जासूसी खेळ सुरु झाला, जरी मला तो समोर आलेला ही अजिबात आवडत नव्हतं. अगदी हुबेहूब माणूस होता तो, मला तर अगदी खात्रीच पटली होती की तोच होता तो, जो आता भूत होवून आला असेल. वडील म्हणाले होते ते आठवलं, की तो मला त्रास द्यायला येणार ते. डोक्यावरचे केस गेलेले, मागे अर्ध चंद्र टक्कल, दात सगळे ओबड धोबड, खूपच वय, अंदाजे ७०, पाय फेन्गडे आणि चाल अगदी तशीच जसा तो ट्रेन समोर धावून आला तसा तेव्हा. मलाच का ह्या सगळ्याचा देव त्रास देतोय असंच तेव्हा खुप वाटायचं. एकीकडे तो कुठे काम करतो त्याची माहिती मिळवावीशी वाटायची आणि एकीकडे तो कधीही पुन्हा प्रत्यक्ष समोर येवूच नये असं वाटायचं. बरं पुन्हा आता हे सगळं कोणाला सांगितलं जरी असतं तर कोण विश्वास ठेवणार होतं? मला हळू हळू खात्री पटू लागली की हे भूत असावं आणि कदाचित मला छळायला आलं असावं, कारण मी त्याला मरताना प्रत्यक्ष बघितलं होतं. पण मला ते सगळं दृश्य आपणहून च दिसलं होतं ना मग माझा काय त्यात दोष? असे कितीतरी विचार सतत येत होते माझ्या त्या कोवळ्या मनांत त्या वेळेला. पुन्हा काही दिवस जरा विसर पडावा असे गेले आणि पुन्हा अचानक मी शाळेला जात असताना तो दुपारी एका बसमधून उतरला आणि माझ्या समोरून गेला. त्याला अचानक बघुन माझ्या मेंदुतून अचानक वीज चमकल्यासारख झालं आणि पुन्हा मला अतिशय त्रास होवू लागला. कशातही लक्ष लागेना, कुठले तरी भयंकर विचार मनांत येवू लागले. त्याच्या अपघातानंतर मला आपणहून कर्ज सिनेमातलं गाणं च का आठवावं? त्या धुन चा आणि पुनर्जन्माचा काही खरंच संबंध आहे का? डोकं बरेच वेळा सुन्न व्हायचं. आजी कधी यायची तेव्हा मी भूतं कशी ओळखायची वगैरे विचारायचो. तिने सांगितलं होतं की भूतांचे पाय उलटे असतात, मग काय विचार केला की पुन्हा तो दिसलाच म्हातारा तर त्याचे पाय बघेन आणि मोकळा होईन. काही दिवसांनी तो कुठे काम करतो ते मला समजलं. मी एकदा शाळेतून येत असताना एका केमिस्ट शॉप वरून जाताना तो म्हातारा त्या दुकानात बसलेला मला दिसला. मी पटकन तिकडून गेलो होतो त्यामुळे आणि तो तेव्हा तिकडे गिऱ्हाईक सोबत बोलत होता, त्याने मला बघितलेलंच नव्हतं. मग काय दुसऱ्या दिवशीपासून तिकडून जायचा रस्ता ही बदलला, मित्र बरोबर असले की काही कारणं सांगायचो नवीन रस्ता घेण्यासाठी. किती लांब रस्ते शोधायचो जा ये करायला, खरं म्हणाल तर एका अर्थी मी वेडाच झालो होतो. मानसिक धक्क्यात वावरत होतो मी, एकटाच. एकदा मी विचार केला की बिनधास्त त्याच्या समोरच जायचं, काहीच घाबरायचं नाही. १ मित्र होता, त्याला काही ओषध घ्यायचं होतं, म्हणुन त्याच्याबरोबर बिनधास्त त्या दुकानात गेलो. मी टक लावून त्याच्याकडे बघत होतो, जेणेकरून मी अजिबात घाबरलेलो नाही हेच मला त्याला दर्शवून द्यायचं होतं. आश्चर्य म्हणजे मी जितक्या वेळ त्याच्या डोळ्यात डोळे घालुन बघत होतो, तेवढा वेळ तो ही एकटक माझ्याकडे बघत होता. मग मात्र माझी पाचावर धारण बसली होती. तो दुकानात जेव्हा आत बाहेर करत होता तेव्हा मी त्याचे पाय बघण्याचा खूप प्रयत्न केले, पण त्याची pant खुप मोठी होती आणि त्याने त्याचे पाय सगळे झाकले गेले होते. तो जेव्हा कोणाशी बोलायचा तेव्हा त्याचे विचित्र, ओबड धोबड दात बघून वाटायचं की इतका जबरदस्त फटका त्याला त्याच्या जबड्यावर बसला म्हणून कदाचित दात सगळे असे झाले असावेत. मी सगळ्याचा अर्थ त्याचा नक्की पुनर्जन्म किंवा ते भूत असावं असाच लावत होतो. कारण तशीच सगळी परिस्थिती होती ती. साधारणपणे १ वर्ष हे सगळं चालु होतं, पुढे काही महिन्यांनी तो ही गायब झाला, आणि मी ही हळू हळू त्यातुन बाहेर येवू लागलो. हळू हळू मोठा होत होतो आणि इतर गोष्टींमध्ये रमू ही लागलो. दहावीच्या अभ्यासात व्यस्त होत गेलो. त्यानंतर अनेक असे छोटे मोठे अपघात बघितले, मग भिती ही कमी होवू लागली. प्रत्येक वेळेस त्या पहिल्या भीषण अपघाताची आठवण तर व्हायचीच.

आता इतक्या वर्षांनी असं वाटतय की तेव्हा जर मी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुक्ष्म घरी सांगितल्या असत्या तर मला नक्कीच मानसोपचारतज्ज्ञ बघायला लागले असते. पण मी सगळं ते त्या वयात पचवत आलो. मनावर तो अपघात इतका कोरला गेलाय, आत मनात खुप खोलवर त्याची पाळमूळ रुजली आहेत की आज २८ वर्षं झाली त्या घटनेला परंतु आज ही तो अपघात आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या ताज्या आहेत मनांत, ह्याचा अंदाज तुम्हाला आला असेलच सगळी गोष्ट वाचून. मग काय वाटतं भूत असतं की नाही?

Impressum

Tag der Veröffentlichung: 22.01.2018

Alle Rechte vorbehalten

Nächste Seite
Seite 1 /