Cover

संघर्ष

 

आम्ही सगळे ३ ऑक्टोबर २००८ मध्ये ह्युस्टनला उतरणार होतो. सगळे म्हणजे मी, माझी बायको दिप्ती आणि माझा पावणे तीन वर्षांचा मुलगा आयुष. येण्याच्या आदल्या रात्री मला माझ्या mentor मित्राचा, धीरेन रुपारेल चा फोन आला. तो मला म्हणाला की तो मला एअरपोर्टवर घ्यायला येईल. लहानपणापासुन आपल्यावर असे काही संस्कार असतात की आपण लगेच कोणाची मदत घेत नाही. म्हणजे तसे आपण आधी आढे-वेढे तर घेतोच. मी जरा जास्तच उत्साहात होतो आणि त्याला त्या उत्साहात म्हटलं ही की जन्म इकडे मुंबईत पार्ल्याच्या गल्ली-बोळात काढलाय, मी सगळं करेन व्यवस्थित, तु त्रास वगैरे नको करून घेवूस, मी कॅब वगैरे बोलावेन तत्सम. त्याला ह्या सगळ्याचा अंदाज होता आणि तो ही मुंबईतलाच वाढलेला होता. माझ्याहुन १ वर्ष अगोदर तो ह्युस्टनमध्ये आला होता, त्यामुळे त्याला जास्त अनुभव होता माझ्यापेक्षा. तो म्हणाला तु बायको आणि लहान मुलाला घेवून येतो आहेस, मी येतो न्यायला तुला, तुझ्या apartment ला (सदनिका) तुला सोडतो आणि मग तुला काय तुझ्या जीवावर उडया मारायाच्यात त्या मार. आम्ही एअरपोर्टवर उतरलो आणि आम्हाला लगेच धीरेन भेटला. अमेरिकेत पोहोचल्या पोहोचल्या आपले जेवणाचे हाल नकोत ह्या विचाराने आम्ही भरघोस धान्य घेवून आलो होतो. माझे वडील आमच्या आधी ही बरेच वेळा अमेरिकेत येवून गेलेले असल्याने आम्ही आमच्या bags भरताना आम्हाला खुळे असल्यासारखे हसले होते. त्यांचं म्हणणं हेच होतं की बाकी काही ही घेवून जा पण आजकाल अमेरिकेत सगळं काही मिळतं, तर एवढं धान्य न्यायाची काय गरज? पण आम्ही काही त्यांचं तेव्हा ऐकलं नाही आणि ह्या एवढ्या bags बघुन धीरेन देखील तिकडे चक्रावला. त्यात एक bag खालून एका कोपऱ्याला फाटल्याने त्यातुन बरेचसे तांदूळ इकडे तिकडे लग्न-सभागृहामध्ये अक्षतांचा सडा पडावा तसे पसरले होते. एक रुमाल कोंबला आणि त्यांचं बाहेर पडणं त्या घाई गडबडीत कसं तरी बंद करू शकलो. सगळ्या bags धीरेनच्या होंडा accord मध्ये आत बाहेर, पुढे मागे अशा अथक प्रयत्नांनी बसवल्या. आम्हाला थोडीफार जागा शिल्लक होती बसायला ह्या सामनामधून. धीरेन ड्रायव्हर सीटवर (चालकाच्या आसनावर) आणि मी त्याच्या बाजुच्या सीटवर बसलो. आयुष आणि दिप्ती मागे बसले. आयुष साठी child seat वगैरे काही धीरेनने आणली नव्हती कारण त्याला सामानाचा अंदाज नव्हता. रस्त्याला लागण्याआधी apartment चा पत्ता मी धीरेनेला दिला, त्याने तो त्याच्या GPS मध्ये टाकला आणि काहीतरी ४० मि. अंतर दाखवत होता. अमेरिकेत आम्ही पहिल्यांदाच आलो असल्याने गाडीतुन आजुबाजुला बघताना प्रत्येक वेळेस आश्चर्याने भुवया वर जात होत्या. एवढी स्वच्छता रस्त्यावर आयुष्यात बघितली नव्हती आम्ही. आजुबाजुच्या गाड्यांचा भरधाव वेग बघुन मनात आलं की इकडे आलोय मोठ्या हुशाऱ्या करत पण गाडी चालवणं एवढ्या वेगाने जमलं म्हणजे मिळवलं. गाड्यांना बघण्याच्या नादात आयुष सीटवर मागे उभा राहिला, लगेच त्याला धीरेनने खाली बसायला सांगितले. इकडले नियम भलतेच कडक, त्याला काही कळेना की खाली का बसुन राहायचं? मुंबईला आमच्या गाडीत तो बरेचदा पुढच्या सीटवर ही उभा राहत असे. त्याला पहिला धक्का बसला असावा नवीन शहराचा, देशाचा. इकडे पोलीस (cops) child seat मध्ये लहान मुलं नसतील तर जबर दंड (fine) आकारतात, तेव्हा कसं तरी आयुषला सीटवर बसायला भाग पाडलं. १-२ पोलीस च्या गाड्या ही बघितल्या जाताना, टोलेजंग इमारती बघितल्या. सगळं काही चकाचक आणि सगळे एकदम शिस्तीत गाड्या चालवत होते. लेनची शिस्त राखा ह्या सूचनेची तेव्हा प्रकर्षाने आठवण झाली आणि मुख्य म्हणजे ती अंमलात आणली जातेय इकडे ह्याचंच केवढं ते कौतुक आम्हांला. पाऊण एक तासात आम्ही आमच्या apartment building gate पाशी (सदनिकेच्या इमारतीच्या दाराशी) पोहोचलो. इकडे सगळं automatic (स्वयंचलित) कारभार, तरी देखील ह्या दाराशी एक security guard(सुरक्षा रक्षक) बसलेला होता त्याच्या स्वतंत्र खोलीत. गाडी आल्या आल्या तो बाहेर आला, धीरेनचं driving license (चालक प्रमाणपत्र) बघितलं, त्याच्या वहीत नोंद केली आणि दार उघडलं. आतुन इमारत एकदम चकाचक आणि स्वच्छ होती. आमचं नशीबच असलं खडतर होतं की आमची रुम तिसऱ्या मजल्यावर होती. त्यातल्या त्यात बरं हेच की apartment च्या जवळच तिसऱ्या मजल्यावर parking lot (वाहनतळ) होता. तिकडे गाडी लावली आणि apartment number (सदनिकेचा क्रमांक) शोधू लागलो. तो मिळाला पण आता चावी कशी मिळवावी ह्याचं कोडं मला काही उलगडेना. इकडे धीरेन चा अनुभव कामाला आला. मला भारतातून निघताना जी सगळी माहिती दिली होती त्यात त्यांनी चावी मिळवायला १ security code (सुरक्षा कोड) दिला होता, तो काढला आणि मग आतल्या कप्प्यातून चावी काढली. कोड मिळाल्यावर सगळं कोडं सुटलं. चावीने घर उघडलं आणि आत गेल्या गेल्या आम्ही सगळे थक्कच झालो. त्या घरात सगळ काही होतं, एकदम झक्कास होतं सगळं. पटापट सामान सगळं घरात आणलं. जरा धीरेन च्या देखरेखीखाली सगळ्या गोष्टी बघितल्या, त्याने बऱ्याच टिप्स दिल्या. धीरेन म्हणाला त्याच्या घरी चला आणि आराम करा. मी म्हटलं, एवढं केलंस तु आमच्यासाठी, आता ह्यापुढे आम्ही आमचं manage करु. लगेच त्याने विचारलंच की कसं करणार आहेस? गाडी आहे का तुझ्याकडे? ह्या शहरात तुझ्याकडे गाडी अत्यंत गरजेची आहे. तो म्हणाला तुला हळुहळु कळेल कशी लाइफ-स्टाईल (जीवनमान) आहे इथली ते. मग थोडासा भीतीदायक अंदाज घेवून आम्ही त्याच्या घरी गेलो. आमच्यापासून त्याचं घर अगदी १० मि. अंतरावर होतं, तसं miles मध्ये ७-८ असावं अंदाजे. तेव्हा तर miles मधल्या अंतरांची सवय ही नव्हती. धीरेन ची बायको फाल्गुनी आणि मुलगी क्रिशा होते घरी. आयुषहुन १ वर्षांनी ती मोठी. घरी गेल्या गेल्या वरण भात खाल्ला. प्रवासानंतर खुप छान वाटलं वरण भात जेवून. अंगं पूर्ण आमलं होतं २१ तास प्रवासाने. मग बसलो आम्ही गप्पा मारायला, आयुष आणि क्रिशा ची चांगली गट्टी जमली. दिप्तीला प्रचंड झोप येत होती, ती मध्येच गप्पा मारताना खाली पडत होती. लगेच फाल्गुनी ने आम्हाला दोघांनाही १-१ कोका कोला टीन आणुन दिला. आम्ही carbonated ड्रिंक्स अजिबात घेत नाही पण तरीही ती अवेळी झोप टाळायची असल्याने अर्धा टीन प्यायला. ते दोघंही नवरा बायको आम्हा दोघांनाही कुठल्या न कुठल्या प्रकारे जागं ठेवत होते. कारण एकदा का आम्ही झोपलो असतो तर मग त्या चक्रातुन लगेच बाहेर नसतो आलो. गंमत म्हणजे आम्ही भारतातुन ३ ऑक्टोबर ला निघालो आणि वेळेच्या फरकानुसार ३ ऑक्टोबरलाच अमेरिकेत पोहोचलो. म्हणजे प्रवास सुरु झाला मध्यरात्री आणि इकडे पोहोचलो दुपारी २१ तासांनी. हे गणित शरीराला मान्य नसल्याने ते साहजिकच मग पुढचे २-३ दिवस त्रास देत राहतं. दिप्तीला आम्ही मध्ये मध्ये हाक मारुन उठवायचो, तिला अतिशय असह्य झाली होती झोप. कसे तरी २-३ तास आम्ही ढकलले आणि मग धीरेनच्या गाडीतुन आम्ही सगळे जण बाहेर wal-mart ला गेलो. त्यांनी त्यांची शनिवारची grocery करून घेतली आणि आम्हाला त्या निमित्ताने हे सगळं पाहायला मिळालं. तिकडूनच आम्ही रात्री Chipotle ला जेवायला गेलो. आयुष्यात पहिल्यांदा चांगलं मेक्सिकन जेवण जेवलो आणि खुपच आवडलं. burrito bowl खाताना मला माझ्या लहानपणची आठवण आली. मी लहान असताना बरेचदा पानातलं सगळं संपवायचं असल्याने भात, भजी, आमटी, कोशिंबीर सगळ्याचं कालवण करून जेवायचो शेवटी. त्या आठवणीने हसू आलं. मनांत म्हटलं तो लहानपाणी मी जो प्रकार करायचो त्याला burrito म्हणतात तर. आम्हाला सगळ्यांना तो प्रकार खुप आवडला होता. रात्री धीरेनने आम्हाला आमच्या apartment वर सोडलं. उद्या पुन्हा लंचला घ्यायला येतो म्हणाला. आम्हाला खुपच awkward वाटत होतं, पण इकडे हे सगळं अगदी नॉर्मल आहे असं म्हणुन तो आमची समजूत काढत होता. आम्हीही लगेच हो म्हणुन मोकळे झालो. आयुष घरी पोहोचण्याआधीच गुडुप झाला होता. त्याच्या त्या वयाच्या मानाने खूपच दमला होता तो. धीरेन निघून गेल्यावर मी जरा बाल्कनी मध्ये जावून आकाशाकडे एका शांत नजरेने बघत बसलो होतो. अमेरिकेला केव्हापासुन यायचं माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झाल्याचं समाधान होतं मला. दिप्ती सुद्धा बाहेर आली आणि आम्ही दोघांनी तिकडे एकमेकांना मिठी मारली आणि पुढील नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. थोड्या वेळातच आम्ही दोघेही बेडमध्ये गुडुप झालो. सकाळी चांगले ९ पर्यंत झोपलो, आयुष आधीच उठुन बसला होता. सगळं आवरल्यावर आयुषला T.V. वर काहीतरी cartoon लावून दिलं. दिप्तीने छान नाश्ता केला कांदे पोह्यांचा. दुपारच्या जेवणाला पिठलं भात ही केलं. हे सगळं का होवू शकलं तर आम्ही जी सगळी grocery च आणली होती ना त्यामुळे. प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी ते ही अमेरिकेत आम्ही पिठलं भात जेवलो होतो, याहून ते सुख कुठलं अजुन? फोन ची काही सोय नसल्याने धीरेन घायला आला पण मग आम्हीच केलेला पिठलं भात त्याच्याकडे घेवून गेलो. पुन्हा आदल्या दिवशी सारखी ही देखील दुपार गप्पांमध्ये गेली. आम्ही सगळे फक्त पुढे इकडे काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत settle व्हायच्या दृष्टीने तेच बोलत होतो. नाही म्हटलं तरी आम्हाला दोघांनाही तसं थोडंसं टेंशन आलं होतं, पण मनाने strong असल्यामुळे बघु पुढे या विचाराने शांत व्हायचो. तो शनिवार रविवार असाच निघून गेला. सोमवारी मला ऑफिसला रिपोर्ट करायचं होतं. सुदैवाने धीरेन ही पुढचे काही दिवस downtown च्या ऑफिस ला जाणार असल्याने मला तो सकाळी घ्यायला आला. दिप्ती आणि आयुषचा निरोप घेवून मी ऑफिसला गेलो. आजुबाजुचा परिसर बघुन चकित झालो होतो मी. किती ती स्वच्छता, टापटीप सगळं. ऑफिसमध्ये ओळखी झाल्या, joining formalities झाल्या. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता माझा इंटरव्ह्यु HP बरोबर होता. Telephonic असल्याने ऑफिसमधुनच घेणार होतो. पहिलाच दिवस असल्याने मला लगेच काही laptop मिळाला नव्हता. इंटरव्ह्यु खुप मस्त झाला आणि मी खुपच खुश होतो. तो दिवस मग तसाच गेला, मी आणि धीरेन घरी जायला निघालो. त्याने नेहमीप्रमाणे मला घरी सोडलं. आयुष आणि दिप्ती पूर्ण कंटाळलेले होते. साहजिकच आहे म्हणा दिवसभर काय करत होते टी.व्ही. व्यतीरिक्त? पुढच्या २ दिवसांतच HP कडून प्रोजेक्ट joiningचं (रुजू होण्याचं) confirmation (पुष्टीकरण) आलं. लगेच त्या दिवशी मी त्या नवीन ऑफिसचा पत्ता गुगल नकाशावर शोधू लागलो. भारतात आत्तापर्यंत कधी असा पत्ता शोधायची वेळ न आल्यामुळे कसा रस्ता बघायचा याचा अंदाजच नव्हता. मी पत्ता टाकल्या टाकल्या ते अंतर मला खुपच जवळ वाटलं कारण zoom out mode मध्ये पत्ता आला होता, बरंच zoom in केल्यावर कळलं की तो परिसर माझ्या घरापासून खुपच लांब म्हणजे जवळजवळ २५-३० मैल दूर होता. बरं आता इकडे जायचं कसं? गाडी तर हाताशी नाही, धीरेन काही दररोज येवू शकत नव्हता. नेहमीप्रमाणे नवीन भारतीय माणसाला कायम मदत हवी असते तशाच अविर्भावात मी धीरेन कडे गेलो, आणि काकुळतीला येवून त्याला म्हटलं, कसं जायचं ते सांग वगैरे वगैरे. तो ही मला मी independant लवकर झालो पाहिजे म्हणुन लगेच म्हणाला, आलायस ना ह्या देशात, स्वत: शोधून काढ कसं जायचंय ते. मोठं challenge च होतं माझ्यापुढे पण घेतलं मी आणि पुढच्या अर्ध्या तासांत ३ connecting बसेस घेतल्या की ऑफिस ला पोहोचू शकतोय हे हुडकून काढलं. माझ्या aparatment पासून १५ मि. चालत ९ नं. बसने downtown ला जायचं, तिकडुन २ blocks चालत दुसऱ्या बससाठी जायचं. १०८ नं. च्या बसने veteran memorial आणि FM १९६० ला जायचं आणि मग रस्ता ओलांडून ८६ नं. च्या बसने HP च्या कॅम्पस ला उतरायचं. तिकडुन अखेरीस १५ मि. चाललं की आलं ऑफिस. २ दिवस हातात होते प्रोजेक्ट सुरु होण्याआधी, तेव्हा दुसऱ्या दिवशी धीरेन ने मला social security च्या ऑफिसला जावून कार्डसाठी apply करायला सांगितलं. आता ते ही ऑफिस तसं आमच्या downtown च्या ऑफिसहुन काही अगदी जवळ नव्हतं. लगेच गुगल maps वर पत्ता टाकून कसं जायचं ते बघितलं. १२-१५ blocks चाललो की येणार होतं, पण मग मेट्रो ट्रेन ही त्याच्या जवळ जाते हे समजलं आणि मग त्या ऑफिसला मी त्या भर दुपारी जावून आलो. social security number चं application केलं आमच्या तिघांसाठी. ह्या देशांत प्रत्येक व्यक्तीला हा number असणं अतिशय आवश्यक. ते कार्ड नसेल तर कुठल्याच गोष्टी इकडे होत नाहीत हे समजलं. म्हणजे अगदी पगार ही होत नाही, त्यामुळे ते apply करणं आणि ते लगेच येणं आमच्यासाठी खुपच महत्वाचं होतं.

HP ला जायचा दिवस उजाडला. पहिलाच दिवस देवाचा ह्या ठरलेल्या नियमाने मी घरपासून थेट ऑफिसला कॅब ने जायचं ठरवलं. yellow cab दारात बोलावली. भारतातून येताना तिकडल्या ऑफिसमधून २००० डॉलर्स advance मिळाले होते सुरुवातीच्या खर्चाकरिता. पाऊण तासाचं अंतर होतं ते, पोहोचेपर्यंत मनात अनेक भलते सलते विचार येत होते. कॅब ड्रायव्हर बरा असेल ना, लुटणार वगैरे नाही ना वगैरे वगैरे. एकदाचा मी ऑफिसला ८ च्या दरम्यान पोहोचलो. ७० डॉलर्स झाले कॅबचे. त्यावेळेला ७० x ५० म्हणजे ३५०० रु. झाले होते कॅबचे. सुरुवातीला सगळेच आपण भारतातून अमेरिकेत येतो तेव्हा हा गुणाकार करतच असतो पुढील बरेच महिने. मला अजूनही आठवतंय walmart मधुन तेव्हा १ gallon fruit punch juice आणला होता ४ डॉलर्स ना. इतका टुकार होता तो, त्याची चव म्हणजे एखाद्या कडू कफ सिरप सारखी होती. दिप्ती आणि आयुषने आधीच त्यातुन हात वर केले होते, पण मग एवढा कसा लगेच फेकून द्यायचा म्हणून मी नित्यनियमाने तो पुढचे २५ दिवस पित होतो. दररोज ऑफिसमधून आलो की १ च घोट नाक बंद करून औषधासारखा पित होतो. हा गुणाकार डोक्यातून जायला बराच वेळ लागतो साधारणपणे. शेवटी अगदी विटलो तेव्हा मनावर दगड ठेवून १-२ घोट उरलेला juice स्वाहा केला.

८:३० ला आमच्या ऑफिसमधले सगळे त्या लॉबी मध्ये भेटणार होते. मी त्यामुळे बराच वेळेत पोहोचलो होतो. १०-१५ मि.त सगळे आले आणि आम्ही client टीम ला भेटायला गेलो. खुपच मोठ्ठं ऑफिस होतं ते. चालत चालतच जायला १० मि. लागली. सगळ्या टीमची ओळख झाली, मी टीम लीड होतो त्यामुळे मला सगळ्यांची विशेष ओळख करून घ्यायची होती. मग आमच्या सेल्स executive Sharon ने सगळ्यांना लंच ला घेवून जायचं ठरवलं. अमेरिकेत तो माझा पहिला official लंच होता. जय नरसिंहन हा आमचा प्रोजेक्ट लीड होता. तो चेन्नई चा होता, त्यामुळे तसा मी बराच कम्फर्टेबल झालो. मेक्सिकन रेस्टॉरंट मध्ये जायचं ठरलं. मी जरी फक्त चिकन खात असलो तरी म्हटलं इकडे सगळ्यांसमोर व्हेज च घ्यावं. स्पिनाच एन्चीलाडा मागवलं, पोट फुटेल एवढं आणलं होतं, मी काही सगळं संपवूच शकलो नाही. लहानपणापासून ताटातलं काही टाकायचं नाही ह्या संस्कारात वाढलो असून ही ते तेव्हा थोडंसं टाकावं लागलं होतं. जय ने मला तिकडून त्याच्या कार मधुन ऑफिसला नेलं आणि मग आम्ही बरंच बोललो. त्याने मला तेव्हा पहिला प्रश्न विचारला होता की तुझी इथली सेटल व्हायच्या दृष्टीने priority काय आहे? मी १ सामान्य भारतीयाप्रमाणे साजेसं उत्तर दिलं, की पहिलं छान सगळ्या सोयी असलेलं घर मग गाडी. तो हसला आणि म्हणाला इकडे अमेरिकेत तुला पहिली गाडी पाहिजे आणि मग घर. किती फरक ना लाईफ स्टाईल मध्ये तो? संध्याकाळी मला जय ने आमच्या टीम मधल्या बिन ला मला माझ्या घरापर्यंत सोडायला सांगितलं. पहिला दिवस हा असाच बराचसा टाइम पास मध्ये गेला. मी संध्याकाळी apartment मध्ये पोहोचलो तेव्हा दिप्ती आणि आयुष खालीच फिरत होते, काय करणार म्हणा दिवसभर? किती वेळ तो अमेरिकन TV बघणार? ना कुठली मराठी सिरीयल की हिंदी सिनेमे. पहिला दिवस ते दोघे ही पूर्ण कंटाळले होते. जेवणं झाली आणि तो दिवस असाच संपला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चक्र. सकाळी ५ वाजता घर सोडा, ३ बसेस करून ८ ला ऑफिसला पोहोचा. खुप धावपळ झाली दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना. एकाला एक लागून बसेस असल्यामुळे जरा उशीर झाला की एखादी बस चुकायची मग थांबा १५ मि.

ऑफिसमध्ये लंच च्या वेळेला धम्माल च आली. माझ्याबरोबर १ तेलगु मुलगी सुद्धा होती त्या प्रोजेक्ट मध्ये, हमसिनी तिचं नांव. ती गडबडीत मला जेवायला घेवून जायला विसरली. मी over confidently कॅफेटेरिया मध्ये गेलो. मला वाटलं एवढं मोठ्ठं ऑफिस, कॅफेटेरिया तर खुपच मोठ्ठा आणि भरपूर variety मिळेल फूड ची. कसलं काय दरिद्री कॅफेटेरिया होता तो. १ च मोठ्ठा counter होता आणि वेगवेगळे पदार्थ तिकडे त्या काचेच्या कंटेनर मध्ये होते. मी म्हटलं काही माहीत नाही म्हणुन आपलं साधं sandwich घ्यावं. म्हणुन मग मी चीज बर्गर घेतलं. मस्त मिटक्या मारत खाल्लं आणि वर माझ्या डेस्कवर गेलो. तिकडे थोड्या वेळाने हमसिनी आली आणि म्हणाली अरे तुझा इथला पहिलाच दिवस आणि मी विसरलेच तुला लंच वगैरे मिळाला ना बरोबर ते बघायला. मी ही अगदी हुशारी करत म्हटलं की झालं सगळं मस्त, नो प्रॉब्लेम. तिने मग विचारलं की मी काय घेतलं कॅफेटेरिया मधुन. जेव्हा मी म्हटलं चीज बर्गर तेव्हा ती उडालीच आणि म्हणाली अरे त्यात बीफ असतं. २ मि. मी ही ऐकून गार झालो पण काय करणार अनवधानाने तसं झालं होतं. मी जास्त काही मनाला लावून न घेता कामाला लागलो. संध्यकाळी घरी जायला ५ वाजता निघालो. पहिली बस पकडून १०८ बस पकडायला निघालो. दुसऱ्या बस ने डाऊनटाऊन ला आलो, गंमत म्हणजे जिकडे सकाळी बस पकडली होती तो area पण संध्याकाळी ओळखु येत नव्हता. अंधार ही होत होता. मुंबई पुण्यासारखं अजिबात नाही, जाताना येताना बस चे stop समोरासमोर वगैरे. इकडे सगळं भलतंच. २ मि. भिरभिरलो. काहीच सुचेना काय करावं, रस्त्याला कुणाला काही विचारवं तर कुणीच दिसेना बराच वेळ. शेवटी १ बस ड्रायव्हर ड्युटी संपवून घरी जात होता त्याला विचारलं तेव्हा समजलं. १-२ blocks उलट्या दिशेला जाऊन तो घरी जायच्या बस चा stop दिसला. १०-१५ मि. त बस आली. १० मि. चा च प्रवास होता तो. पुन्हा challenge म्हणजे सकाळी जिथून बस पकडली होती तिकडे ती बस आलीच नाही. बस ड्रायव्हर ला पत्ता विचारला तर त्याला काहीच माहित नव्हतं, आली का पंचाईत आता? अंधार वाढू लागलेला आणि बाहेरचं काहीच कळत नव्हतं. कुठे आलोय, आपलं घर कुठे ते. प्रचंड टेंशन आलं होतं. १ ठिकाणी उतरलो आणि समजलंय आपल्याला ह्या आनंदात मी उजव्या गल्लीतून चालायला लागलो. ह्या रस्त्याच्या शेवटी डावीकडे वळलो की आली आपली apartment. १५ मि. नी चालल्यावर कळलं की डावीकडे रस्ताच संपतोय. आता मात्र मी पुरता रस्ताच हरवलो होतो. इतका असहाय्य, हतबल मी मला कधीच बघितलं नव्हतं. पण इलाज च नव्हता तेव्हा. रस्ता शोधता शोधता उशीर होत होता. हातात मोबाईल होता पण balance अगदीच कमी होता. एखाद दुसरा च call करू शकत होतो. दिप्तीला तर कळवण्याची सोयच नव्हती कारण रूममधला landline फोन बंद पडलेला होता. धीरेन ला फोन करून मदत मागायचं ठरवलं. लगेच त्याला फोन लावला, नेमका तो मीटिंग मध्ये असल्याने त्याचा फोन voice mail ला गेला. त्याला मेसेज ठेवेपर्यंत balance अगदीच कमी म्हणजे काहीतरी १५ cents वगैरे उरला. माझी तेव्हा खुपच तंतरली होती. एवढ्या मोठ्या देशात आलो आणि पूर्ण हतबल झालेलो ही भावना तेव्हा माणसाला अगदी रडकुंडीला आणते ना तसंच झालं. तरी मी हिंमत न हारता जिकडून बस मधुन उतरलो तिकडे पुन्हा परतलो. १-२ बसेस ची वाट बघितली, आलेल्या बसेस मधल्या ड्रायव्हर ना पत्ता विचारला पण सगळे म्हणत हाच तो stop. ह्या सगळ्यात १५-२० मि. गेली. ८ वाजले घडाळ्यात, ५ वाजता निघून मी ७-७:१५ पर्यंत मी घरी पोहोचण अपेक्षित होतं. त्याचं ही वेगळच टेंशन डोक्यावर. शेवटी निराश होवून बाजूला सिग्नल ला उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हाक मारून, हात दाखवून हरवलो आहे, हेल्प करा वगैरे विनंती करू लागलो. इथल्या लोकांना मी भिकारी आहे असं समजून ते मला हटकत होते. काही जण तर ओरडले माझ्यावर डोळे वटारून. भिती, हतबलता, राग असे सगळे भाव एकत्र चेहऱ्यावर येरझारा घालत होते आणि मी त्या अवस्थेत रस्त्याच्या इकडे तिकडे येरझारा घालत होतो. १५ मि. हा सगळा प्रयत्न करून हताश होवून अगदी रडायलाच आलो होतो मी. बरेच वेळा वाटलं आई वडिलांना, मित्रांना कोणालातरी हाक मारावी, पण कशी? तिकडेच रस्त्यावर ओरडावं असं वाटत होतं. किती वेळा मनातून देवाचा धावा केला, सगळे अपराध पोटात घाल पण सुखरूप घरी ने अशा मागण्या झाल्या मनातून. खरंच तेव्हा ब्रम्हांड आठवलं होतं. मग अचानक समोर मला १ store दिसलं. पेट्रोल पंप होता तो. तिकडे जावून काही मदत मिळते ते का ते बघुयात म्हणुन तिकडे धाव घेतली. आत शिरल्यावर भारतीय माणूसच मालक दिसला आणि जीवात जीव आला. गेला अर्धा तास इंग्लिश मधुन याचना करून दमलो होतो आणि मग लगेच त्याला हिंदीतून सगळा प्रकार सांगितला. तो म्हणाला पुन्हा असं रस्त्यावर उभा राहून कधीच मदत मागु नकोस, इकडे लोकांकडे पिस्तुली असतात, गोळ्या घालायला ही मागे पुढे बघणार नाहीत इकडे. पायाखालची जमीनच सरकली माझ्या. त्याला माझा पत्ता सांगितला, तो तिकडचा राहणारा नसल्याने त्याने १ भला मोठ्ठा map काढला आणि त्यावर शोधू लागला. त्याचं ते चालु असताना मी त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना मी किती हतबल आहे ते सांगून मदतीची भीक मागत होतो. त्या मालकाने ही थोड्या वेळाने हात वर केले होते. थोड्या वेळाने १ आफ्रिकन वंशाची बाई तिकडे आली, तिचं समान घेवून ती counter ला आली तेव्हा तिला पण असंच विचारून बघितलं, तर ती म्हणाली की ते apartment माझ्या apartment च्या समोरच आहे. मी तिला विनंती केली मला सोडायला तर ती लगेच म्हणाली की मी सोडेन तुला तिकडे. माझा जीव अगदी भांड्यात पडला. तिच्यावर पूर्ण विश्वास बसला माझा. काहीच ईलाज नव्हता तेव्हा, कारण ८:३० होवून गेले होते. त्या बाईने तिकडुन १ wine bottle घेतली. मी त्या मालकाचे आभार मानले. जाण्यापूर्वी त्याने मला सांगितलं की ह्या देशात पुन्हा तु नवीन आहेस, मदत करा वगैरे विनवण्या जास्त करू नकोस. ही बाई बरी दिसतेय आणि देव न करो पण होत्याचं नव्हतं व्हायला वेळ नाही लागणार. मी त्याचे पुन्हा एकदा आभार मानून त्या बाई च्या गाडीत बसलो. मर्सिडीज होती ती. मी बसमधून उतरल्यावर उजवीकडे जाण्याऐवजी डावीकडे गेलो असतो तर एव्हाना पोहोचलो असतो हे नंतर मला समजलं. पण डावीकडे नजरेला पायवाट दिसेल असा रस्ताच नव्हता तो. सुदैवाने अजुन कुठलाही विपरीत प्रकार न घडता मी ८:४५ च्या दरम्यान घरी पोहोचलो. देवदूतासारखी धावून आली होती ती बाई. तिचे मनापासून आभार मानले. दिप्ती अगदी हवालदिल झाली होती. आल्या आल्या सरबत्ती सुरु झाली, पाणी पिऊन सगळा प्रकार तिला सांगितला. खुपच जबरदस्त अनुभव होता तो माझ्यासाठी. देवाचीच कृपा की काही विपरीत घडलं नाही.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी confidently बसमधून उतरलो आणि डावीकडे वळलो आणि घराकडे यायला निघालो. चालायला वाट नव्हती परंतु बाजूला गुडघ्यापर्यंत वाढलेलं गवत होतं, रस्त्यावर लाईटच नव्हते. अंदाजाने चालत चालत रस्ता कपात होतो मी. गाड्यांची वर्दळ तशी बरी असल्याने त्यांच्या हेडलाईट च्या प्रकाशात पुढचा रस्ता लक्षात ठेवून पुढे जात होतो. अंधार दिसला आणि रस्ता सापडत नसला की गाडी येईपर्यंत थांबायचो आणि मग पुढे जायचो. असं मी तब्बल २० दिवस केलं. त्यानंतर आम्ही ऑफिसजवळ १ apartment भाड्याने घेतलं. अगदी कुठलंच furniture, bed नव्हता तरी त्या घरी आम्ही इतक्या दिवसांनी त्या दिवशी relax झोपलो होतो. तिकडुन ऑफिस बसने अगदी अर्ध्या तासावर होतं. जय त्याच apartment मध्ये राहत असल्याने बरेचदा त्याच्याबरोबर ही जाता येत होतं ऑफिसला. त्याच weekend ला जावून १ bed, १ dining सेट, १ सोफा असं सगळं घेवून आलो. घर हळू हळू भरल्या सारखं वाटू लागलं. गाडी काही लगेच घेता येत नव्हती पण ऑफिसला जाता येत होतं. आधीचा तो संघर्ष १ प्रकारे संपला होता. त्या वेळेस अनेकदा आम्हाला दोघांनाही वाटलं होतं की सगळं सोडून जावं परत मायभूमीत. तो २० दिवसांचा काळ आम्हाला बरंच काही शिकवून गेला होता. struggle काय असतो ना ते प्रत्येकाने इकडे येवून शिकावा. सुरुवातीला तुम्ही जर हे सगळं निभावून नेलंत तर पुढे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत उभं राहू शकता हे तेव्हा समजलं.

आज आम्हाला ह्या देशात बरोबर ९ वर्ष झाली. बऱ्याच अडचणी आल्या, वाईट प्रसंग आले पण आम्ही त्यावर मात करून इकडे खुप मस्त मज्जा करत राहत आहोत. देवाचे आभार मानू तेवढे कमीच की सगळ्या प्रसंगातून आम्हाला उभं राहायला ताकद दिल्याबद्दल. आता जीवाची अमेरिका करणं काय असतं ते शिकतोय आणि अनुभवतोय गेली काही वर्षं.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

Impressum

Tag der Veröffentlichung: 26.12.2017

Alle Rechte vorbehalten

Nächste Seite
Seite 1 /