Cover

काय करतोय आपण?

 

एक छान शहर असतं, छोटं वगैरे अजिबात नाही तर खुप मोठं शहर असतं. साहजिकच लोकसंख्या ही खुपच असते त्या शहराची. मराठी माणसाचं १ हक्काचं मराठी मंडळ खुप वर्षांपासुन नावारूपाला आलेलं असतं. सगळे मराठी लोक विविध कार्यक्रम आणि सण साजरे करायला एकत्र येतात. सगळीकडे खेळीमेळीचं वातावरण असतं. विविध विचारांचे लोक एकत्र येवून काहीतरी कल्पक कार्यक्रम राबवतात आणि ते खुप यशस्वीरित्या सादर ही करतात. काही वर्षांनी स्पर्धेसारखी चुरस वाढू लागते एकमेकांमध्ये. बरेच वेळा असं वाटतं की एका विशिष्ट मराठी माणसाच्या लोकसंख्या मर्यादेनंतर ही चुरस दिसून येत असावी. बघा ना प्रत्येक छोट्या गांवात ही चुरस फारशी दिसून येत नाही, परंतु जीवघेणी, राजकारणी स्पर्धा अशा मोठ्या शहरांमध्ये दिसून येते. तरुण वर्ग दिसु लागतो, त्यांचा सहभाग, उत्साह बघुन आपल्याला ही आणि बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना अभिमान वाटतो आणि मग समाधान वाटतं की चला आपल्यानंतर पुढची पिढी हे सगळं पुढे खुप समर्थपणे चालवू शकेल. बरेच जण आपल्या कल्पकतेच्या जोरावर, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने चांगलं नांव ही कमावतात, इतर गावांमध्ये आपल्या शहराचं नांव रोशन करतात. खुप छान प्रसिद्धी होते त्यांची. लोक ही अगदी प्रेमाने त्यांना एक मोठा कलाकार म्हणुन एका उंचीवर नेवून ठेवतात. आणि मग ह्या थोड्याशा प्रसिद्धीतुन भुक वाढू लागते, ईर्ष्या जन्माला येते.

असंच एक अल्प वेळेत भरघोस प्रसिद्धी मिळवलेलं जोडपं असतं. एक दिवस त्यांच्या मनांत येतं की जर असे कार्यक्रम आपण मंडळासाठी फुकट करतो आणि एवढं नांव कमावतो तर मग आपली एखादी संस्था काढून ही कमवू शकतो, बरं इथे नावा बरोबर थोडा पैसा ही कमावता येईल. इकडे होते खरी स्पर्धेला सुरुवात. म्हणजे असं अजिबात म्हणणं नाही की त्यांना असं करायचा हक्क, अधिकार नाही. अर्थात कोणालाही काहीही करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते जर नीतिमत्तेला धरून असेल तर का नाही, पण ह्यात मग नीतिमत्तेचा पूर्णपणे अभाव जाणवू लागतो. ज्या मंडळामुळे आपल्याला नांव, प्रसिद्धी मिळालेली असते त्या सर्व गोष्टींचा विसर पडु लागतो आणि त्यांच्याच समांतर ही आपली ठामपणे उभी रहायची आपली हिंमत वाढते. खरी विचार करायची बाब ही आहे की एवढी हिंमत आणि बळ कुठुन येतं तर सामान्य लोकांकडुन, त्यांच्या प्रतिसादातून. ह्या सगळ्यात आणि भारतातील राजकारणात काय फरक आहे मग? १ सुरुवातीला मोठी पार्टी असते, तिचं सरकार येतं, ते दर पाच वर्षांनी बदलतं, लोकांचे विचार बदलतात, एकाच पार्टीतले काही लोक आपले समर्थक घेवून समांतर दुसरी पार्टी काढतात. मग आपापसात लढाई आणि मग मतांसाठी राजकारण. ह्या सगळ्यात होरपळते ती गरीब बिच्चारी जनता. बरं इकडच्या बाबतीत गरीब बिच्चारी जनता ही म्हणता येणार नाही, आर्थिक दृष्ट्या तर नाहीच नाही पण विचारांनी खुपच प्रगल्भ आणि राजकारणापासून आम्ही अगदी दूर असे आव आणणारे लोक. जेव्हा दुसरी संस्था उभी राहते, पहिला कार्यक्रम अतिशय मोठा कलाकार भारतातून आणून कार्यक्रम लावते तेव्हा हेच लोक त्या कलाकारासाठी, कलेसाठी वाट वाकडी करून जातोय, संस्थेबद्दल प्रेम, आपुलकी नाहीच ह्या अविर्भावात जातात. इकडूनच सर्वसामान्यपणे सगळ्यांची नीतिमत्ता ढासळत जाण्यास सुरुवात होते. मग ह्यातलेच बरेचसे लोक लंच, डिनर पार्टीज मध्ये ही दुसरी संस्था वगैरे काही बरोबर नाही आणि न पटणाऱ्या गोष्टी आहेत आणि हे सगळं थांबायला हवं वगैरे वगैरे निर्रासपणे बोलतात. ही माणसं कमेलीयन सरड्याप्रमाणे असतात बहुधा, वेळ, स्थळ बघुन बोलण्याचा मसुदा बदलतात. किती खोटं जगतो आपण? आपल्या अगदी जवळचा चुकीचा वागतोय हे ही सांगायचं आणि समोरच्याने ते ऐकण्याचं सामर्थ्य उरलेलंच नाही अजिबात. सगळं गोड आणि छान वागतोय असंच दाखवत राहायचं. आपल्या देशापासुन दूर राहतोय ना मग कशाला रुसवे फुगवे ठेवत जगायचं. बरोबरच आहे हा ही विचार पण जवळच्या ने अहो पाठीत सुरा खुपसलाय तरी असू दे नशीब माझं म्हणुन उदार मनाने गप्प बसुन राहायचं? मती गुंग करून टाकण्यासारखे वागतो आपण. बरं काही लोक असे दाखवतात की आमचं सगळ्यांशी कायम चांगलंच असतं. ह्याचा अर्थ कोणी कसाही उन्मत्तपणे वागला तरी आम्ही कायम तटस्थपणे राहतो. अशा लोकांना त्यांची परखड मतं नसावीत, कारण आपल्याला ह्यात कशात ही पडायचं नाही असं साळसुदपणे जगायला जमतं बुवा त्यांना.

मग हळुहळु ही संस्था जोर धरू लागली, एकामागुन एक कार्यक्रम मंडळाच्या समांतर करू लागली. पण बरेच वेळा असंही असतं की आपल्याला हवेत तसे सगळेच कार्यक्रम आपल्याला मंडळाच्या माध्यमातून करणं शक्य होत नाही, म्हणुन ही गोष्ट समजु शकतो १ वेळ नवीन संस्थेचा खटाटोप. मग १ वर्षीच्या प्रेसिडेंट ने ह्या सगळ्या बाबतीत बडगा उगारला आणि इतर बऱ्याच लोकांशी चर्चा, विचार-विनिमय करत हे असं एकाच गावात राहून असं स्वतंत्र संस्था चालवणे किती मराठी माणसाच्या दृष्टीने घातक आहे हे पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला. बऱ्याच जणांनी स्पर्धा होवू देता कामा नये, लोकं ठरवतील काय करायचं ते, दर्जा जिकडे चांगला तिकडे लोक प्राधान्य देणार आणि तत्सम विविध विचार मांडले. पण ह्या प्रेसिडेंटने ते इतकं काही जिव्हारी लावून घेतलं की मग एक विचित्र स्पर्धा २ संस्थांमध्ये दिसून येवू लागली. बरेच लोक त्यामध्ये उगीचच शिकार झाले, वाईट ठरले. विचित्र स्पर्धा इतकी की दोन्ही संस्था जवळपासच्या तारखांना एकमेकांचे कार्यक्रम लावू लागले. त्यामुळे सहाजिकच लोक विभागले गेले आणि त्याचा परिणाम दोन्ही संस्थेच्या तिकीट विक्रीवर झाला. बरं गम्मत अशी की १ प्रकारे २ पार्ट्या पडल्यात असाच भास होवू लागला. मंडळाबरोबर असलेली काही लोकं ह्या नवीन संस्थेत कार्यरत झाली. आणि मग ह्या नवीन संस्थेत ती मंडळापेक्षा जास्त रमू लागली आणि त्याप्रमाणे जास्त वेळ ही देऊ लागली. कळतच नव्हतं की कोण कोणाच्या बाजूने उभं आहे ते. सगळाच गोंधळ ह्या १ नवीन संस्थेमुळे. आधीच शहरात वेगवेगळ्या छोट्या शहरांमुळे गटबाजी होतच होती. त्यात आता ह्या नवीन संस्थेने ते अधिक होण्यास भर घातली. कालांतराने लोकांनी ही हे सगळं निमुटपणे मान्य केलं की असू दे आपल्यातलेच आहेत वगैरे. हा नको तिकडे मराठी माणसाचा मोठेपणा अशा प्रकारे गोष्टी रुजू होण्यास कारणीभूत ठरतो. प्रत्येक जण प्रत्येक वेळेला हाच stand घेतो की जावू दे ना यार आपल्याला काय करायचंय. सगळीकडे कार्यक्रमासाठी जायचं आणि आनंद घ्यायचा, ह्या गोष्टींमध्ये का पडायचं. हाच तो विचार पळपुटा मराठी माणसाचा, ज्याचा फायदा कायम उचलला जातो राजकारण्यांकडून. वास्तविक ह्यात आणि राजकारणात काहीच फरक नाहीये. हे असं २ वर्ष चालु राहिलं आणि अचानक ज्यांनी ह्यावर सुरुवातीला आग्रही आक्षेप घेतला होता त्यांनीच आपल्या नवीन संस्थेची जाहीर घोषणा करावी? ह्याला नेमकं काय म्हणावं? किती मोठा विरोधाभास तो विचारांमध्ये? मग आता आमचा प्रश्न की एवढी २ वर्ष पहिल्या संस्थेविरुद्ध आगपाखड करून आपण ही तेच करावं? इतके आपण बेफिकीर, निर्लज्ज आहोत? म्हणजे लोक काय म्हणतील ह्याची कसली तमाच बाळगायची नाही. सगळ्यात आश्चर्य म्हणजे ही घोषणा झाल्यानंतर लगेच पहिल्या मंडळाच्या मोठ्या उत्सवाला आपली गैरहजेरी? निव्वळ योगायोग की हेतुपुरस्सर योगायोग? लोक सुरुवातीला बडबडतील मग सगळं मान्य करतील असा विचार. म्हणुनच तर सगळे काहीही करायला हिमतीने तयार असतात. पुन्हा तोच प्रश्न, राजकारणी मुत्सद्दी लोकांमध्ये आणि ह्यात काय नेमका फरक आहे? बरं तुम्ही मंडळात कार्यरत होतात, राष्ट्रीय महामंडळाच्या समितीत आहात आणि मग आपली १ संस्था पण स्वतंत्र राबवायची? सुन्न करून टाकणाऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. गंमतीने म्हणतात की २ मराठी माणसं चंद्रावर भेटली तर ३ मंडळं काढतील, प्रत्येकी १ स्वतंत्र आणि दोघांचं मिळुन १ असावं म्हणुन. आता ही वस्तुस्थिती आहे, जी खुप भीषण आहे. अशा प्रकारे मग प्रत्येकाने असाच विचार केला तर काय होईल? जसं घरटी आता गणपती आणतात तसंच होईल हे सगळं. आजुबाजुला माणसाचे पुतळे आहेत की काय ही एवढी शंका येण्याची परिस्थिती आहे समाजात. गेल्या काही वर्षात मराठी माणसाने, किंवा एकूणच माणसाने असंवेदानाशीलतेचा कळस गाठलाय असं नाही वाटत? आणि मग एकमेकांना म्हणायचं की मराठी माणसाला हा शापच आहे एकत्रित न राहण्याचा. आणि असं म्हणणारेच ह्या अशा गोष्टींना पाठिंबा दर्शवतात हे बघुन तर मन अगदी हेलावून जातं. परप्रांतीय लोकांचा उत्कर्ष बघायचा आणि आपल्याला का नाही हे असं काही जमत वगैरे असं निराशेच्या सुरात म्हणायचं. आपल्यात एकजूट नाही म्हणुन नुसती इतरांची उदाहरणं द्यायची, पण त्यातुन बोध कसलाही घ्यायचा नाही. ह्यावर खरोखर प्रत्येकाकडून डोळस विचार होण्याची गरज आहे. लोकांसाठी नाही तर निदान आपल्या मनाशी ४ संवाद करून बघा एकांतात की आपण काय वागतोय ते बरोबर आहे की नाही?

पहिल्या संस्थेने जेव्हा त्यांच्या पहिल्या कार्यक्रमाची इमेल सगळ्या मंडळाच्या मेंबर्सना केली तेव्हा हा प्रश्न उपस्थित केला गेला होता की त्यांना सगळ्या मेंबर्स ची माहिती कशी मिळाली? मग तुम्ही तर १ वर्ष सगळा data च handle करत होतात, मग तुम्हाला काय म्हणायचं? राष्ट्रीय महामंडळावर बसुन कुठले कार्यक्रम कधी कसे येणार ते बसल्या बसल्या तुम्हाला कळणार आणि त्याचा फायदा स्वार्थासाठी तुम्ही नकीच उठवणार. आणि लोक स्वत:ला गरीब आणि आपण अजुन काय करू शकतो ह्या हतबलतेने तुमच्या कार्यक्रमाला ही येणार. लोक भरघोस प्रतिसाद देतात म्हणूनच हे सगळं खुप फोफावत चाललंय. आणि मग एखादा त्याबद्दल आक्षेप घेवू लागला की बाकीच्यांनी त्याला वेड्यात काढायचं. असं म्हणायला ही कमी नाही करणार की अरे त्याला तसं करणं जमत नाही म्हणुन ही पोटदुखी. पण म्हणुन काय सगळ्यांनी हाच मार्ग निवडायचा आपली योग्यता किंवा विद्वत्ता सिद्ध करायला? म्हणजे आपल्या मनासारखे कार्यक्रम नाही झाले? काढ नवीन संस्था. कुठला अजब न्याय करतोय आपण? बाहेर चाललंय ते बघायचं आणि मला थेट काही फरक पडत नाही ना मग कशाला त्रास करून घ्यायचा? निषेध पण साधा नोंदवू शकत नाही आपण आपल्या समोर घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल?

मंडळ हे म्हणजे आई आणि ह्या नवीन संस्था म्हणजे तिची तिलाच न जुमानणारी, अनादर करणारी तिची पिल्लं असं समजुया हवं तर. सुरुवातीला बाळ आधाराने चालू लागतं मग एकदा त्याचा आत्मविश्वास वाढला की मग ते म्हणतं बघ मी कसा तुझ्याशिवाय सगळं काही manage करू शकतो ते.

काळ लोटत जाईल, दोन्ही संस्था उत्तम रीतीने आपापल्या परीने एकमेकांवर कुरघोडी करत, कधी हस्तांदोलन करत युती दाखवत कार्यक्रम करतील. मंडळ आई च्या रूपाने काही काळानंतर दोन्ही आपल्या पिलांना सांभाळून घेईल, मोजके तत्वाला धरून चालणारे लोक सोडल्यास इतर लोकं सगळीकडे किंवा जमेल त्या कार्यक्रमांना जातील आणि सगळीकडे शेवटी आनंदी आनंद पसरेल.






Impressum

Tag der Veröffentlichung: 13.10.2017

Alle Rechte vorbehalten

Nächste Seite
Seite 1 /