Cover

शब्दांवाचुन कळले सारे

कोणी एखादा मध्यरात्री झोपेतून उठतो काही कारणाने, म्हणजे तरुण मुलं परीक्षेच्या भितीने दचकून उठतात. काही भयानक स्वप्न बघुन उठतात. काही कुठल्या तरी कौटुंबिक ताणाने उठतात. काही आर्थिक ताणातून उठतात. पण कधी तुम्ही असं ऐकलं आहात की एखादा त्याच्या मातृभाषेतील शब्द हरवत चालले आहेत ह्या भितीने उठलाय. अहो पण हे तुम्हाला जरी अतिशायोक्तीपर वाटत असलं तरी शब्द निखळुन जात आहेत ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्यापैकी ह्या बाबतीत कधी चिंतीत तरी होतात का? सगळ्यांनी ग्राह्य धरलंय की सगळं काही चाललं आहे ते बरोबर आणि असंच चालु राहू देत.

मराठी मातृभाषा ही आता इतकी समृद्ध राहिलीय का? ती मुळात समृद्ध असेल ही पण आपण तिची काळजी घेतो का, निगा राखतो का? आता तुम्ही म्हणाल की भाषेची निगा राखायची म्हणजे काय? तुमच्याकडे आता दोन चाकी, चार चाकी असेल त्याची निगा कशी राखता आपण, सतत वापरत ठेवून, बरोबर. मग तसंच आपण आपली भाषा सतत वापरत राहायला नको? मी एका निवेदनात ऐकलं होतं की तुर्कस्तानच्या राजाने एकदा त्याच्या सेवकांना मातृभाषेतले सगळे हरवलेले, निखळुन सुटत चाललेले शब्द शोधायचा हुकूम जरी केला होता. तसंच काहीसं करावं लागणार आहे मराठीसाठी ही. पण कोण करणार हे, आता तर राजे ही राहिले नाहीत. राज्यकर्ते तर मी मराठी च्या नांवाखाली वेगळंच राजकारण करताना दिसतात. मग अशा परिस्थितीत आपली ही जबाबदारी होते, हे निखळलेले शब्द पुन्हा मातृभाषेत आणुन त्याचा नित्य वापर करायची. तुम्ही म्हणाल काय वेडा माणूस आहे हा, ह्या सगळ्याची गरजच काय? १ गम्मत सांगतो, खरंच प्रयत्न करून बघा. रविवारी सुट्टीच्या दिवशी एकदा सगळया कुटुंबाने असं ठरवायचं की आज आपण जे काही संभाषण करू ते पूर्ण मराठीतलं असेल. कुठलेही उसने शब्द म्हणजे इंग्रजी किंवा हिंदी भाषेतले शब्द त्यात आणायचे नाहीत. आजकाल प्रत्येक घरात मुलं ही इंग्रजी माध्यमातून शिकतात त्यामुळे त्यांना तर हे महाकाय कठीण आहे पण आपल्यासारखे किंवा आपल्याहून ही वयस्कर आहेत त्यांना ही काही सोपं जाणार नाही. पटत नसेल तर एकदा खरंच करून बघा आणि मग कशी हबेलांडी उडते ते बघा आपली. जो शब्द इंग्रजीतुन सुचेल त्याला मराठीतला प्रतिशब्द शोधायचा आणि म्हणायचा. आणि हा उपक्रम आठवड्यातून एकदा तरी करायचा आणि ही मशाल प्रत्येक घरातुन हाती घेतली तर आपण पुन्हा एकदा आपले सगळे शब्द परत आणु शकु. हे सगळं वाटतंय तितकं सोप्पं नक्कीच नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी एकदा एका कार्यक्रमाच्या निवेदनाची तयारी करत होतो. गणपती उत्सवाचा कार्यक्रम होता आणि माझा प्रयत्न हाच होता की मी सगळं निवेदन पूर्ण मराठी शब्द वापरून करेन, कुठलेही इंग्रजी, हिंदी शब्द त्यात आणायचे नाहीत असं ठरवून. एवढं कठीण गेलं ते सगळं आणि मुळात तिकडे प्रत्यक्ष सादर करताना तर खुपच सतर्क राहावं लागत होतं कारण आता इंग्रजीतले कित्येक शब्द आपल्या अगदी बोली भाषेतले झाल्यासारखे झालेत. आत्तासुद्धा मला “सतर्क” शब्दाऐवजी पटकन alert हाच शब्द डोक्यात आला होता. normal, typical, actually असे असंख्य शब्द आहेत ज्यांनी त्यांच्या मूळ मराठी शब्दांवर कब्जा केला आहे. मला स्वत:ला ते सादर करताना एक वेगळाच अभिमान जाणवत होता की माझ्या अख्ख्या संभाषणात मी एकदाही कुठलाही उसना शब्द घेतला नाही. प्रेक्षकांनी एवढं नमुद केलं की नाही माहीत नाही. पण असे काही शब्द होते की “आता आपण १ video बघुया” वगैरे वगैरे. तरी सुद्धा त्याला मराठीतला प्रतिशब्द शोधुन मी तो वापरला होता. इथे माझं कौतुक करा वगैरे भाग नाही पण हे सगळं करत असताना एवढी मेहनत करावी लागत होती आणि ते ही आपलेच हक्काचे शब्द शोधुन वापरायला. एकदा मनाशी विचर करून बघा की आपण इतक्या सहज इंग्रजी शब्द बोली भाषेत वापरू लागलोय आणि अचानक जर का आपण प्रत्येक मूळ शब्द वापरू लागलो तर लोकं आपल्याला वेडे म्हणतील. गम्मत आहे ना की आपल्याच मूळ शब्दांचा वापर करूनही आपणच वेडे. उदाहरणार्थ “मी तुम्हाला भ्रमणध्वनीवर संदेश सोडला होता, मिळाला का?” साहजिकच आहे इथे लोक तुम्हाला वेडं ठरवणं.

मी २००८ साली ह्युस्टन ला आलो तेव्हा तर मराठी मंडळात बरेचसे लोक सर्रास इंग्रजीतुन संभाषण करत होते. अनेक वक्ते ही मराठी मंडळ समिती वर असून सुद्धा पूर्ण इंग्रजीत भाषण ठोकत होते. कालांतराने बरीच मंडळी वाढू लागली आणि बरेच नवीन लोक खुप मराठी बोलू लागले. आता इकडे अशा परिस्थितीत पूर्ण मराठीचा आग्रह धरणे म्हणजे केवळ अशक्यच. कौतुक ह्या गोष्टीचं की कित्येक कुटुंबं इकडे अशी आहेत त्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत देखील धाडलेलं आहे. मुलांचा गोंधळ होतो, कारण इकडल्या शाळेत इंग्रजी आणि रविवार च्या शाळेत मराठी. पण ह्या वयातच मुलं काहीही पचवू शकतात. आश्चर्य म्हणजे काही दिवसांपूर्वी आमच्याकडे माझ्या मित्राच्या बायकोची बहीण तिच्या २ मुलींबरोबर आली होती आम्हाला भेटायला. ती भारतात राहत होती आणि जेव्हा तिला समजलं की आमची मुलं इकडे मराठी शाळेत जातात आणि शिकतात तेव्हा तिची प्रतिक्रिया ही होती की काय गरज आहे ह्यांना इकडे राहून मराठी शिकायची? बरोबर आहे अगदी तिचं की इकडेच राहायचंय मग ह्या मुलांना मराठी शिकुन ते कुठे त्याचा वापर करणार? आपलीच मातृभाषा शिकुन त्याचा कुठे व्यावहारिक वापर होईल का ह्या विचाराने का शिकावी भाषा? आपली मातृभाषा आपल्या पुढल्या पिढीला आपल्याकडुन चांगल्या पद्धतीने पोहोचवण हे आपलं आद्य कर्तव्य का वाटत नाही आपल्याला? असा विचार करूया की आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मराठी मिळाली, तेव्हा असे इतर पर्याय उपलब्धही नव्हते म्हणा. आता आपण ती आपल्या पुढच्या पिढीला उत्तम रीतीने सुपूर्द करायला हवी. आणि असे संस्कार ही करायला हवेत की जेणेकरून ते त्यांच्या परीने ती भाषा पुढे जिवंत ठेवतील. असे बरेचसे पालक मी इकडे बघितलेत जे त्यांच्या मुलांना ह्या भाषेची ओळख ही करून देत नाहीत. मराठी परिवार असुन मुलांना मराठी समजलं तरी ते बोलू शकत नाहीत. ह्याचं खुप वाईट वाटतं , की आपण ही पुढे वाहत जाणारी भाषेची नदी का अडवून धरावी? जावू दे की पिढ्यानपिढ्या वाहत पुढे. मुळात आपण दररोज घरी मराठी भाषेतुन संभाषण सुरु केलं तर त्याने देखील खुप फरक पडु शकेल. अजुन एक आमच्या ओळखीचं कुटुंब आहे, ते मुळचे कोल्हापूर चे आहेत, त्यांना या देशात येवून ९ वर्ष झाली आहेत. ते दोघेही नवरा बायको त्यांच्या दोन्ही मुलींशी नियमितपणे इंग्रजीत संभाषण करतात. एकांकडे गेलो होतो मी आणि त्यांच्या मुलीला विचारलं, बाबा काय करत आहेत ग तुझे, तर म्हणाली, बाबा ना plants ना water घालत आहेत. काय म्हणावं ह्याला? आणि एकीकडे असं एक कुटुंब आहे जे या देशात ३० वर्षांपूर्वी आले होते आणि त्यांची दोन्ही मुलं उत्तम अस्खलित मराठी बोलतात. मी काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे एका कार्यक्रमानिमित्त गेलो आणि त्यांच्या मुलांना भेटलो. दोघेही डॉ. आहेत, या देशात जन्मलेले, वाढलेले आहेत, पण उत्तम मराठी बोलत होते. त्या आई वडिलांबद्दल मला प्रचंड अभिमान वाटला तेव्हा. मुळात आपल्याला या भाषेचा अभिमान वाटायला हवा मग आपली मुलं ही ती अपोआप बोलू लागतात. आजकाल कोणाकडे ही गेलं आणि मुलांचा विषय निघाला की आई वडील अभिमानाने सांगतात की आमच्या ह्याला मराठी आवडतच नाही, मराठी पदार्थ नकोच म्हणतो. आपल्याला ह्या गोष्टींचं वाईट वाटायला नको? आणि हे नुसतं बौद्धिक ज्ञान किंवा उपदेश मला करायचा नाही. खरंतर अनेकदा स्वाभाविकपणे मी ही कित्येकदा कितीतरी इंग्रजी शब्द मराठी बोलताना वापरतो, किंवा सहज रित्या वापरले जातात. आपल्याला तसं जाणवतही नाही. पण म्हणुन सगळेच मिळून प्रयत्न केला तर काय हरकत आहे?

काही दिवसांपूर्वी मराठी मंडळने एक डेलावेर स्थित अतिशय गुणी कलाकाराने बनवलेला लघुपट प्रदर्शित केला. दुर्दैवाने त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला. लघुपट एवढा सुंदर होता की काय सांगु. लघुपट एका मराठमोळ्या मुख्य आचारीच्या(Chef) जीवनावर आधारलेला होता. त्यात आपलेच नेहमीचेच दैनंदिन वापरातले मराठी पदार्थ अशा काही नवीन ढंगात सादर केले की सगळ्यांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. वरण भात, पुरण पोळी, मोदक, पोळी भाजी असे काही ताटात वाढलेले दाखवले होते की तेच बघुन प्रचंड अभिमान वाटला आपल्या संस्कृतीचा. सांगायचा उद्देश हाच की आपल्याला आपल्याच गोष्टी कोणी जर अशा उलगडुन दाखवल्या तर आपल्याला त्याची खरी किंमत कळते. हे हरवलेले, आपल्या स्मृतीतून निसटलेले शब्द पुन्हा शोधायला जी काय मज्जा येते ती मी शब्दात मांडू शकत नाही. प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यायला हवा. जेव्हा आपण ते शब्द शोधतो तेव्हा ते पुन्हा आपल्याला अगदी नवीन तरुण होवून भेटायला आल्यासारखे वाटतात. खोटं वाटतंय? करून बघा.

शेवटी कविवर्य मंगेश पाडगांवकारांच्या कवितेच्या ओळी आठवतात “शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलीकडले”.

Impressum

Tag der Veröffentlichung: 20.06.2017

Alle Rechte vorbehalten

Widmung:
Importance of words in our life from our mother-tongue.

Nächste Seite
Seite 1 /