शनिवार ,२२ एप्रिल २०१७
मागच्या आठवड्यापासून आम्ही सगळेच कामाला लागलो होतो. दिप्तीने तर लष्कर मोहीमच काढली होती. पण १ गोष्ट चांगली की ह्या निमित्ताने आमच्या अख्ख्या घराची मस्त साफ-सफाई झाली होती. निमित्त काय होतं तर "तीन पायांची शर्यत" ह्या नाटकाची टीम आमच्याकडे राहायला येणार होती. सकाळी मला त्या सगळयांना एकांकडून आणायची जबाबदारी होती. मला त्यांच्याकडे सकाळी १० वाजता पोहोचायचं होतं, पण ट्रॅफिकमुळे मला १०:३० तरी वाजलेच. त्या सगळ्या कलाकारांपैकी नाटकाचे दिग्दर्शक विजय (काका) केंकरे आणि प्रकाश-योजना आणि साऊंड एक्स्पर्ट भुषण देसाई दोघे आमच्याकडे आणि संजय नार्वेकर आणि लोकेश गुप्ते आमचा मित्र, समित गोखले कडे राहणार होते. मी आणि समित दोघेही त्यांना घ्यायला जाणार होतो कारण त्यांचं सामान खूप होतं. पण आमची मोठठी गाडी असलयामुळे मीच समित ला म्हणालो की मी त्या सगळ्यांना सामानासकट घेऊन येऊ शकेन. गाडीच्या डिकीत सामान सगळं लोड झालयावर आम्ही सगळे समित च्या घरी यायला निघालो. सगळे कलाकार इतके दमले होते की संजय दादा तर २ मि.तच घोरायला लागले. साहजिकच आहे कारण आदलया रात्री त्यांचा प्रयोग संपल्या संपल्या त्यांना एअरपोर्ट वर जायला लागलं होतं ह्युस्टनला यायला. सकाळी त्यांचा नाश्ता ज्यांच्याकडे उतरले होते तिकडेच झाला होता. परतीच्या वाटेवर पुन्हा ट्रॅफिक आम्हाला लागलंच. साधारणपणे आम्ही ११:४५ दरम्यान समित च्या घरी पोहोचलो. समितचं घर खूप सुंदर आणि मोठं आहे. आमचं तसं अगदी छोटं टुमदार घर आहे. दिप्तीला उगाच त्यावरून अवघडल्यासारखं झालं होतं. मी ते विजय काकांना समितकडुन निघालो तेव्हा बोलुन दाखवलं. काका हसले आणि म्हणाले थांब घरी गेलो की दिप्तीची चांगली कानउघाडणीच करतो. ते म्हणाले मुंबई मध्ये काय जीवन रे, २ BHK म्हणजे डोक्यावरून पाणी. समितच्या घराहून आमचं घर अगदी १०-१५ मि. च्या अंतरावर आहे. काका आणि भुषण नी मला एखादं मंदिर जवळ आहे का असं विचारलं, मी म्हटलं, कुठल्या मंदिरात जायचंय? स्वामीनारायण की कुठलं ठराविक? तर दोघे ही हसले आणि म्हणाले अरे लक्ष्मीनारायणाचे म्हणजे कसिनो. हाहाहाहा एवढा हसलो होतो मी तेव्हा. ३ तासाच्या अंतरावर असं मी सांगितलं. तसं लांब असल्यामुळे त्यांना ते शक्य होईल असं वाटत नव्हतं.
दिप्ती आणि मुलं स्वागतासाठी सज्जच होती. आम्ही पोहोचल्या पोहोचल्या मुलांनी wheel च्या बॅगा ओढायला सुरुवात केली. विजय काका आणि भुषण दोघांच्याही स्वतंत्र रुम्स एकदम तय्यार होत्या. आमची दोन्ही मुलं आयुष आणि आदिश खुश होती कोणीतरी घरी नवीन पाहुणे आल्यामुळे. आदिश ची टकळी लगेच सुरु होते मग. आल्या आल्या भुषणशी तो जुनी ओळख असल्याप्रमाणे बोलू लागला. आयुष अगदीच अबोल आणि आदिश एकदम बडबड्या. गम्मत म्हणजे हे सुद्धा आदिशनेच भुषणला सांगितलं.
नाश्ता सकाळी जरा उशीराच झाल्यामुळे पाहुण्यांना काही भुक वगैरे लागली नव्हती. त्यांना लवकरात लवकर झोप काढणं गरजेचं होतं. दीप्तीने मग फक्कड चहा केला आणि चहा बरोबर गप्पा एवढ्या रंगल्या की तास सहज निघून गेला. मला संध्याकाळी एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला जायचं होतं, काकांना सुद्धा माझ्याबरोबर यायची इच्छा होती आणि म्हणाले ही की जर दुपारच्या झोपेतून मी लगेच उठलो तर नक्की येईन. चहा घेता घेता आदिश ची बडबड तोंडी लावायला होतीच. दिप्तीने आदिशला टिळक विषयावरच्या गोष्टीचं भाषण करायला सांगितलं. तो ही लगेच कुठलेही आढेवेढे न घेता तयार झाला. थोडसं फुटेज पण खाऊन घेतलं मध्येच त्याने. काकांना त्याचं खुपच हसू आलं. ते भाषण काका आणि भूषण ला खुपच आवडलं. त्यानंतर हे सगळे आदिशला टिळक म्हणुनच हाक मारू लागले. आदिशला बरोबर माहीत असतं की कुठे आपलं पुरेपूर कौतुक होणार आहे ते, मग तो हवा तेव्हढा भाव खाऊन घेतो.
मधल्या वेळेत भुषणने २ तास छान झोप काढुन घेतली. अल्पेश थोटे ३ वाजता भुषणला भेटायला येणार होता. तो त्याला नाटकाच्या दिवशी sound साठी मदत करणार होता. त्या सगळ्याची practice म्हणुन तो येणार होता. अल्पेश ३:३० पर्यंत आला. चहाचा १ round झाला. मी आणि आयुष कार्यक्रमाला निघायच्या तयारीला लागलो. ४ वाजता काकांना उठवायला गेलो आणि बऱ्याच हाका मारल्या पण काका अगदी गाढ झोपले होते. मध्येच ते उठले आणि येत नाही आता एवढच म्हणुन पुन्हा झोपले. साहजिकच आहे म्हणा, आदल्या दिवशीचं जागरण आणि त्यात रात्रभर विमानाचा प्रवास. सगळेच खुप दमले होते. मी आणि आयुष कार्यक्रमाला निघालो. आम्ही तिकडुन थेट अंजु केलर (मराठी मंडळ प्रेसिडेंट) च्या घरी रात्री पार्टी ला पोहोचणार होतो. नाटक महोत्सव रविवारी असल्यामुळे पार्टी आदल्या रात्री करावी लागत होती. अंजुचं घर पार्टीसाठी एकदम उत्तम आहे. मागे स्विमिंग पुल आणि भरपूर जागा. पार्टी ७-७:३० ला सुरु झाली. मराठी मंडळ कमिटी आणि नाटकासाठी ज्यांनी खुप मदत केली त्या सगळ्यांना आमंत्रण होते. दिप्ती आणि पूजा, समित पाहुण्यांना घेवून अंजुकडे ८ पर्यंत पोहोचले. soft ड्रिंक्स, हार्ड ड्रिंक्स, बियर, व्हेज, नॉन-व्हेज असं बरंच काही होतं तिकडे. मी आणि आयुष पार्टीला ९:१५ पर्यंत पोहोचलो. हवा अचानक खूपच थंड झाली होती. थंड वारे वाहत होते. पुलाजवळ मस्त फायर पिट पण लावलं होतं. त्यामुळे त्याच्या आजुबाजुला घुटमळत बसायला मज्जा येत होती. सगळ्या मुलींनी लोकेश आणि संजय दादांजवळ घोळका घातला होता. भरपूर गप्पा, जोक्स चालु होते. मुलं आपला ग्रुप बनवून आपला आपला वेळ छान घालवत होती. मी गेल्यावर १ बियर चा ग्लास घेतला आणि लोकांशी गप्पा मारू लागलो. संजय दादा, लोकेश अगदी साधे सरळ आहेत बोलायला. एव्हढे मोठे कलाकार असून सुद्धा किती तो साधेपणा. मग मी पहिल्या नाटकाच्या (मोरूची मावशी) टीमला भेटलो. त्यातले बरेचसे कलाकार अंजुकडेच उतरले होते. दुसऱ्या दिवशी मला आणि माझ्या मित्रांना सकाळी लवकर थियेटर ला नाटकाचा सेट उभारायला पोहोचणं भाग होतं म्हणुन मग आम्ही पार्टी वरून लवकर निघायचं बघत होतो. तरी निघेस्तोवर ११ वाजलेच रात्रीचे. बरं घरी आल्यावर काकांना अक्षय कुमार चा “बेबी” मुव्ही बघायचा होता. मी १०-१५ मि. बसलो आणि सगळ्यांना गुड नाईट करून झोपायला गेलो. काका ही दमले होते, ते ही पुढच्या १०-१५ मि. त झोपायला गेले. मुलांना उत्साह आला होता तो मुव्ही बघायचा पण मग त्यांना जरा दमदाटी करून झोपायला आणलं दिप्तीने. तरी ह्या सगळ्या मध्ये १२ वाजलेच झोपायला.
रविवार, २३ एप्रिल २०१७
सकाळी मी ६ ला उठलो, सगळं पटापट आवरलं आणि ७ – ७:१५ च्या सुमारास सुनील पेंडसेंच्या घरी पोहोचलो. त्यांना घेवून मी साधारणत: ७:३० पर्यंत बेरी सेंटर ला पोहोचलो. मराठी मंडळ कमिटी मेम्बर्स यु-हॉल मधुन नाटकाचा सेट उतरवतच होती. मी, सुनील पेंडसे, समित गोखले आणि hank केलर असे चौघे जण मिळुन ह्या दोन्ही नाटकाच्या सेटवर काम केलं होतं. तेव्हा आमच्या चौघांच्या खांद्यावर खुपच मोठी जबाबदारी होती. पाहिलं नाटक १० वाजता सुरु होणार होतं. आम्हाला १ तासातच त्या नाटकाचा सेट उभा करायचा होता. तसा तो खुप अवघड नव्हता पण आयत्या वेळेला बरेचसे बदल होत असतात. ८ वाजता सुरुवात केली आणि अखेरीस ९:३० च्या आसपास पूर्ण सेट तयार झाला. त्यानंतर lights आणि sound चं टेस्टिंग करायचं होतं. आम्ही मग सगळं झाल्यावर नाश्ता करून घेतला आणि जावून जागा अडवल्या. सेटवर काम केल्यामुळे तेव्हढी आम्हाला मुभा होती. दिप्तीचं पहिलं नाटक हुकणार होतं, कारण घरी पाहुणे होते आणि मुलांची सोय करून ती परस्पर दुसऱ्या नाटकाला हजार होणार होती. १० वाजता प्रेक्षक प्रेक्षागृहात येवू लागले. ३ घंटा झाल्या आणि बरोबर १०:३० वाजता “मोरूची मावशी” नाटकाला सुरुवात झाली. समितला घरी जायला लागलं होतं त्याच्या मुलांची सोय करायला, पूजा गोखले(समितची सौ.) ही मंडळाची vice प्रेसिडेंट असल्यामुळे तिला तिकडे असणं भाग होतं. मी आणि सुनील बाजुबाजुलाच बसलो होतो. पडदा उघडला आणि आमची २ महिन्यांची मेहनत आम्हाला समोर साकारलेली बघताना खुप मस्त वाटत होतं. प्रेक्षकांमधून ज्यांना माहीत होतं आम्ही सेटवर काम केलंय ते लगेच तिथेच आमचं कौतुक करत होते. आजुबाजुचे, मागचे खांद्यावर, पाठीवर थोपटत तर दूर बसलेले हातवारे, खाणाखुणा करून शाबासकी पोहोचवत होते. आम्ही दोघे ही जरा भाव खाल्ल्यासारखे नंतर नंतर असं खुणावत होतो, नाटक सुरु झालंय वगैरे वगैरे. Detroit वरून ही सगळी टीम आली होती “मोरूची मावशी” हे नाटक घेवून. सगळेच कलाकार उत्तम काम करत होते. कौतुकाची गोष्ट म्हणजे ही सगळी टीम एकत्र स्टेजवर २०१३ नंतर प्रथमच आली होती. विजय काका देखील मध्ये कधीतरी प्रेक्षागृहात दाखल झाले. त्यांनाही ह्या सगळ्यांची कामं बघायची इच्छा होतीच. सगळ्यांनी खुपच बहारदार कामं साकारली. मावशी च्या रोल मधल्या अभिजीत पराडकर ने तर धम्मालच उडवून दिली. ह्युस्टन मध्यल्या रसिकांनी ही प्रचंड हशा आणि टाळ्यांनी अमेरिकेतल्या पाहुण्यांचं खुप कौतुक केलं. अमेरिकेत देखील भारतासारखं talent आहे आणि आपल्या गावाबाहेर ही त्याचं कौतुक होतं ह्याचा प्रत्यय पाहुण्यांना आणि ह्युस्टनकरांना आला असणार यात वादच नाही. मध्यंतरात मग आम्ही काही जणांना भेटलो. आम्ही चक्क कळकट्ट कपड्यांमध्ये होतो कारण ह्या नाटकानंतर दुसऱ्या नाटकाच्या सेटवर काम करायचं होतं. दुसरा अंक सुरु झाला, आणि १ तासाने नाटक संपलं. मराठी मंडळ प्रेसिडेंट अंजु केलर ने सगळ्यांचं कौतुक आणि आभार मानले. मग अभिजीत पराडकर ने ह्युस्टनकरांचे, मराठी मंडळ कमिटीचे आभार मानले. नाटक महोत्सव असल्याने जेवणाची उत्तम सोय होती.
दुसरं नाटक दुपारी ४:३० ला सुरु होणार होतं. १ वाजता पाहिलं नाटक संपलं आणि आम्ही लगेच मागे पहिल्या नाटकाचा सेट उतरवायला गेलो. सेट पटापट बऱ्याच सहकाऱ्यांच्या मदतीने उतरवता आला. मोठ्ठी परीक्षा तर पुढे होती कारण “तीन पायांची शर्यत” ह्या नाटकाचा सेट खुपच challenging होता. समित बरोबर १ - १:१५ पर्यंत पोहोचला तिकडे. कामाला सुरुवात करतच होतो की एकदम संजय दादांनी सगळ्या स्टेजचा कंट्रोल घेतला आणि पटापट आम्हाला कसं काय हवंय ते सांगु लागले. खरोखर किती साधा माणुस, नुसतं आम्हाला Direct करत नाही बसले तर आमच्यापैकीच एक होवून मदतीला ही लागले. लोकेश गुप्ते ने देखील खुप मदत केली. पण खरंच ह्या सगळ्यांमुळे तो अतिशय अवघड असा सेट १:३० तासात उभा राहिला. काही बदल ही संजय दादांनी मान्य केले आणि त्यातून पटकन कसा मार्ग काढता येईल ते बघितलं. नुसती लगबग चालु होती स्टेजवर, आम्ही स्टेजच्या कामात व्यस्त आणि कमिटी मधले property स्टेजवर उभी करत होते. सेट पूर्ण उभा झाल्यावर आम्ही चौघांनी नाटकाचे दिग्दर्शक विजय काकांबरोबर २-३ फोटो काढून घेतले. गम्मत म्हणजे ह्या नाटकाला आम्ही १८ panels तयार केले होते आणि एकूण २९ panels लागले संपूर्ण सेट उभा राहायला. मागे कलाकारांनी exit घेतल्यावर ते प्रेक्षकांना दिसु नयेत म्हणुन covering panels पण लागतात ह्याचा अंदाज आधी आला नव्हता. पण म्हणूनच “मोरूची मावशी” नाटकाच्या सेटच्या panels नी आम्हाला तारुन नेलं. तो नसताच किंवा ते नाटकच नसतं तर खरंच पंचाईत झाली असती. मग आम्ही चौघे ही मागे पटकन जेवायला गेलो. छान मराठमोळा मेनू होता, कोथिंबीर वडी वगैरे. अखेर मग आम्ही आमचे कळकट्ट कपडे बदलुन चांगले कपडे घातले. तेव्हा कुठे माणसात आल्यासारखं वाटलं. आमच्या बायका आमच्या आधी आम्हीच अडवलेल्या जागेवर येवून बसल्या होत्या. पुन्हा काही लोकांनी आमचं तिकडे सेट बद्दल कौतुक केलं. आम्हाला खुपच मज्जा येत होती आणि आतुन थोडंसं टेंशन ही होतं की नाटक काही विघ्नं न येता पार पडु दे. हा सेट तसा खुप कलरफुल होता आधीच्या सेटच्या तुलनेत. पुन्हा एकदा ३ घंटा झाल्या आणि सगळेच व्यावसायिक कलाकारांना बघायला आतुर असलेल्या नाटकाला म्हणजेच “तीन पायांची शर्यत” ला सुरुवात झाली. पडदा उघडला आणि तो भव्य सेट बघुन मी आणि सुनील आम्ही दोघेही खुप खुश झालो. आमच्या बायकांनी लगेच आम्हाला आमचे हात हातात घेवून कौतुकाची थाप दिली. मी आणि सुनील हे नाटक वेगळ्याच प्रकारे अनुभवत होतो. वेगळ्याच प्रकारे म्हणजे प्रत्येक सीन मध्ये कोणी जर कुठल्याही दरवाजा किंवा exit च्या आसपास गेलं की आमचं b. p. शुट व्हायचं ह्याच भितीने की काही पडायला वगैरे नको नाहीतर आमची आणि ह्युस्टन मंडळाची लाज गेली असती. बरं गम्मत अशी की लोकेश आणि संजय दादांना सेट ची बारीक सारीक माहिती होती पण शर्वरीला तेव्हढे बारकावे सेटबद्दल माहीत नव्हते त्यामुळे तिच्या सीन्सना आम्ही चांगलेच टेंशन मध्ये यायचो. एक सीन तर आमच्या कायमचा लक्षात राहील तो असा की त्या सीनमध्ये संजय दादा आणि शर्वरी ची धावपळ किचनच्या सिंकजवळ होती. १-२ वेळा तर शर्वरी almost सिंकवर भार देवून उभी होती आणि तेव्हा त्या मागचे panels खुप हलत होते. त्या वेळेला माझी आणि सुनील ची पाचावर धारण बसली होती. त्याच वेळेला सुनील मला म्हणाले की मी त्या सिंक खालचे screws नीट घट्ट केले नाहीत म्हणुन. मग तर काय आम्ही अजुनच टेंशन मध्ये. आमच्या बायका ही इकडुन खालुन हळु आवाजात म्हणत होत्या की का एवढा धडधड सीन आहे हा इकडे. तो सिंक थोडासा खाली वाकला होता. २-३ मि. ने तो सीन संपला आणि आम्ही इकडे सुटकेचा श्वास सोडला. खरंच कुठले joints कुठे, कसे आणि किती तकलादु आहेत हे आम्हाला बारकाईने माहीत असल्याने प्रत्येक सीन मध्ये कोण कुठे काय करतोय यावरून आम्ही ते नाटक बघितलं. पण एकुण खुप धम्माल आली. १ तासाने मध्यंतर झाला, आम्ही लगेच मागे गेलो आणि संजय दादांना त्या सीनची धम्माल सांगितली. ते म्हणाले आता पुढे काही असे सीन्स नाहीत. पण मी तरी सुनीलना म्हटलं की एवढे आलोच आहोत तर हे ४ screws घट्ट करूनच जाऊ आता. असं नको वाटायला नंतर की आपण इथपर्यंत आलो होतो आणि screws घट्ट नाही केले. पटकन आम्ही ते ४ screws घट्ट केले आणि परत जागेवर आलो. मध्यंतरानंतर नाटक पुन्हा सुरु झालं आणि आम्ही पुन्हा त्याच pressure मध्ये नाटक enjoy करू लागलो. एका सीन नंतर तर पूर्ण black out झाला आणि शर्वरी स्टेजवर होती. त्यात लगेच सुनील म्हणाले मला, ही स्टेजवर असताना black out वगैरे करू नका रे बाबांनो नाहीतर तिला torch वगैरे तरी दाखवा. एवढे हसलो आम्ही तिकडे. पुढच्या १ तासात नाटक संपलं आणि पुन्हा एकदा आम्ही इकडे सुटकेचा भला मोठ्ठा श्वास सोडला. आणि मग आम्ही निर्धास्त झालो की सगळं काही सुरळीत पार पडलं होतं. देवाचे उपकारच मानले होते तेव्हा आम्ही, विघ्न्हार्त्याने त्याची कामगिरी चोख पार पाडली होती. नाटक संपल्या संपल्या विजय काका स्टेजवर आले आणि मग मराठी मंडळ कमिटी आली. काकांनी सर्व कलाकारांची ओळख करून दिली, मंडळाचे आभार मानले. अंजुने आम्हाला सगळ्यांना स्टेजवर बोलावून आमचं कौतुक केलं, आम्हाला भेटवस्तु दिली. सगळ्यात जमेची बाजू ही की आम्ही बनवलेल्या सेटला ऑस्टिन मंडळकडून ही मागणी होती. त्यांनी हाच सेट भाड्याने घेतला होता त्यांच्या प्रयोगासाठी. ह्या सगळ्या मेहनतीचं सार्थक झालं म्हणायचं. नाटक संपल्या संपल्या आम्ही सगळे धडाधड सेट उतरवायच्या कामाला लागलो. ऑस्टिन चे ३ जण होतेच मदतीला. १-१ panel उतरवताना आम्ही त्यांना सूचना करत होतो आणि ते तसं नोट करत होते. १ ते १ १/२ तासात सगळं आवरलं. पाहुण्यांच्या करमणुकीची जबाबदारी आम्हाला पुढचे ३ दिवस व्यवस्थित पार पाडायची होती. तसे आम्ही प्लान्स आखुनच ठेवले होते.
नाटक संपले, सगळ्यांचे निरोप वगैरे घेवून झाले. आमचा डिनर प्लान जपानी हिबाची चा होता. पाहुण्यांना हा हिबाची प्रकार एकदम नवीन होता. विजय काका आणि भुषणला दिप्ती “टोरोज हिबाची डायनिंग” ला घेवून येणार होती. मी मुलांना, पूजा तिच्या मुलांना आणि समित संजय दादा आणि लोकेशला घेवून असे सगळे वेगवेगळ्या गाड्यांमधून तिकडे पोहोचणार होतो. समितच्या गाडी व्यतिरिक्त बाकीच्यांच्या गाड्या वेळेत पोहोचल्या. समितचा फोन आला कळवायला की संजय दादा आणि लोकेशला घरी जावून थोडं ड्रिंक्स घेवून यायचं होतं. रविवार असल्यामुळे हिबाची लवकर म्हणजे १० वाजता बंद होणार होतं. मी तसं तिकडे रिसेप्शन वर सांगुन ठेवलं होतं, पण रविवारी तरी जास्त उशीर ते adjust करणार नव्हते, म्हणुन ते म्हणाले तुमचे गेस्ट ९:४५ पर्यंत आले तर ठीक नाहीतर आम्ही दरवाजा बंद करू. लगेच मी समितला फोन करून जरा घाई करायला सांगितली. प्रयत्न करतो म्हणाला, कसला प्रयत्न? पठ्याला पण त्यांच्याबरोबर थोडी ढोसायची होती. आम्ही इकडे ऑर्डर द्यायला सुरुवात केली. साकी नावाचं प्रसिद्ध जपानी ड्रिंक मी आणि भुषण ने घेतलं, त्याने ते कधीच घेतलं नव्हतं. साकी जरा कोमट येते आणि जास्त काही चढत वगैरे नाही. तांदळाची बनवलेली असते म्हणुन पौष्टिक असं काहीतरी कारण असलं की मनाला अपराध्यासारखं वाटत नाही. उगाच कसले तरी बहाणे असं लगेच मग बायका म्हणतात. सगळी मुलं एकत्र बसली होती. प्रत्येकाने आपापली ऑर्डर दिली. कोणाला व्हेज, तर कोणाला सीफुड platter, चिकन, फिश अशा अनेक ऑर्डरी सोडल्या गेल्या. मला वेगवेगळे फिश ट्राय करायचे होते, त्यामुळे काकांना तसं मी विचारलं, ते ही म्हणाले कर की टेस्ट काय हवं ते. मी आणि मुलं नुकतेच salmon फिश खायला लागल्यामुळे मुलांनी salmon ची ऑर्डर दिली होती. सुप, सलाड ने सुरुवात झाली. पाहुण्यांना ते खुपच आवडलं. थोड्या वेळातच आमचा स्वतंत्र शेफ आला, मग त्याने बऱ्याच करतबी केल्या. पाहुणे एकदम खुश त्या सगळ्या करामती बघुन. फोटो आणि व्हिडिओ शुटींग ही केलं गेलं. आम्ही अनेकदा इकडे आल्यामुळे आम्हाला त्याचं काहीच अप्रुप राहिलं नव्हतं. शेफ ने ऑर्डर प्रमाणे जेवण वाढलं. मी लगेच काकांच्या प्लेटमधून lobster आणि १-२ फिशचं टेस्टिंग केलं, त्यापैकी मला lobster खुपच आवडलं. आमचं जेवण संपतच आलं होतं, इतक्यात समितची गाडी आली, अगदी कट टू कट वेळेत आले होते. ऑर्डर घेणारा ही वैतागला होता, कधी एकदा सगळं बंद करून घरी जातोय असं झालं होतं त्याला. समित, संजय दादा आणि लोकेश ह्यांनी आपापली ऑर्डर पटकन दिली. पण खुप उशीर झाल्यामुळे त्यांचं जेवण बनवायला शेफ काही येवू शकला नाही. त्यांचं जेवण प्लेट मधूनच आलं. त्यांनाही जेवण खुपच आवडलं. जेवता जेवता काका म्हणाले की १ कसिनो २ तासाच्या अंतरावर आहे असं समजलंय, माहीत आहे का कोणाला? मी म्हटलं कसं शक्य आहे? जावून जावून lake charles लाच जाणार ना मग कसं काय बुवा २ तासावर? मग भुषण, लोकेश दोघे ही म्हणाले, १ आहे ओळखीचा, त्याची कालच अंजुकडे ओळख झाली. तो न्यायला तय्यार आहे. त्याला बोलावू का? मी म्हटलं, बोलावंच, मला सुद्धा समजेल कुठला कसिनो जो मला माहीत नाही एवढ्या २ तासावर आहे तो. लोकेश ने लगेच सौरभला फोन केला आणि त्याला तिकडे हिबाची रेस्तराँ मध्ये यायला सांगितलं. तो आणि त्याची बायको रश्मी त्या रेस्तराँ वरूनच जात होते तेव्हा, ते १० मि. मध्ये इकडे पोहोचले. ते आल्या आल्या मी त्यांना विचारलं कुठला कसिनो २ तासावर आहे? तेव्हा त्यांनी lake charles बद्दल च सांगितलं आणि तेव्हा उलगडा झाला की त्यांच्या घरापासुन ते २ तासावर होतं आणि आम्ही बरेच northwest ला असल्यामुळे आम्हाला ते ३ तासावर होतं. मला कसिनो बद्दल अगदीच काही माहीत नाही हे खोटं ठरल्यावर दिप्तीला मनातून आनंद झाला जसा साधारणत: सगळ्याच बायकांना होतो आपला नवरा स्मार्ट आहे समजल्यावर. असो, आपलं कौतुक अजुन किती करावं माणसानं. मग तिकडून कसिनोला तेव्हाच रात्री निघायचा धडाकेबाज प्लान शिजायला लागला. हिबाची कुकींग हॉट प्लेटवरच्या जेवणापेक्षा ही हा प्लान पटापट शिजत होता. मी काही दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सुट्टी टाकली नव्हती, समित ने मात्र पुढचे २ दिवस सुट्टी टाकली होती, त्यामुळे तो कधी ही कुठे ही निघायला तयार होता. सगळ्यांनीच जायचा निर्धार पक्का केला. मीच पटकन तयार नव्हतो, कारण नवीन प्रोजेक्ट आणि मंगळवारी रितसर सुट्टी टाकली असल्याने मी जरा बिचकत होतो सोमवारी दांडी मारायला. विजय काका म्हणाले, अरे चल रे, तू नाही आलास तर आम्ही कोणीच जाणार नाही. म्हटलं लागली वाट, सगळं आमच्याच झोळीत आलं. त्यात दिप्ती त्या सगळ्यांना सामील, म्हणाली, येईल तो, भाव खाईल पण येईल नक्की. जरा थोडासा अजुन फुटेज खाऊन मी ही जायला तयार झालो. मला कुठेतरी असं वाटत होतं की जसं मागच्या वेळेस मी नाटक झाल्यानंतर अचानक सुट्टी घ्यायचा निर्णय घेतला होता तसंच काहीसं होणार आणि अगदी तसंच झालं. ह्या सगळयांबरोबर धम्माल ही येणार होती हे ठाऊक होतं मला. पण मग मी लगेच सांगुन टाकलं की मी काही ड्राईव्हींग वगैरे करणार नाही, समित लगेच ड्राईव्हींग करायला तयार झाला. आता सौरभ आणि समित असे दोन ड्रायव्हर आपापल्या २ गाड्यांबरोबर सज्ज झाले. कसिनो मध्ये शिरताना ओळख पत्र असावं म्हणुन सगळ्या गाड्या आपापल्या घरी वळल्या. रात्री ११:३० वाजता randalls च्या पार्कींग मध्ये भेटायचं ठरलं. सौरभची BMW स्पोर्टस कूप गाडी होती तर समित ची buick suv होती. सौरभ माझ्यामागोमाग माझ्या घरी आला, आम्ही सगळ्यांनीच कुर्ते वगैरे बदलुन कसिनोला साजेसे कपडे घातले. दिप्तीने पटकन काकांना टू-गो कप मध्ये गरम गरम चहा करून दिला. कूप मध्ये मला प्रचंड अडकल्यासारखं होतं त्यामुळे मी समित च्या गाडीतुन जायचं ठरवलं. Randalls मधून आम्ही गाड्या बदलल्या, सौरभच्या गाडीतुन संजय दादा आणि लोकेश तर समित च्या गाडीतुन मी, भुषण आणि काका असे ११:४५ दरम्यान निघालो.
सोमवार, २४ एप्रिल २०१७
एवढ्या रात्री आणि ते ही सोमवारची मध्यरात्र त्यामुळे सगळे रस्ते जे दिवसभर आम्ही ट्राफिक ने तुंबलेले बघतो ते अगदी ओसाड दिसत होते. अशा वेळेस ड्राईव्हींग करायला कोणाला नाही आवडणार? सुसाट चाललो होतो आम्ही, संगतीला जुनी हिंदी गाणी आणि गप्पा ही होत्याच. थोड्या वेळाने काका घोरायला लागले. समितच्या बाजुला बसलेलो असताना झोप कितीही येत असली तरी झोपायची हिंमत होत नव्हती. कारण त्याला आम्ही जागं ठेवणं भाग होतं, गाडीचं व्हील त्याच्या हातात होतं ना. मग जोक्स, किस्से, वगैरे सुरु झाले. आमच्या २ गाड्या १०-१५ मि. च्या अंतरावर पुढे मागे होत्या. मध्येच कुठेतरी सौरभने पाहुण्यांच्या आग्रहाखातर पाहुण्यांना बियर घेतली आणि पुढे प्रवासाला लागले. अंदाजे २-२:१५ वाजता आम्ही golden nugget कसिनो च्या भव्य पार्कींग लॉट मध्ये शिरलो. सौरभ ही १० मि. तच पोहोचला. आम्ही थेट चालत आत शिरलो आणि एका ठिकाणी थांबुन सौरभची वाट बघितली. आत एकमेकांना भेटल्यावर आम्ही पुन्हा वेगवेगळ्या टेबल्सवर गेलो. मी ह्या आधी बरेच वेळा शुक्रवारी किंवा शनिवारी रात्री आलो होतो आणि तेव्हा भरपूर गर्दी आणि रेलचेल बघितली होती, त्या मानाने रविवार रात्र म्हणजे अगदीच शुकशुकाट होता तिकडे.आत येत असतानाच त्या कसिनो समोर मी नेहमी जात होतो तो कसिनो दिसला. “ला बर्ज” असं त्याचं नाव होतं, त्या कसिनोबद्दल बऱ्याच गोष्टी मी ह्या सगळ्यांना आधीच सांगितल्या होत्या. golden nugget मध्ये मी पहिल्यांदाच गेलो होतो. काकांनी १ पोकर टेबल पकडलं आणि ते तिकडे लगेच सुरु झाले खेळायला. त्या आधी तिकडे अजुन ३-४ जण खेळत होते. १०$ एन्ट्री होती प्रत्येक गेमला, खरं तर प्रत्येक गेम ला २५ $ लागायचे. काकांना नशीब छान साथ देवू लागलं आणि खेळ त्यांचा चांगला रंगायला लागला. मी त्यांच्यामागे उभा राहून गेम बघत होतो, इच्छा होत होती खेळायची पण एकदा वाटे बसुया, मग वाटे थोडा वेळ बघु खेळ मग उतरुया मैदानात. हो नाही हो नाही करत मी तिकडे नुसताच अर्धा तास उभा होतो. भुषण, समित, सौरभ इकडे तिकडे नुसतेच फिरत होते. संजय दादा आणि लोकेश स्लॉट मशीन वर बसून खेळत होते. थोड्या वेळाने संजय दादा ४ कार्ड पोकर वर खेळायला गेले. १० मि.तच त्यांचे हात तिकडे भाजून निघाले. मग काका सोडल्यास कोणालाच नशीब साथ देईना. मी लगेच म्हटलं, बाजुच्या “ला बर्ज” ला मी नेहमीच जातो, तिकडे बघुया का नशीब अजमावून? सगळे तयार झाले, काका म्हणाले माझं चाललंय तर येतो थोड्या वेळाने ओहोटी सुरु झाली की. बरं कसिनो मध्ये १ गम्मत अशी असते की तुम्ही कुठेतरी खेळताय आणि पैसे खर्च करताय असं भासवलं तरी बियर किंवा ड्रिंक्स फुकट मागवता येतात. ही आयडिया सगळ्यांना माहीत असल्याने, भुषण ने पहिली बियर घेतली आणि बाकीच्यांनी ही acting न केल्याने भुषण चं सगळे कौतुक करू लागले. मग आम्ही golden nugget मधुन “ला बर्ज” ला जायला निघालो, जाताना ती १ छोटीशी बियर सगळे वाटुन पित होतो. तीर्थ हातावर पडावं तेव्हढी किमान येत होती प्रत्येकाच्या वाट्याला. ह्याला म्हणतात दांडगी हौस. त्या २ इमारती जवळ जवळ दिसत असल्या तरी ३:३० च्या दरम्यान चालत निघालो तेव्हा भरपूर लांब जाणवायला लागल्या. आणि आम्ही चुकीच्या दिशेने गेल्यामुळे जरा जास्तच चालायला लागलं, किती तो उत्साह असावा ना जुगारातून पैसा कमवायचा. अर्धा पाऊण मैल तरी असावं ते अंतर, पण आम्ही सगळे १ रात्रीत कमाई काही होते का या आशेने निघालेलो असताना ते अंतर तेव्हा जाणवत नव्हतं. एकदाचे आम्ही माझ्या लाडक्या कसिनो मध्ये शिरलो आणि टेबल १०$ पेक्षा कमी आहे का ते शोधायला लागलो. कसलं काय पण, golden nugget पेक्षा इकडे सगळे रेट जास्त होते. सगळे वैतागले माझ्यावर मनातुन, पण कोणी तसं काही बोललं नाही. संजय दादा आणि लोकेश आमच्या आधीच तिकडे आलेले होते ह्याच आशेवर की इकडे टेबल रेट कमी असेल म्हणुन. आता एवढं चालुन आल्यावर पुन्हा माघारी फिरायचं म्हणजे पुन्हा अर्धा पाऊण मैल पाय तुडवा. त्रास खरा त्या गोष्टीचा होत होता आणि मग ते २ इमारतीतलं अंतर खुपच आहे असं तेव्हा वाटू लागलं. थोड्या वेळातच काका ही तिकडे पोहोचले आणि जास्त रेट बघुन निराश झाले. आता आलोच आहोत तर थोडं इकडेही नशीब साथ देतंय का ते बघु म्हणुन काका, संजय दादा, लोकेश वेगवेगळ्या टेबल वर सुरु झाले. काकांना थोड्या वेळातच ओहोटीची चाहुल लागल्याने आधी होतो तिकडे बरे होतो असं वाटू लागलं. ह्या सगळ्या प्रकारात ३५-४० मि. फुकट गेली. मी मनात विचार केला जर न खेळता गेलो तर मग काय मज्जा. म्हणुन मग मी, समित आणि काका पुन्हा golden nugget मध्ये जाण्यासाठी निघालो. पुन्हा तेवढं चालायला जीवावर आलं होतं, पण काकांनी मागचा १ shortcut दाखवला आणि त्या खुश्कीच्या रस्त्याने आम्ही golden nugget ला पोहोचलो. ५-१० मि. चाच फरक असेल पण त्या रस्त्याने लवकर पोहोचलो असंच वाटत होतं. कदाचित आता तिकडे जावून खेळायचे वेध लागले होते म्हणुन ही असेल. ज्या टेबलवर काका आधी बसले होते तिकडे जावून मी पुन्हा उभा राहून खेळ बघु लागलो. पुन्हा आत्ता खेळू की थोड्या वेळाने खेळु हा खेळ मनात सुरु झाला. आज आपला दिवस असेल आणि भरपूर पैसे जिंकूनच जावू अशा स्वप्नवत विचाराने मी खेळायचा निर्धार केला. साधारणत: सुरुवात प्रत्येकाची अशीच होत असते. जे गेले आहेत आणि खेळले आहेत त्यांना हे नक्कीच पटेल. पावलं ATM कडे वळली कारण पाकिटात १ दमडी पण नव्हती. पुन्हा तिकडे तोच विचित्र खेळ, ३००$ काढू की २००$. शेवटी २००$ वर शिक्का मोर्तब केला आणि पैसे काढले. गम्मत म्हणजे बँक चार्जेस म्हणुन आणखी ६.९९$ लावले गेले. २००$ काढुन खेळतोय ह्याचं काही वाटत नव्हतं पण त्या ६.९९$ चा फालतू फटका मनाला जास्त बोचत होता. गम्मत आहे ना? मनुष्य स्वभाव, दुसरं काय. २ कडक नोटा मशीन मधुन बाहेर आल्या. पोकर टेबलवर गेलो आणि त्या होस्टला १००$ ची नोट दिली त्याने मला खेळण्यासाठी काही coins दिले. प्रत्येक गेमला २५$ प्रमाणे मला फक्त ४ च चान्सेस होते. त्यात जर काही पत्ते चांगले असतील तर आवक नाही तर सब कुछ जावक. पहिले २-३ डाव काही खास लागलं नाही आणि मग थोडंफार तारून निघेन असे पत्ते आले आणि मग जरा आवक सुरु झाली. मनाला खुप बरं वाटलं. मी टेबलावर बसल्या बसल्या १ मार्गारिटा ची ऑर्डर देवून टाकली. सौरभ माझ्या मागेच होता त्याने लगेच त्याच्या १ soft ड्रिंक ची ऑर्डरही माझ्यासोबत दिली. त्याने तेवढ्यात वाहत्या नदीत हात धुवून घेतले. पण सगळे परोपकारी मित्र असंच तर करतात. मी ही अगोदर अगदी नवीन असताना असंच केलंय. म्हटलं ना सगळे परोपकारी मित्र शेवटी. गेम हळु हळु सुरु झाला आणि मला त्यात मज्जा येवू लागली. मोठं असं विशेष काही लागत नव्हतं पण गेम मध्ये टिकून होतो. कधी आवक तर कधी जावक असं चालु होतं. थोड्या वेळाने समित टेबलवर आला. तो १ तासा आधी गाडीत जरा डुलकी काढायला गेला होता. त्याला नंतर सकाळी ३ तास ड्राईव्ह करणं भाग होतं. गाडी चालवताना त्याला झोप काढायची मुभा नसल्याने तो निमुटपणे गाडीत झोपून आला होता. तो माझा गेम बघु लागला आणि त्याची ही खेळायची इच्छा झाली. माझ्याव्यतिरिक्त टेबलवर आणखी २ अमेरिकन होते. त्यांचे ही उतार चढाव चालु होते गेम मध्ये. समित ने मग एंट्री घेतली. मग माझ्या बाजुचा काळू कंगाल झाला. काका खेळत होते तेव्हापासुन तो टेबलवर खेळत होता. १०००$ च्या आसपास चा फटका त्याला बसला असावा. टेबलवर मग मी , समित आणि १ गोरा बसला होता. माझे १००$ संपले, मी लगेच दुसरी नोट काढुन त्या होस्टला दिली. तोपर्यंत माझ्या २ मार्गारिटा आणि १ बियर ढोसुन झाली होती खेळता खेळता. नशीब म्हणावं तसं साथ देत नव्हतं. थोड्या वेळाने लोकेश आणि काका सुद्धा तिकडे आले. लोकेश सोडल्यास आम्हा बाकीच्यांना काही विशेष लाभ होत नव्हता, पण पुढे लागतील ह्या आशेवर अजुन हावरटपणा करत पैसे खर्च करत बसलो होतो. २००$ ही संपले माझे, समित पण किल्ला कसाबसा लढवत होता. काकांची पण अवस्था बिकट होती, सगळेच वैतागले होते, मनासारखा गेम काही लागत नव्हता. काका मध्येच सांगत होते की १ गेम असा लागेल की सगळं काही वसुल होईल. म्हणुन आम्ही सुद्धा त्याच आशेवर अजुन खेळत बसलो होतो, आवक नव्हती नुसती जावकच होती. मध्ये मध्ये मी १-१ ड्रिंक मागवत होतोच. १ वेळ अशी होती की भुषण आणि संजय दादा सोडल्यास बाकी आम्हीच त्या टेबलवर खेळत होतो. त्यामुळे मराठीतुन गप्पा, जोक्स, शेरे चालु होते. कुठल्या तरी १ गेमला लोकेश वैतागला आणि त्याने आई.... वरून १ शिवी हळुच हासडली. त्या वेळेला तो होस्ट म्हणाला की sir please speak in english only on the table. आम्ही सगळे चकितच झालो, कारण आम्ही सगळे मराठीतुन धम्माल करत होतो तेव्हा तो काही बोलला नाही आणि अचानक का लोकेशला ज्ञान? मग मी म्हटलं, की त्याला ती शिवी माहीत असावी म्हणुन तो चिडला असेल. सगळे हसले आणि पुढे खेळु लागले. काका गेम मधुन बाहेर पडले, पडले म्हणजे नाईलाज च होता कारण त्यांचे ही पैसे संपले होते. मग आमचा गेम बघत बसले होते. मध्येच ते त्या होस्टला म्हणाले ही की तु आत्तापर्यंत कोणाला तरी जिंकवलं आहेस का रे? म्हणजे अशाच आर्विभावात पण इंग्लिश मधुन विचारलं होतं. त्या एकट्या होस्ट ने आम्हा सगळ्यांना कंगाल करून सोडलं होतं, नुसतंच गोड गोड बोलत होता, पत्ते काही छान वाटत नव्हता. थोड्या वेळाने एकुण ४ मार्गारिटा आणि २ बियर संपवून मी ही गेम मधुन कंगाल होवून बाहेर पडलो. ४००$ चा फटका बसला होता. मध्ये मी २००$ संपले तेव्हा पुन्हा एकदा २००$ काढायला गेलो तेव्हा ६.९९$ चा अजुन १ दणका बसला होता, त्या वेळेला मनाची चिडचिड झाली होती की आधीच एकत्र काढले असते तर एकदाच ६.९९$ द्यावे लागले असते. पुन्हा त्या २ वेळा ६.९९$ द्यावे लागल्याचा त्रास जास्त होत होता. लोकेश नो profit नो loss वर खेळत होता. ६ वाजण्याच्या आसपास लोकेश १००$ प्लस होता आणि त्याने वेळीच बाहेर पडायचा निर्णय घेतला. मग संजय दादा आणि भुषणला बोलवायला सगळे golden nugget मधुन “ला बर्ज” ला गेलो, पण ह्या वेळेस गाडीतून गेलो. मला दारु चांगलीच झाली होती, इतकी की नीट स्पष्टपणे बोलता ही येत नव्हतं. नॉर्मल मराठी ही उच्चारताना कष्ट पडत होतं. नशीब आपण संस्कृत बोलत नाही नाहीतर काहीही उच्चाराण्यापेक्षा खाणाखुणाच कराव्या लागल्या असत्या. मी नॉर्मल आहे हे दाखवायचा माझा पुरेपूर प्रयत्न चालु होता पण बाकीच्यांना तसा अंदाज आला असावा. समित च्या बाजुला बसुन मी त्या अवस्थेतच ऑफिस ला इमेल केला की मला काल रात्री अचानक ऑस्टिनला जावं लागल्याने मी unplanned सुट्टी घेत आहे. त्या tight अवस्थेत ही मी असा न चुकता इमेल लिहिला होता त्याचंच मला केवढं कौतुक. आत्मविश्वास वाढतो म्हणतात अशाने. समित गाडीत बसला होता आणि आम्ही बाकी सगळे दोघांना बोलवायला गेलो. सगळ्यांची जमवाजमव ६:३० पर्यंत झाली. सकाळी सकाळी हवा तशी थंड होती, डोळ्यावर प्रचंड झोप होती. आलो तसेच पुन्हा सौरभ आणि समित च्या गाड्यांमधून सगळे निघालो. भूकावलेले होते सगळे, रात्रभर नुसती दारु ढोसली होती, खायला काहीच नव्हतं. १ तासाच्या अंतरावर IHOP ला नाश्ता करायचं ठरलं होतं. त्या १ तासाच्या प्रवासात बरेच वेळा डोळे बंद होत होते पण समित च्या बाजुला बसुन मी झोपू शकत नव्हतो. IHOP ला पोहोचलो, कोण किती जिंकलं ह्याची नको असलेली, मनाला त्रास देणारी चर्चा सुरु झाली. मग त्यावरून खुप जोक्स झाले, त्यावेळी आमच्या व्यतीरिक्त त्या IHOP मध्ये इतर कोणीच इतके खिदळत नव्हते. मी म्हटलं सगळ्यांना की ही ट्रीप काही परवडली नाही मला, आज पर्यंत मी ४००$ मध्ये ४ मार्गारिटा आणि २ बियर कधीच प्यायल्या नाहीत. सगळे हसले, काका लगेच म्हणाले मग त्या हिशोबाने तर मी ५००$ च्या २ black coffee घेतल्या, ह्याला काय म्हणशील? मग तर सगळ्यात मोठ्ठा हशा पिकला तिकडे. एकमेकांना चिडवत, खिल्ली उडवत आमचा नाश्ता चालु होता. काका मध्येच म्हणाले की आजचं नुकसान भरून काढायचं असेल तर आज रात्री पुन्हा कासिनोला चक्कर टाकावी लागेल. एवढे हसलो होतो तेव्हा आम्ही. मग त्यावरून भरपूर जोक्स आणि शाब्दिक कोट्या झाल्या. सगळेच उत्तम कलाकार त्यामुळे शाब्दिक कोट्या तर स्पर्धा लागल्यासारख्या सगळे करत होते. नाश्ता झाल्यावर IHOP च्या बाहेर आम्ही गप्पा मारत उभे होते आणि काका आणि संजय दादा जुने कुठले तरी कोणाचे किस्से सांगत होते. सौरभला मोकळं केलं कारण त्याचा घरी जायचा रस्ता वेगळा होता, मग सगळे आम्ही समितच्या गाडीत बसलो. ह्या वेळेस संजय दादा पुढे बसले, मी आणि भुषण एकदम मागे होतो. गाडी सुरु झाल्या झाल्या संजय दादा घोरायला लागले आणि समितच्या मांडीजवळ पडायला लागले. थोड्याच वेळात आम्ही सगळे झोपी गेलो, एकटा समित बिच्चारा गाडी हाकत होता. २ तासात आम्ही आमच्या घरी पोहोचलो, संध्याकाळी समितच्या घरी bar-b-q पार्टी होती. डोकं खुप जड झालं होतं, आडवं होवून झोप खुप आवश्यक होती. काकांनी दोन्ही वेळेला गाडीत झोप काढल्याने ते एकदम फ्रेश होते. मुलं उशीरा उठली होती, दिप्ती त्यांना शाळेत सोडायला चालली होती. मी लगेच आवरलं, कपडे बदलले आणि आतल्या बेडरूम मध्ये झोपायला गेलो. भुषण ही झोपला, मी झोपण्यापूर्वी काकांना मी ते २०१२ साली आले होते त्या सगळ्याची १ गोष्ट लिहिली होती ती वाचायला दिली. दिप्ती थोड्या वेळातच आली आणि काकांबरोबर गप्पा मारत बसली. मला अंधुक काहीसं अधुन मधुन ऐकू येत होतं, पण उठुन बाहेर येवून गप्पा मारण्याची ताकद नव्हती. काकांना वेगवेगळ्या प्रकारचं जरा हटके असं meat खायचं होतं. त्यांनी मला खुप आधीपासुन ते सांगुन ठेवलं होतं, आणि मी तसं शोधुन ही ठेवलं होतं. आमच्या घरापासून ते लांब होतं त्यामुळे दिप्ती लगेच जवळपास असं काही मिळतं का ते शोधु लागली. शेवटी तिने मला उठवलंच आणि मला काही options शोधायला लावले. मला अजिबात जेवायचं नव्हतं, सकाळचा IHOP चा नाश्ता एवढा होता की अजुन काही गेलंच नसतं. भुषणलाही उठवलं आणि आम्ही जवळच्या एका Texan bar-b-q ला गेलो. तिकडे आम्ही मेनु चाळत असताना आम्हाला टेक्सासच्या अर्माडीलो प्राण्याची १ डिश दिसली. काका म्हणाले हाच खायचा आज, दिप्ती ह्यात काही नव्हतीच खाण्यात वगैरे. मला जास्त काही नकोच होतं जेवायला, मी म्हटलं तुम्ही जे काही घ्याल त्यातलं मी थोडं खाईन. दिप्तीला सलाड, आणि आम्हांला १ quail आणि १ अर्माडीलो ची डिश ऑर्डर केली. ऑर्डर येईपर्यंत अर्माडीलो नेमका दिसतो कसा ते आम्ही गुगल वर बघु लागलो. आयुष्यात असं कधी केलं नव्हतं, एखाद्या प्राण्याची डिश मागवायची आणि तो नेमका दिसतो कसा बाबा म्हणुन गुगल करायचं आणि मनात विचार करायचा की खायला बरा लागेल का नाही ते. देवा! किती बदललोय मी. थोड्या वेळाने डिशेस आल्या आणि आम्ही अर्माडीलो चे पिसेस वाटुन घेतले, quail चे ही पिसेस वाटुन घेतले. अर्माडीलो चा १ तुकडा तोंडात घातला आणि समजलं की ह्यात meat नव्हतंच, भोपळी मिरची आणि यल्लो चीज होतं. त्यांना विचारलं तर म्हणाले हे अर्माडीलो सारखं दिसतं पण इकडे कोणीही त्याचं meat खात नाहीत आणि विकतही नाहीत. असला पोपट झाला होता आमचा. पण मग quail आवडलं आम्हाला. जेवण संपलं, मी घरी आलो आणि दिप्ती त्या दोघांना घेवून शॉपिंगला गेली. मी घरी येवून संध्याकाळच्या तयारीला लागलो. सगळे घरातले ड्रिंक्स १ मोठ्ठ्या बास्केट मध्ये भरले.
संध्याकाळी आम्ही ७ च्या आसपास समितकडे पोहोचलो, बघतो तर काय संजय दादा आणि लोकेशने bar-b-q चा ताबा घेतला होता. भुषण ही त्यांना सामील झाला. त्यांना ते सगळं करताना खुप मज्जा येत होती. काय मस्त वातावरण होतं, मुलं lawn मध्ये खेळत होती, दिप्ती, समित आणि पूजा ड्रिंक्स आणि जेवणाची तयारी करत होते, काका नेहमीप्रमाणे फोनवरून कोणाशी तरी बोलत होते, संजय दादा, लोकेश आणि भुषण ग्रिलकडे मग्न होते आणि मी ह्या वेगवेगळ्या क्षणांचे फोटोज टिपत होतो. थोड्या वेळाने १ जण ह्या कलाकारांना भेटायला आले. मग हळुहळु चिकन, फिश तयार झाल्यावर त्यावर ताव मारत गप्पा सुरु झाल्या. संजय दादा इतके साधे आहेत की मुलं खेळत असताना त्यांचा चेंडू तळ्यात गेला तर ते लगेच पाण्यात जावून त्यांनी तो मुलांना काढुन दिला. दारूची नशा हळुहळु चढू लागल्यावर मग संजय दादा एकदम मुड मध्ये आले आणि स्वत:हून किस्से सांगु लागले. दिप्तीला हाच प्रश्न पडला होता की ह्या सगळ्यांना किस्से सांगायला कसं काय उदयुक्त करायचं. काकांनी गोव्याच्या “तीयात्र” आणि “झाडपट्टी“ ह्या दोन संस्थांबद्दल बरीच माहिती दिली. त्यानंतर एकदम संजय दादा आणि लोकेश ने बरेच किस्से अभिनय करून दाखवले, एवढे हसलो होतो आम्ही. शुटींग, नाटकाच्या वेळेस घडलेल्या गंमती जमती ऐकायला खुपच धम्माल येत होती. आनंद ह्या गोष्टीचा की आम्ही कसलीच विनंती न करता ते स्वत:हून हे सगळं अगदी मनमोकळ्यापणे सांगत होते. कालच्या नाटकात प्रेक्षकांना कळलेले नसतील आणि काही ठिकाणी कशी फजिती झाली ती ही दोघांनी अभिनय करून रंगवली. इकडे येण्याआधी ज्या ज्या कोणाकडे राहिले होते तिकडले काही विनोदी किस्से ही रंगवले. ह्या कलाकारांना जेव्हा सांगितलं गेलं होतं की तुमची सोय कान्हेरे आणि गोखल्यांकडे केली आहे तेव्हा त्यांना पोटात गोळा आला होता की ह्यांच्याकडे जर सोहळं वोहळ असलं तर वाट, पण आम्ही देखील ह्या सगळ्याची मज्जा घेतोय कळल्यावर मस्त गट्टी जमली आमची सगळ्यांची. भरपूर गप्पा, ड्रिंक्स झालं, मग दिवसाचा शेवट गोड म्हणुन दिप्तीने खास तिरामिसु केक आणला होता त्यावर “TPS (तीन पायांची शर्यत) at KAGO” असं कोरून आणलं होतं. KAGO म्हणजे कान्हेरे आणि गोखले. साधारणत: १ ते १:३० दरम्यान आम्ही समित कडून आमच्या घरी यायला निघालो. निघताना काका म्हणाले कासिनोला जायचा प्लान बनला मध्यरात्री तर कळवा आम्हाला. एकदा पुन्हा हशा पिकला. घरी येवून खुप दमलो असल्या कारणाने मी लगेच झोपी गेलो. दिप्ती, काका आणि भुषण बरोबर गप्पा मारत ३ वाजेपर्यंत बसली होती.
मंगळवार, २५ एप्रिल २०१७
आदल्या रात्री खुप उशीर झाला असला तरी मला सवयीप्रमाणे सकाळी लवकर म्हणजे ७ वाजता जाग आली. ९-१० वाजेपर्यंत सगळे उठले. मुलांनी सुट्टी घेतली होती शाळेला. नाश्ता पाणी झाल्यावर भुषण मोकळा झाला, मी त्याला घेवून gym ला गेलो. काकांना सलोन ला घेवून गेलो, त्यांच्या मनासारखी केशरचना त्यांनी करून घेतली. केशरचना म्हणजे बोली भाषेत (hair-style).
दुपारी दिप्ती च्या मेनु लिस्ट प्रमाणे तिने जेवण बनवलं आणि पहिल्यांदा पाहुणे घरी निवांत जेवले होते. आम्ही दोघेही धन्य पावलो होतो. सकाळपासुन मी आणि समित त्या दिवशीचे प्लान्स फोनवरून ठरवत होतो. आम्ही पाहुण्यांना incredible pizza company ला नेणार होतो. तिकडे आम्ही सगळे lazer tag गेम खेळणार होतो. आणि मग तिकडुन १ pawntoon २ तासासाठी भाड्याने घेतली होती कॉनरो लेक मध्ये. आमच्याकडे ३ च्या आसपास सगळे भेटणार होते आणि मग तिकडुनच सगळे एकत्र निघणार होतो. जेवणं वगैरे होतंच होती की समित चा फोन आला सांगायला की संजय दादा आणि लोकेश ला त्या lazer tag गेम मध्ये काही विशेष रस नव्हता म्हणुन मग तो बेत रद्द करावा लागला. त्यांना घरी येवून गप्पा मारायच्या होत्या. किती छान ना? ३ - ३:३० पर्यंत समित सगळ्यांना घेवून आमच्या घरी आला तेव्हा आम्ही व्हेंटीलेटर मराठी सिनेमा बघत बसलो होतो, ते सगळे ही बघु लागले. मग निघण्याच्या ५-१० मि. आधी आमचं घरात १ फोटोशुट झालं. २ गाड्यांमधून सगळा ताफा कॉनरोच्या दिशेने निघाला. पूजा आमच्या गाडीतून येत होती. सगळ्या मुलांना एकत्र यायचं असल्याने सगळी मुलं समित च्या गाडीत बसली होती. २ गाड्या एकत्र निघाल्या पण मग pawntoon वर बियर हवी म्हणुन मी एका gas स्टेशन वरून बियर कॅन्स उचलले. काकांनी विचारलं की काही क्लासिकल cd आहे का ऐकायला? मी लगेच पं. उल्हास कशाळकरांची cd लावली. मी आणि काका पुढे, मागच्या सीटवर पूजा, दिप्ती आणि भुषण होते. दिप्ती मध्ये बसली होती. भटियार राग सुरु झाल्या झाल्या दिप्तीच्या दोन्ही बाजुचे अतिशय जाणकार रसिक झोपून घोरायला लागले होते. मी म्हटलं दिप्ती राग सुरु झाल्या झाल्या तुझ्या दोन्ही बाजुचे तानपुरे बोलायला लागले बघ. १ तासाने आम्ही कॉनरो लेक ला पोहोचलो, समित ने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. पुढच्या १०-१५ मि.मध्ये आम्ही आमच्या खाजगी pawntoon मध्ये प्रवेश केला. ह्या आधी आम्ही ओकलाहोमा मध्ये ह्याचा अनुभव घेतला होता, ७ वर्षांनी हा योग जुळून आला होता. घरून निघताना काकांनी काही विशिष्ठ कपडे घालावेत का, म्हणजे त्या बोटीत आत पाणी शिरत नाही ना मग शूज घालु, जीन्स घालु वगैरे वगैरे, हे दिप्तीला विचारलं होतं, आधीच्या आमच्या अनुभवाप्रमाणे दिप्ती ने ही त्यांना एकदम शांत असतं सगळं तेव्हा जीन्स, शुज सगळं चालेल असं सांगितलं होतं. बोटीची सगळी इत्थंभूत माहिती घेवून आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. काय खुश होते सगळे पाहुणे, त्यांच्यासाठी हा १ वेगळाच अनुभव होता. २ तास ही बोट आपली, बसायला ऐसपैस जागा, मनात येईल तेव्हा कोणीही बोट चालवा, कधी बियर, कधी काय हवं ते खा. पाहुणे एकदम खुश, आणि मग आम्ही ही खुश. २ तासांमधली १०- १५ मि. सुरुवातीला वाया गेल्याने बोट निघताना दिप्ती म्हणाली त्या मालकाला सांगा की आम्ही १० मि. उशीराच येवू परत. एका जवळच्या हद्दीपर्यंत समित ने चालवली बोट. मग संजय दादा बसले चालवायला, किती मस्त ना, त्यांना इकडे रस्त्यावर गाडी चालवायला लायसन्स लागत असले तरी इकडे तशी काही भानगड नव्हती. मी लगेच वेळ न दवडता बियर चे कॅन्स फोडले आणि सगळ्यांना दिले. लोकेश, मी आणि भुषण ने बियर सुरु केली. मुलांनी चिप्स वर ताव मारायला सुरुवात केली. फोटोसेशन सुरु झाले. टर्मिनल वरून निघताना आम्ही बोटी बरोबर १ ट्युब ही घेतली होती. ती ट्युब दोरीने बोटीला लावलेली असते. पाण्यात गेल्यावर त्या ट्युबवर बसायचं किंवा पोटावर आडवं व्हायचं, ट्युब घट्ट धरायची आणि मग पाण्याच्या प्रवाहाबरोबर जात राहायचं बोट जशी जात राहील तशी. मोकळं रान दिसल्यावर कशी लहान मुलं धावत सुटतात तसं काहीसं आजुबाजुला पाणी बघुन झालं होतं. ह्याच उत्साहात आम्ही बरेच पुढे पुढे जात राहिलो. संजय दादांना बोट चालवायची खुप मज्जा येत होती, ते मध्येच वेग वाढवत होते. सगळं एकदम व्यवस्थित चालु होतं, आम्ही अजुन पुढे गेलो. आणि अचानक लाटा जरा मोठ्या लागु लागल्या आणि काही कळण्याच्या आतच धबाधबा पाणी आत येवू लागलं. बोट ही मग लाटांच्या जोराने वेगाने वर खाली होवू लागली. पुढच्या ५ मि.च्या आत आम्ही सगळे पूर्णपणे भिजलो होतो अगदी डोक्यापासुन तळपायापर्यंत. दिप्ती प्रचंड घाबरली होती, तसे सगळेच मनातुन घाबरले होते, मुलं आरडा ओरडा करू लागली घाबरुन. दिप्ती फक्त तिची भिती चेहऱ्यावर आणि बोलून दाखवत होती. ५-१० मि.तच त्या बोटीचं अख्खं स्वरूपच बदललं होतं. बियर कॅन्स, चिप्सच्या पाकीटा मध्ये पाणी गेलं होतं. मुलं त्यातही पाणी मिश्रित चिप्स खात बसली होती. आम्ही ही खुप उत्साही तशीच बियर ही पित होतो. बियर आयुष्यात कधी कुणी पाणी मिसळुन प्यायली नसेल. तो ही अनुभव घेवून बघितला. लाटांच्या जोराने बोट जशी जोरजोरात हलत होती तशी आमची हालत खराब होत होती. बरं हे असं काही होईल हे ध्यानीमनी ही नसल्याने तशा तयारीने आलो नव्हतो आम्ही. संध्याकाळचा हलका वारा आल्यावर तर अजुनच वाट लागायची थंडीने. त्या प्रचंड लाटांमध्ये वेग कमी केला असता तर अजुन अडकलो असतो आम्ही. आमच्या सगळ्यांमध्ये पूजा थोडी जाडी असल्या कारणाने बोट डावीकडे कलंडली की आम्ही सगळे पूजा ला उजवीकडे balance करायला बसायला सांगायचो. नंतर मग असं काही झालं की मग फक्त पूजा म्हटलं नुसतं की तिला कळायचं आणि मग ती वैतागायची. तिने तिकडेच १ पण केला की पुढच्या १ वर्षात बारीक होवून दाखवते ते. चला कुठला निर्णय तर झाला त्या परिस्थितीत. त्याच वेगात आम्ही माघारी फिरलो, कुठल्याही दिशेने पाणी येत होतं. एकदा सगळीकडे पाणी गेल्यावर मग मस्त आम्ही सगळे भिजायचंच आहे असं समजून मज्जा घेऊ लागलो. काका सुद्धा पूर्ण ओले झाले आणि मग दिप्तीवर वैतागले होते कारण त्यांची जीन्स आणि शुज सगळे ओले झाले होते. आम्ही खुप समजावलं त्यांना की असा काही आधी आम्हाला अनुभव नव्हता आला. Pomeranian कुत्र्याला अंघोळ घातल्यावर ते कसं दिसतं तशी आमची सगळ्यांची hair style झाली होती. पण सगळ्यांनी मज्जा ही खुप घेतली होती ह्या सगळ्या एपिसोडची. थोडं माघारी फिरल्यावर लाटांचा जोर कमी झाला आणि मग दिप्तीला त्या ट्युबवर जायची इच्छा झाली. आधी आपण खुपच घाबरलो आणि रडलो, हे सगळे काय म्हणतील काय घाबरट आहे मुलगी ह्या विचाराने आता मी ह्यांना दाखवतेच मी किती शूर आहे ते असं काहीसं दिप्तीच्या मनांत आलं असावं. तिला मी मागे ट्युबवर बसवायला मदत केली आणि ती शूर खरंच गेली ही लगेच आणि त्याची मज्जा घेत होती पाण्यात आणि आम्ही इकडुन बोटीवरून तिचे फोटोज आणि व्हिडीओज घेत होतो. मग तिला बघुन मुलांना ते करायची इच्छा झाली, पण आम्ही एवढी रिस्क घेवू शकत नव्हतो. आयुष त्यातल्या त्यात मोठा असल्यामुळे दिप्ती परत आल्यावर तो गेला. पण काही कारणाने त्याला तोल सांभाळता आला नाही ट्युबवर आणि तो पाण्यात पडला, नशीब चांगलं की त्याने हात घट्ट पकडुन ठेवले होते पण तसा तो थोडा घाबरलाच होता आणि तिकडेच रडायला लागला. आम्ही त्याला इकडुनच शांत केलं आणि हळु हळु त्याला बोटीकडे ओढु लागलो. अगदी जवळ आल्यावर संजय दादा पटकन पायातले बुट काढुन त्याला पाण्यात उतरुन उचलायला गेले. त्यांना त्याच्या त्या शौर्याचा अभिमान वाटला. आदिश मग हट्टाला पेटला, पण मग त्याला थोड्या वेळ पाण्यात बुचकळून काढला, तो ही खुश मग. सगळ्यात गम्मत म्हणजे १ ह्युस्टनस्थित ह्या टीमला भेटायला येणार होता, त्याला ह्या कलाकारांची मुलाखत घ्यायची होती. त्याला आम्ही लेक कॉनरो ला बोलावलं होतं, पण सगळे ओले झाल्यावर तो प्लान ही रद्द करावा लागला. बोट परत करायची वेळ जवळ आली, आजू-बाजूचा परिसर सुंदर दिसत होता. सगळे स्वत: कसलीही धडपड न करता भरपूर भिजले होते त्यामुळे थोड्या वेळाने कडकडुन भुक ही लागली होती. पूजा ने मस्तपैकी चटनी sandwich करून आणले होते, त्याचा सगळ्यांनी फडशा पाडला. अचानक संजय दादांना १ कल्पना सुचली, त्यांचा पुढचा प्रयोग साक्रामेंटोला होता. तिथल्या प्रेक्षकांना आमंत्रणाचा व्हिडीओ शुट करायचा होता. ते म्हणाले आपण ह्या सगळ्यांबरोबर ह्या बोटीतच तो व्हिडीओ शुट करूया. आम्ही न सांगता त्यांना आम्हाला ह्या व्हिडीओ मध्ये सामील करावंसं वाटलं यात सगळ्यात जास्त आनंद होता. सांगुन काय कोणीही केलं असतं हो पण त्यांच्याकडून स्वत: हे आलं होतं त्याचं कौतुक विशेष होतं. मग मी बोटीचा ताबा घेतला आणि अगदी हळु ५ मैल प्रती तासाने बोट चालवू लागलो. पहिल्या टेकला तर संजय दादांनी भरपूर डेल्या वाटल्या. डेल्या वाटणं म्हणजे भरपूर चुका करणं. नाटकाच्या क्षेत्रातला हा नेहमीच्या वापरातला शब्द आहे. १ टेक नंतर व्हिडीओ फायनल केला. आणि मग मी माझे गाडी पार्कींग चे कौशल्य पणाला लावून ती बोट उत्तम रीतीने टर्मिनल मध्ये पार्क केली. आणि २ तासाची ती आमची धम्माल सफर तिकडे संपली, कोणालाच ती संपू नये असंच वाटत होतं. बराच वेळ ओले असल्याने सगळ्यांनी आपला मोर्चा घाईघाईने बाथरुमकडे वळवला. सगळे मग घरी परतायला आपापल्या गाडीजवळ पोहोचले. संजय दादा आणि लोकेशने त्यांचे ड्रिंक्स समितच्या गाडीची डिकी उघडुन बनवले. समितने जाताना मुलांना आणि भुषण, संजय दादा, लोकेशला आमच्या घरी जाण्यासाठी निघाला, आम्हीही लगेच पाठोपाठ निघालो. मध्येच काकांना aligator tail ची डिश घ्यायची होती. मगरीची शेपटी म्हणायला जास्त किळस वाटते म्हणुन इंग्लीश मध्ये म्हटलंय, किळस काय कमी होत नाही तरी सुद्धा. शेवटी ती मगरीचीच शेपटी ना. डिश काय होती तर aligator tail nuggets म्हणजे मगरीच्या शेपटीची भजी. चुईज मधुन बाकीचं जेवण घेतलं आणि घराकडे निघालो. आमच्या घरी सगळे भेटलो आणि मग समितकडे जेवायचा प्लान बनला पुन्हा. त्याच्या घरी गेल्या गेल्या आम्ही मगरीच्या शेपटीची भजी खाल्ली, चिकन सारखीच लागली. मग मी, समित, लोकेश, भुषण आणि विजय काका रमीचा एक १५० points नॉन pack गेम खेळलो. सगळेच expert असल्यामुळे मला सावधानतेने खेळण गरजेचं होतं. मी पूर्वी हा गेम खुप खेळलो असल्यामुळे माझा स्कोर खुपच कमी होता. संजय काका शेवटी अगदी एन्ट्री घेणार होते गेम मध्ये, पण गम्मत म्हणजे ते यायच्या आधीच मी रमीचा pack जिंकलो आणि मग सगळ्यांच्या कौतुकाचा धनी ठरलो. दिप्तीची कॉलर एकदम कडक मग तर नवऱ्याने बाजी मारल्याने. १०$ चा गेम होता, ४०$ ची कमाई झाली होती. मध्ये आमचा इकडे गेम रंगात असताना संजय दादांनी दिप्ती आणि पूजा बरोबर आग्रह करत करत ५ Tequila shots मारले. दिप्ती तर आयुष्यात १ च्या वर कधी गेली नसेल तिने ५ shots मारले हे बघुन मी चक्रावूनच गेलो. म्हणाली संजय दादांच्या आग्रहाला बळी पडुन दोघींनी मारले ते shots. मग झालं तिचं डोकं जड. गप्पा टप्पा झाल्या, दुसऱ्या दिवशी ऑफिस असल्यामुळे थोडं आटोपतं घेतलं. सगळ्यांचा निरोप घेत आम्ही आमच्या पाहुण्यांना घेवून घरी निघालो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांना ऑस्टिन ला जायला निघायचं होतं. मला काका आणि भुषण ने २०$ रमीच्या गेमचे दिले, मी ही असू दे कशाला वगैरे म्हटलं पण मग भुषण ने सांगितलं की बाकी कुठलीही उधारी राहिली तर चालते पण रामीमधले किंवा जुगारातली उधारी ठेवली तर पुन्हा कधीही जिंकता येत नाही. मी आपला त्यांचा मन राखुन ते ४०$ घेतले. मग म्हटलं आता लोकेश आणि संजय दादांची उधारी राहू देत, कारण मनाला तेव्हढच समाधान की एवढ्या मोठ्या कलाकारांकडून मला काही येणं आहे आणि ते असंच मला क्रेडिट म्हणुन असू दे आयुष्यभर.
बुधवार, २६ एप्रिल २०१७
सकाळी मी ५ ला उठलो, आवरलं आणि ऑफिसला आलो. घरी दिप्ती, काकांना आणि भुषण ला shopping ला घेवून गेली. मुलं शाळेत गेली आणि सगळे हळुहळु मुळ पदावर येत होते. मी आदल्या दिवशीच सगळ्यांचा निरोप घेतला असल्याने ध्यानीमनी ही नव्हतं की संध्याकाळी पुन्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा निरोप घेता येईल ते. मी ५ वाजण्याच्या आसपास घरी पोहोचतच होतो की दीप्तीचा मला फोन आला आणि म्हणाली की पुढच्या १० मि.त आलास तर सगळ्यांची भेट होईल म्हणुन. ५:१५ पर्यंत मी पोहोचलो आणि सगळे बाहेर उभेच होते. सगळ्यांना गळाभेटी झाल्या, पुन्हा भेटु वगैरे आश्वासनं झाली. मी गंमतीने म्हटलं ही की माझ्यासाठी एवढा वेळ का थांबलात? मी काही देणं लागतो का? तर काका म्हणाले गेले ३-४ दिवसांत तुम्ही आम्हाला खुप काही दिलंत, इतना तो बनता है. मला इतकं बरं वाटलं, की ह्या सगळ्यांना जाण्यापूर्वी ही भेट घ्यावीशी वाटली ह्यातच सगळं आलं. संजय दादा आणि लोकेश ने तर बाजावलंच की मुंबईला आलात की भेटल्याशिवाय परत जायचं नाही अजिबात. किती मस्त नाती विणली गेली होती ह्या ३-४ दिवसांत. सगळे गाडीत बसुन निघायला लागल्यावर दिप्तीला प्रचंड भरून आलं आणि ती रडु लागली. ही सगळी मंडळी अगदी घरातल्यांसारखी राहिली होती, वाईट वाटणार होतंच. खरं तर जवळची माणसं जातात तेव्हा रडु येतंच. पुढच्या २ मि.त सगळे पाहुणे ऑस्टिनच्या वाटेने निघत अदृश्य झाले.
Tag der Veröffentlichung: 17.06.2017
Alle Rechte vorbehalten
Widmung:
About Suyog's "Teen Payanchi Sharyat" natak team visited Houston in April 2017. Some of the Artists were staying at our place. Illustrated all the fun here.