Cover

Homemade Vacation


होममेड व्हेकेशन

२८ एप्रिल २०१२, शनिवार.

जणु काही दिवाळी किंवा मोठ्ठा सण असवा तशी आम्ही दोघांनी घराची साफ़सफ़ाई केली होती. नुसती त्या दिवशीच नव्हे तर दिप्ती त्या मागचा अख्खा आठवडाच कामाला लागली होती. तिची तय्यारी नेहमीच अगदी जय्यत असते. पण हे सगळं कशासाठी सुरु होतं. सुयोगची "वा गुरु" ह्या नाटकाची टीम ह्युस्टन मध्ये येणार होती त्या शनिवारच्या रात्री. ते सगळे डॅलसवरुन शनिवारचा प्रयोग आटपुन ह्युस्टनमध्ये दाखल होणार होते. आम्हाला दोघांनाही खुपच उत्सुकता होती त्यांचं स्वागत करायची.
आम्ही दोघेही त्या रात्री मुलं झोपल्यावर बाहेरच्या हॉलमध्ये बसुन गप्पा मारत होतो. दिप्ती त्यांच्याशी कायम फ़ोनवरुन अपडेटेड होती. आता अर्ध्या तासाच्या अंतरावर आले, वगैरे वगैरे. आणि अखेर मध्यरात्रीच्या १२:१० वाजता त्यांची व्हॅन आमच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली. आम्ही दोघेही बाहेर गेलो. व्हॅनमध्ये लेडी ड्रायव्हर धरुन एकुण ९ जण होते. डॅलस-ह्युस्टन हा साधारणत: ४ ते ५ तासाचा ड्राइव्ह आहे. आणि आधी १ प्रयोग करुन लगेच एव्हढा प्रवास त्यामुळे सगळेजण जणु फ़ुलं जशी दर रात्री कोमेजावीत तसे कोमेजलेले दिसत होते. फ़ुलं ह्यासाठी म्हटलं कारण हे कलाकार नेहमीच आपल्या समोर टवटवीत होवून येत असतात.

कलाकारांमध्ये दिलीप प्रभावळकर, गिरिजा काटदरे, पूर्णिमा तळवळकर, अद्वैत दादरकर होते. नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे आणि बॅकस्टेजचे प्रकाश खोत, किशोर इंगळे आणि जितेंद्र पाटील असे होते. आधी ठरल्याप्रमाणे अद्वैत आणि ३ जण बॅकस्टेजचे आमच्या घरी उतरणार होते. दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे राम वाटवे च्या घरी आणि गिरिजा काटदरे, पूर्णिमा तळवळकर अनिल गोखल्यांच्या घरी उतरणार होते. पहिला हॉल्ट आमच्याकडे होता, अद्वैत आणि बाकीजणांनी त्यांचं सामान आमच्या घरी ठेवले. पण एक अडचण अशी होती की हे सगळे इकडे उतरल्यावर राम कडे अख्खा सेट उतरवताना मनुष्यबळ तितकसं नव्हतं, मग मी आमच्या गाडीतुन ह्या ४ जणांना राम च्या घरी घेवून गेलो. सगळ्यांच्या मदतीने सेट सेफ़ली उतरवला. आणि मग सगळ्यांचा निरोप घेवून आम्ही आमच्या घरी आलो मध्यरात्री च्या साधारणपणे १ वाजता. दिप्तीने अति उत्साहाच्या भरात ह्या सगळ्यांसाठी त्यांना न विचारताच प्रवासाचा क्षीण निघुन जावा म्हणुन पिठलं भात केला होता. पण एव्हढ्या रात्री सगळ्यांनी लवकरात लवकर झोपणं पसंत केलं. म्हणजे उपाशी नव्हते ते, मस्तपैकी कुठेतरी मध्ये प्रवासात थांबुन हवं ते नॉन-व्हेज खायला मिळालं होतं त्यांना, मग त्यावर पिठलं भात कसं काय? त्यांना मग त्यांच्या गाद्या, पांघरुणं, चादरी देवून, लाईट्स, बाथरुम च्या सुचना करुन आम्हीही झोपायला गेलो.

२९ एप्रिल २०१२, रविवार.
सकाळी मी पावणे सातच्या सुमारास उठलो. सगळेजण गाढ झोपलेले होते. दिप्तीही मग ७ वाजेपर्यंत उठली आणि आवरुन कामाला लागली. तिने आठवड्या अगोदर नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण असं प्रत्येक दिवसाचं श्येड्युल लिहुन किचनच्या भिंतीवर पिन-अप केलं होतं. ही सगळी टीम नाटकांतरचे पुढचे २ १/२ दिवस पाहुणचार घेणार होती, त्यासाठी हे दिप्तीचं किचनमधलं श्येड्युल होतं. त्या दिवशी नाश्त्याला इडली-चटणी होती. ८:३० पर्यंत एक एक करुन सगळे जण उठले. उठले म्हणजे काय स्वत:हुन नाहीच, आमच्याकडे त्यांना उठवायला २ जोकर्स होते ना. आयुष आमचा मोठ्ठा मुलगा आणि आदिश छोटा. त्या चंगु-मंगुनी सगळ्यांना उठवलं आणि ५ मि.त त्यांची गट्टीही जमली सगळ्यांशी. अद्वैत आणि जितेंद्र पाटील (जितु) आम्हाला आधीपासुन चांगलेच परिचयाचे होते. अद्वैतला मी आमच्या लहानपणापासुन ओळखत होतो, त्याचा भाऊ ओंकार दादरकर आणि मी, आमची सांगीतिक मैत्री होती, त्याचे आई वडील आणि माझे आई वडील चांगले सांगीतिक मित्र. त्यामुळे आम्ही तसे एकमेकांना चांगलेच परिचयाचे होतो. दिप्ती आणि अद्वैतने पूर्वी एकत्र अनेक संगीत नाटकांत कामं केलेली होती. त्यामुळे ते दोघेही उत्तम मित्र होते. शिवाय तिने सुयोगच्या २-३ नाटकांत कामं केल्यामुळे जितुशी चांगली ओळख होती. किशोर आणि प्रकाश आम्हाला आणि त्यांना आम्ही नवीन होतो. त्यामुळे १ स्वाभाविक जो संकोच असतो सुरुवातीचे १-२ तास तसा तो होता. आमची मुलं निरागसपणे तो संकोच कमी करण्य़ात हातभार लावत होती. आम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणांनी भारतात जाता येत नसल्याने, आपल्या घरी एव्हढे पाहुणे अचानक बघुन मुलंही खुपच खुश होती. त्या दोघांनाही त्यांचे भाव मांडता येत नसले तरी ते किती खुश होते ते आम्हाला जाणवत होतो. लगेच मग सगळ्यांची मुलांशी गट्टी जमली. नाश्ता-पाणी झाल्यावर अंघोळीच्या आधी तर अद्वैत चक्क दोन्ही मुलांशी घरातच त्यांच्या वयाचा असल्यासारखा खेळायला लागला. आम्हाला दोघांना मात्र त्या दिवशी वेळेचं भान ठेवणं आवश्यक असल्याने आम्ही त्या सगळ्यांना पटापट आवरायला सांगितलं. दिप्तीने अगदी साग्रसंगीत जेवणाचा प्लॅन आखला होता. म्हणजे अगदी श्रीखंड होतं गोड्धोड म्हणुन. तसं श्रीखंड मीच केलं होतं, अहो काय विशेष नाही त्यात. घरात एग-बीटर असला ना की सगळं सोप्पं आहे चक्का फ़ेटणं. पाहुण्यांसाठी दिप्तीच्या मैत्रिणीकडुन स्पेशल चिकन-मसाला येणार होतं. आम्ही घास-फ़ुस वाले (व्हेजीटेरियन) असल्यामुळे आम्हाला भेंडी मसाल्याची भाजी आणि सोल-कढी होती. नाटक दुपारचं असल्याने सगळे जरा बेतानेच जेवले.
मला त्या सगळ्यांना बरोबर दुपारी १२:३० पर्यंत राम च्या घरी नेणं भाग होतं. ह्युस्टनमधला त्यांचा शो ३:३० चा होता. १ वाजेपर्यंत आम्ही सगळे राम च्या घरुन बेरी सेंटरला पोहोचलो. राम च्या घराहुन बेरी सेंटर अगदीच जवळ होतं. स्टेजचा ताबा मिळाल्या मिळाल्या किशोर, जितु आणि प्रकाश कामाला लागले सेट उभारायच्या. मराठी मंडळाचे कमिटीतले आणि बरेच उत्साही लोक तिकडे मदतीला आले होते. आश्चर्य म्हणजे तो सेट उभारायला नाटकातले कलाकार सुद्धा मदत करत होते. १ ते १ १/२ तासात अख्खा सेट उभा राहिला. बेरी सेंटरचं स्टेज आणि ऑडिटोरियम खुपच अप्रतिम होते. मुंबईतल्या चांगल्या थियेटरची आठवण होत होती. तिकडे घरी दिप्तीने मुलांची आवरण्याची जबाबदारी घेतली होती. ह्या वेळेस पहिल्यांदाच आम्ही आदिशला बेबी सिटींगला सलग ५-६ तास ठेवणार होतो, जेणेकरुन आम्हाला दोघांना नाटक बघता आलं असतं. बेबी सिटींग पण कोण हो तर आमची चांगलीच ओळखीची सई बापट, अचला आणि चंद्रहास बापट ह्यांची मोठी मुलगी. ते आमचे चांगलेच फ़ॅमिली फ़्रेंड आहेत. सईने हे बेबी सिटींग नुकतंच प्रोफ़ेशनली सुरु केल्याने आम्ही निर्धास्त झालो होतो. तरीही आदिश आणि सई एकमेकांना तसे ५-६ तासांसाठी नवीनच. ह्या आधी नेहमीच आम्ही आलटुन पालटुन कार्यक्रम बघत आलो होतो. जास्त वेळेस मीच शास्त्रीय संगीताच्या मैफ़ेलींना जात असतो. केवळ दिप्ती मुळे मला हे इकडे शक्य होतं. नाहीतर खुपच कठीण आहे मुलांची सोय करुन असं काही एन्जॉय करणं. पण ह्या वेळेला दिप्तीने ठरवलंच होतं की नाटक दोघांनी दुसरया रांगेत बसुन बघायचं. कित्ती वर्षांनी हा योग जुळुन आला होता. मनात थोडीशी धास्ती होती की जर आयत्या वेळेस सई चा फ़ोन आलाच तर मी जाणार होतो नाटक सोडुन. बरयाच वर्षांनी दिप्तीला नाटक ह्या विषयात राहायला मिळणार होतं, त्यामुळे तिची उत्सुकता स्वाभाविकपणे माझ्याहुन कईक पटीने जास्त होती, आणि म्हणुनच आम्ही हा निर्णय घेतला होता. दुसरया रांगेत अगदी स्टेजच्या सेंटरला मी २ सीट्स अडवून ठेवल्या होत्या. नाटक सुरु होईपर्यंत आम्ही दोघेही मागेच ग्रीन रुम मध्ये कलाकारांना काय हवं नको ते बघत होतो. मंडळाची माणसं होतीच हे सगळं व्यवस्थित करायला, पण दिप्तीला सगळे चांगलं ओळखत असल्याने ती हक्काची मदतनीस वाटत होती सगळ्यांना. त्यात मग आम्ही दोघांनी दिलीप काकांबरोबर २-३ फ़ोटोज काढुन घेतले. दिलीप काका एव्हढे चांगले आहेत मनाने की ते स्वत: म्हणाले की १ अजुन जरा क्लोज-अप मध्ये काढ. त्यांच्या त्या दिवसातला तो पहिला फ़ोटो असावा, त्यांना काय माहीत होतं की नाटकानंतर लोक त्यांचे एव्हढे फ़ोटो काढुन त्यांना बेजार करणार होते ते.
तिसरी घंटा झाली आणि आम्ही दोघांनी आमची सीट पकडली. प्रेक्षकवर्ग येवून बसुन तोपर्यंत सेटल झाला होता. अनाउंसमेंट झाली, ऑडिटोरियममधले लाइट्स बंद झाले आणि अनाहुतपणे आम्ही दोघांनी हात हातात धरला. मला अचानक मी मुंबईतल्या पार्ल्याच्या दीनानाथ हॉल किंवा बोरिवलीच्या ठाकरे मध्ये नाटक बघतोय की काय असंच वाटलं. मी आणि दिप्तीने पूर्वी खुप नाटकं बघितली होती मुंबईत. त्यावेळेच्या सगळ्या आठवणी सरकन त्या अंधारतही मनातुन धावत गेल्या. नाटक सुरु होण्याआधी त्या अंधारात आमचा हात हातात असताना दिप्ती नेहमी मला गालावर बेसावधपणे पापी द्यायची, होय गालावरच, आणि मग मी ऑकवर्ड व्हायचो. ह्या वेळेस ते ही आठवलं आणि सुपर योगायोगाने आम्ही दोघांनी त्या अंधारात एकमेकांकडे बघितलं. तेव्हा त्या अंधारात आमच्या लुकलुकत्या डोळ्यांनी एकमेकांना ती आठवण सांगितल्याचे भाव आमच्या चेहरयावर होते. पण प्रत्यक्षात ती आठवण उतरणार नव्हती त्या वेळेस हे दोघांनाही समजत होतं. कदाचित लग्नानंतर ९ वर्षांनी, २ मुलं झाल्यावर जसं सगळ्यांचं होतं तेच झालं असेल. पण आम्ही दोघे खुपच खुश होतो.
नाटक खुपच अप्रतिम होतं. मी वास्तविक अद्वैतचं काम अगदी पहिल्यांदाच बघत होतो आणि तेही एव्हढ्या जवळुन. "जावई माझा भला" मधला त्याचा अभिनय मी बघितला होता पण ते टी. व्ही. वर, प्रत्यक्षात नाही. सगळ्यांनी उत्तम कामं केली नाटकात. मध्यंतरात पुन्हा आम्ही दोघेही मागेच ग्रीन रुममध्ये. तिथल्या गमतीदार गप्पा ऐकत होतो. मी नेहमीच बघितलंय की कलाकारांना कुठल्याही प्रयोगाच्या मध्यंतराच्या वेळेस कुठले तरी विनोदी प्रसंग, अनुभव आठवतात आणि मग ते तिकडे सांगत असतात. ते ऐकायला खुपच मज्जा येत होती. दिलीप काकांनी सुद्धा १-२ किस्से सांगितले. मध्यंतर संपला, मी जास्त टेंशन मध्ये होतो कारण समजा आदिशसाठी फ़ोन आलाच तर मला एव्हढं चांगलं नाटक सोडुन जावं लागणार होतं. नाटक संपलं, मंडळाने सर्वांचे आभार मानले. विजय काकांनी सर्व कलाकारांची ओळख करुन दिली. आश्चर्य म्हणजे अद्वैतचं नांव घेतलं तेव्हा प्रेक्षकांमधुन शिट्ट्या आल्या, सगळ्यात मोठी पावती होती ती अद्वैतच्या कामासाठी ह्युस्टन च्या प्रेक्षकांकडुन. अपेक्षेप्रमाणे सगळे सोपस्कार झाल्यावर सर्वांनी कलाकारांभोवती गराडा घातला होता. दिलीप काका तर अगदी त्या सगळ्यांत हरवुन गेले होते. नशीब की ते चांगलेच उंच असल्याने त्या गर्दीतुनही ते कुठुनही दिसत होते. नाटकानंतरचा हा कार्यक्रम तब्बल १ तास तरी चालला. मी मंगळवार आणि बुधवार ऑफ़िसला जाणार नव्हतो. पण नाटक झालं, नाटकानंतरचा तो सगळा माहोल बघितला आणि तेव्हाच सोमवारी सुद्धा सुट्टी घ्यायची हे मनाने अगदी पक्क केलं. दिप्तीला ते मी रात्री नेहमीप्रमाणे उशीरा संगितलं. ती खुपच खुश झाली.
नाटकानंतर सगळ्यांनी राम कडे डिनरला भेटायचं ठरलं होतं. मुलांना सई कडुन राम कडे आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती प्लॅन प्रमाणे. मी तडक बापटांच्या घरी निघालो. दोन्ही मुलांनी खुप को-ऑपरेट केलं होतं. मी पोहोचेस्तोवर आदिश झोपून उठला होता आणि आमच्या दोघांची वाट बघत सई च्या पोटावर झोपला होता. त्याचे डोळे आम्हा दोघांपैकी एकाचा तरी चेहरा कधीही बघायला मिळेल या आतुरतेने दरवाज्याकडे लागले होते. मी पोहोचेपर्यंत तो शांत होता, मी तिकडे पोहोचताच तो अगदी हापसा-हापशी रडायला लागला. मी त्याला जवळ घेतलं आणि पाठीवरुन हात फ़िरवला. माझी ती शाबासकीच होती त्याला, कारण त्या दिवशी त्याने खुपच मोठ्ठं काम केलं होतं आमच्या दोघांच्या दृष्टीने. आयुष चांगलाच स्वतंत्र झाल्याने त्याचा काहीच त्रास नव्हता. दोघांचे कपडे बदलुन, सईचे मनापासुन आभार मानुन मी दोघांना घेवून राम कडे आलो.
राम च्या घरी नुसती झुंबड होती तेव्हा. आदिश आणि दिप्ती, माय लेक भेटले ५-६ तासांनी. दोघेही रडले भरपुर. आदिश मोकळा झाला, स्वत:चं कौतुक करायला लोकांमध्ये मिसळला. पूर्णिमाने दोघांना बघितल्यावर बरेच फ़ोटो काढले. आदिश, रुही (रामची धाकटी मुलगी) हे मग कलाकारांसाठी सेलिब्रिटी ठरले होते. त्यांना कडेवर घेतलं जात होतं, फ़ोटो काढले जात होते, शुटींग होत होतं. आयुष मात्र त्याच्या वयाचं तिकडे कोणी नसल्याने अगदी एकटा पडला होता. रामचा मोठा मुलगा रोहिल घरी आला नव्हता, म्हणुन आयुषचा अपेक्षाभंग झाला होता. मी ते जाणलं होतं पण एव्हढी गडबड होती की मी "रोहिल लवकरच येईल" हे आश्वासन देण्यापलीकडे काही करु शकत नव्हतो. त्यात अद्वैत नाटकानंतर त्याच्या ओळखीच्यांबरोबर थोडा बाहेर गेल्यामुळे आयुषला तोही दिसत नव्हता. इकडे डिनर, गप्पा, धम्माल, फ़ोटो सेशन, शुटींग चालुच होतं. मागे रामने हळु आवाजात शास्त्रीय संगीत लावलं होतं. मधुनच कधी गोंगाट कमी झाला की ते ऐकु येत होतं. थोड्यावेळाने अद्वैतची एंट्री झाली. एव्हढ्या गडबडीत कोणला कळालंच नाही तो आल्याचं. आयुषने मात्र अचानक त्याला जाऊन मिठीच मारली. त्या गडबडीत, गोंधळात सुद्धा माझ्या नजरेने ते दृश्य अचुक हेरलं होतं. आम्ही भावंडं लहानपणी आमचा मामा आल्यावर ज्या प्रकारे धावत जात असु तसा तो धावत जाऊन बिलगला होता. आयुषला त्या वेळेला त्याच्या वयाचं कोणीतरी आल्यासारखं वाटलं होतं. तो सहसा इतका फ़्रेंडली होत नाही पटकन कोणाशी, पण सकाळी अद्वैत घरात मुलांबरोबर खुप फ़ुटबॉल खेळला होता, त्यामुळे अद्वैतला बघुन आयुषला तो आपल्या जवळचा असल्यासारखा वाटला असावा. त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की मी अमेरिकेत राहायचा निर्णय घेतलाय तो बरोबर तर आहे ना? आयुष आणि आदिश अनवधानाने त्यांच्या एकुलत्या एक सख्ख्या मामापासुन दुर तर जात नाही आहेत ना? त्यांना मामाचं प्रेम भरपुर मिळायलाच हवं. त्यांचा मामा सुद्धा खुपच प्रेमळ आहे.
एकीकडे फ़ोटोसेशन, शुटींग चालुच होतं. सगळेजण अगदी हावरटासारखे, कधीच मिळणार नाहीत म्हणुन ओरबाडुन घ्यावेत असे फ़ोटो काढुन घेत होते, त्यात आम्हीही आलोच. दिलीप काका तर अगदी केविलवाणे दिसत होते पण एकदाही कोणाला फ़ोटोवरुन हिरमुसलं केलं नाही. खरंच खुपच साधे आणि मनाने चांगले आहेत ते.
मध्येच विजय काकांना मी वॉल-मार्टला घेवून गेलो. त्यांना पुढच्या प्रयोगाआधी नवीन खुर्ची हवी होती नाटकातली. तिकडे एक अर्धा तास गेला असेल आमचा. त्या छोट्याशा प्रवासात विजय काकांशी नाटकाविषयी खुप गप्पा मारता आल्या. मग आम्ही परतलो.
११ वाजले होते तोपर्यंत. मुलं खेळुन एव्हढी दमली होती की वॉकमन मधली बॅटरी डाउन होताना कसा आवाज येतो तसं काहीसं बोलत होती. बाकी बरेचजण आपापले आवडीचे फ़ोटो काढुन घरी परतत होते. फ़ेसबुक ह्या ताज्या फ़ोटोंच्या प्रतीक्षेत होतं, कारण हे ताजे फ़ोटो दुसरया दिवशीपर्यंत फ़ेसबुकवर पडणार होते. आम्ही ही निघायची तयारी केली. तिथुन येताना आमच्या बरोबर अद्वैत, किशोर आणि प्रकाश होते. जितु त्याच्या भावाबरोबर नाटक संपल्या संपल्याच अदृश्य झाला होता. तो एकदम बुधवारी एअरपोर्ट ला उगवणार होता.
रात्री ११:३० पर्यंत आम्ही घरी आलो. मुलांनी सुद्धा त्या दिवशी पुढे अर्धा तास घेतला झोपायला. मुलांचं सुद्धा आपल्यासारखंच असतं, कोणी घरी पाहुणे आले की त्यांना खेळायचं असतं, झोपायचं नसतं लवकर. किशोर आणि प्रकाश नी मग निवांत सकाळच्या उरलेल्या चिकन मसाल्यावर ताव मारला. राम कडे सगळं व्हेजीटेरियन मेनु होता त्यामुळे त्या दोघांनी तेव्हढी भुक शिल्लक ठेवली होती असं त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यात मागे चालु असलेल्या शास्त्रीय संगीतामुळे देखील थोडं कमीच गेलं जेवण त्यांना. मी पुढे अर्धा तास ह्या तिघांबरोबर जरा टाइमपास गप्पा मारुन, दुसरया दिवशीचा प्लॅन सांगुन झोपायला गेलो.

३० एप्रिल २०१२, सोमवार.

सकाळी मी ७ वाजता उठलो. आदल्या रात्री मला अद्वैतने बजावल्याप्रमणे त्याला मी लगेच उठवलं. त्याला जिम मध्ये जायचं होतं एक्सरसाइज करायला. त्याचा हा पहिला अमेरिका दौरा असल्यामुळे तो खुपच एक्साइटेड होता. त्याला सगळ्या गोष्टींची मज्जा घ्यायची होती. जिम ला जाण्यापूर्वी आम्ही बाहेर पॅटिओ (बाल्कनी) मध्ये गप्पा मारायला आलो. गप्पा मारायचं कारण म्हणजे त्याला सिगारेट ओढायची होती. मग त्या संधीचा फ़ायदा घेवून मी जे काही नवीन विनोदी लिहायला सुरुवात केली आहे त्याबद्दल मार्गदर्शन करायला त्याला विचारलं. अद्वैत नाट्यशास्त्राचा रितसर पदवीधर आहे, उत्तम दिग्दर्शक, उत्तम आभिनेता असल्यामुळे मला त्याच्या टीप्स चा नक्कीच फ़ायदा होणार होता. आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. मध्येच चहाचे २ कप आतुन बाहेर सरकले. तेव्हा दिप्ती उठल्याचं कळालं. ती नेहमी प्रमाणे तिचं किचन शेड्युल पाळायला लागली. मी आणि अद्वैत जिममध्ये गेलो. १ तास चांगला एक्सरसाइज झाला. मग त्याला अपार्टमेंट कॉम्प्लेक्स दाखवलं. त्याला स्विमींग पुल दाखवल्यावर लगेच उतरायचीच इछ्छा झाली पण मी त्याला कंट्रोल करायला भाग पाडलं आणि घरी आणलं. नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी होती, जेवायला तिच्या मैत्रीणीकडुन पाहुण्यांसाठी फ़िश-करी येणार होती. पाहुणे दुसरया दिवशीही खुश होते. सकाळचा बाहेर पडायचा काही विशेष प्लॅन नव्हता. अद्वैत त्याच्या एका ओळखीच्या मावशीकडे जेवायला आणि मग कुठे तरी फ़ार्महाउसला जाणार होता. तो संध्याकाळी परत आल्यावर सगळे फ़ॅक्टरी आउटलेटला जाणार होतो. संध्याकाळी ५ ला निघुया असं मी अद्वैतला जाताना सांगितलं, म्हणजे त्याप्रमाणे मावशीला प्लॅन करता येणार होता.
अद्वैत गेल्यावर बाहेरची १-२ कामं संपवून मी घरी आलो. हातात २ तास होते आउटलेटला निघण्यापूर्वी. किशोर आणि प्रकाश खुपच छान आमच्यात मिसळुन गेले होते. एकमेकांमधला परकेपणा साफ़ विरला होता. मग एकदम विचार आला आमच्या दोघांच्या मनात आणि लगेच राम कडे फ़ोन लावला. विजय काकांना फ़ॅक्टरी आउटलेटला येणायाबद्दल विचारलं, त्यांना कल्पना आवडली. मग मी त्यांना लगेच रामकडे घ्यायला गेलो. आम्हाला त्यांना आमच्या घरी घेवून यायचं होतं. विजय काका घरी आले, आल्या आल्या दिप्तीला हक्काने "माझ्यासाठी चहा कर" असं म्हणाले, आम्हा दोघांनाही खुप बरं वाटलं. आम्ही १ १/२ तास खुप गप्पा मारल्या. खुप मोकळे आहेत ते बोलायला. खरंतर त्यांना बोलायला खुपच आवडतं. मग ते अगदी कुठल्याही विषयावर सुरु होतात. निघताना दिप्तीने सगळ्यांसाठी स्ट्रॉबेरी डेझर्ट केलं होतं. सगळ्यांना खुपच आवडलं. विजय काका हाफ़ पॅंटमध्ये आले होते आणि तेही खाकी रंगाच्या. किशोर आणि प्रकाश नी त्यांना ती बदलायची सुचवलं. मग त्यांनी १ आयडिया केली. आत गेले आणि उलटी घालुन आले. आतल्या बाजुला वेगळा रंग होता. वेगळा म्हणजे एकदम कॉमिक रंग होता, पण ते बिनधास्त असल्यामुळे त्यांना काही त्याचं विशेष वाटत नव्हतं.
आम्ही मग फ़ॅक्टरी आउटलेटला जायला निघालो. अद्वैत काही तोपर्यंत पोहोचला नव्हता. त्याला फ़ोन करुन मध्ये कुठेतरी भेटायचं ठरलं. त्याचे मावशी आणि काका त्याला सोडायला आले होते. आमच्या गाडीत मग आम्ही सगळे जमलो एकदाचे तिकडे जायला. आयुष सुद्धा आमच्याबरोबर आला. विजय काकांना श्लॉटझकी फ़ुड आउटलेट खुप आवडतं. मग काय गाडी शिरली श्लॉटझकी मध्ये. आयुषसाठी १ पिझ्झा आणि काकांनी त्यांचं फ़ेवरेट बर्गर घेतलं. तिथुन फ़ॅक्टरी आउटलेटचा ड्राइव्ह २० मि. चा होता.
सगळ्यांना आवडलं ते, खुपच मोठ्ठं होतं ते. १-२ तास तिकडे नक्कीच कमी पडणार होते. अद्वैतने तिकडे बरयापैकी शॉपींग केलं. काकांनी १ टोपी घेतली प्युमा कंपनी ची. २ तास तरी गेलेच ह्या सगळ्यात. विजय काकांना मला रात्री राम कडे सोडणं भाग होतं. त्यांना कोणाकडे तरी डिनरला जायचं होतं. त्यांना सोडल्यावर आम्ही उरलेलो घरी आलो. येताना डॉमिनोज चा पिझ्झा घेवून आलो. रात्री मी आणि अद्वैत चा स्पोर्टस बार मध्ये जायचा प्लॅन होता. त्यामुळे तो अजुनच एक्साइटेड होता. मी बियर किंवा हार्ड ड्रिंक्स घेणार नाही हे सांगितल्यावर तो वैतागला. मी त्याला मी ह्या वर्षी तरी पाळणार आहे असं म्हटलं. तो म्हणाला मे महिन्यात नवीन वर्ष उजाडणार आहे ह्या वर्षी. मला खुप हसु आलं त्याचं. मग आम्ही जवळच टी.जी.आय.एफ़. ला गेलो. त्याने २ बियर घेतल्या. मी १ स्ट्रॉबेरी-लेमनेड घेतलं. आम्ही खुप गप्पा मारल्या. मी नुकतंच थोडंफ़ार लिहायला लागल्याने ह्या फ़िल्डबद्दल मला खुप काही जाणुन घ्यायचं होतं. मी माझ्या बरयाच प्रश्नांचं त्याच्याकडुन शंकानिरसन करुन घेतलं. तो सुद्धा मस्त आहे बोलयला. मोकळा आहे खुप मनाने, राखुन काही बोलत नव्हता. साधारणत: १२ वाजता रात्री आम्ही घरी परतलो. किशोर आणि प्रकाश हिंदी पिक्चर बघत होते. त्या सगळ्यांना दुसरया दिवशीचा प्लॅन सांगुन मी झोपायला गेलो.

१ मे २०१२, मंगळवार.

सकाळी लवकर उठुन, आवरुन आम्हाला सगळ्यांना नासा ला निघायचं होतं. नासा म्हणजे ह्युस्टनचं स्पेस सेंटर. आमच्या घरुन १ तासाच्या ड्राइव्ह वर आहे ते सेंटर. सकाळी बरोबर १० वाजेपर्यंत निघुन ११ पर्यंत पोहोचायचा प्लॅन होता. आमच्या गाडीत आमच्याकडचे पाहुणे तर छाया फ़ातर्पेकर हिच्या गाडीत विजय काका, गिरिजा ताई आणि पूर्णिमा येणार होते. दिलीप काका अनेक वेळा अमेरिकेत येत असतात, तेव्हा असंच केव्हातरी मागच्या दौरयावर असताना त्यांनी नासा बघितलं होतं. ते आदल्या दिवशी त्यांच्या मित्राकडे क्लिअरलेकला गेले होते. क्लिअरलेक हे नासा च्या जवळ असल्याने येताना छाया त्यांना घेवून येणार होती. असा सगळा दिवसभराचा प्लॅन होता.
दिप्तीच्या किचन श्येड्युल प्रमाणे दमदार थालीपीठं खाऊन आम्ही निघालो. आयुष ला उशीरा शाळेत सोडुन आम्ही नासा च्या वाटेवर लागलो. वीकडे असल्याने आम्हाला एच.ओ.व्ही. स्पेशल फ़ास्ट लेन चा वापर करता येणार होता. एच.ओ.व्ही. म्हणजे हाय ऑक्युपन्सी व्हेइकल, म्हणजेच २ किंवा २ पेक्षा जास्त लोक गाडीत असतील तर ती लेन वापरता येते. त्या लेनमध्ये शिरल्यावर आजुबाजुचं तुंबलेलं ट्राफ़िक बघायला मज्जा येत होती सगळ्यांना. ११:१५ च्या सुमारास आम्ही नासा च्या प्रवेशद्वारापाशी आलो. नासा चा प्रचंड मोठ्ठा पार्कींग लॉट बघुन सगळ्यांना तो दादरच्या शिवाजी पार्काएव्हढा वाटला होता. आम्ही गेटवर फ़ोटो काढतच होतो तेव्हढ्यात छायाची गाडी आली. सगळ्यांची जमवाजमव झाल्यावर आम्ही तिकीटं काढुन आत शिरलो. मी ह्या अगोदर २ वेळा नासा बघितल्याने मी त्यांचा गाइड होतो.
सुरुवातीलाच ट्राम-टुर पूर्ण करायचं आम्ही ठरवलं. त्याआधी तिकडे १ ग्रुप फ़ोटो काढुन घेतला. ट्राम आल्यावर पहिल्यांदा आम्ही अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ़िसला गेलो. तिकडे अर्ध्या तासाची माहिती होती. बिच्चारया पाहुण्यांना त्यातलं एक तरी अक्षर कळालं असेल की नाही कुणास ठाउक. त्यांना इंग्लीश येत नव्हतं हा भाग नव्हता तर इथले अ‍ॅक्सेंट्स आणि इथला बोलायचा स्पीड, त्यामुळे त्यांना वाक्य पटापट पकडणं अवघड जात होतं. तिथुन आम्ही पुन्हा ट्राम मध्ये आलो. ट्राममध्ये बसल्यावर ह्या सगळ्यांच्या चेहरयावरचे भाव एव्हढे केविलवाणे होते. त्यांना तो पर्यंत अंदाज आला होता की आज आपला अण्णा होणार आहे दिवसभर. हे दिप्तीने त्यांच्या चेहरयावर वाचलं होतं आणि मग तीही टेंशन मध्ये आली. ह्या पाहुण्यांना दिवसभर एंटरटेन करणं ही आमची जबाबदारी असल्याने तिला टेंशन आलं होतं. ती लगेच दुसरे नासा व्यतीरिक्त ऑप्शन्स विचार करायला लागली. अचानक दुसरा प्लॅन करणं प्रॅक्टीकल नसल्याने सगळ्यांनी तिला असं भासवलं की खरंच छान आहे सगळं. तिथुन आम्ही एका डमी ठेवलेलं स्पेस शटल बघायला गेलो. ते अतिभव्य शटल बघुन जरा पाहुणे खुश झाले. अनेक प्रकारचे फ़ोटोज निघाले तिकडे. तिथुन मग आम्ही टर्मिनलला आलो. ह्या सगळ्यात विजय काका मात्र सतत आपलं ज्ञान दानाचं पवित्र काम करतच होते. अखंड वेळ त्यांना जी काही वेगवेगळी माहिती होती ती ते आम्हा सगळ्यांना पुरवत होते. सकाळपासुन अद्वैतला सिगारेट प्यायची संधी न मिळाल्यामुळे तो वैतागला होता. टर्मिनलला येताना स्मोकींग झोन चा बोर्ड त्याच्या नजरेने वेधला आणि त्याने गाडीतुन उडी मारुन आधी झुरके मारत तृप्त झाला. चेहरा त्याचा हळु हळु खुलायला लागला.
१ वाजला होता. आम्ही सगळे कॅंटीनकडे वळलो. मनसोक्त जेवलो आणि पुढच्या शो साठी निघालो. शो ची सुरुवात छान झाली पण मग मोठ्ठ्या ऑडिटोरियम मध्ये दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास थियरी लेक्चर पचवणं महाकाय गोष्ट होती पाहुण्यांसाठी. मी एक एक करुन सगळ्यांकडे नजर फ़िरवत होतो. सगळे वेगवेगळ्या रांगेत बसले होते. किशोर आणि प्रकाश माझ्याकडे सॉलिड रागाने बघत होते. गिरिजा ताई त्या एअर-कंडीशन मध्ये डुलकी काढत होत्या. विजय काका, पूर्णिमा जांभई देत होते. अद्वैत जेवण अंगावर आल्यावर कसे बधीर होतात तसा दिसत होता. एखाद्या नव्या खेळाडुला शोएब अख्तर चे बाउंसर्स फ़ेस करायला लागले तर कसं वाटेल अशी बिच्चारी पाहुण्यांची अवस्था झाली होती. अखेरीस २-३ तासासारखा वाटणारा तो अर्धा तास संपला आणि सगळे आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्या पडल्या किशोर आणि प्रकाशनी मला पकडलं आणि म्हणाले "असेच जर इकडे अजुन काही शोज असतील तर आज रात्री घरी गेल्यावर तुला चादरीत घालुन भरपुर चोपुन काढु." ते ऐकून मला एव्हढं हसु आलं होतं आणि मी आश्वासन दिलं की ह्या पुढे चांगले शोज आहेत. मला तेव्हा माझ्या कॉलेजच्या मित्रांची आठवण झाली.
दिप्ती बाहेर आदिशला प्ले एरियामध्ये खेळवत होती. वास्तविकत: मागील दोन्ही वेळेस आम्ही वीकेंडला गेलो असल्याने खुप मज्जा आली होती, पण हा वीकडे असल्याने तेव्हढी मज्जा करता नाही आली. त्यानंतर मी आदिशकडे वळलो आणि दिप्तीला पुढचा शो त्यांच्याबरोबर बघायला पाठवलं. नेमका आमच्या दुर्दैवाने तोही शो बोअरच होता. पाहुण्यांचा आमच्यावरचा पूर्ण विश्वास उडाला होता असं सारखं आम्हाला वाटत होतं. मध्ये मध्ये आम्ही कसं वाटतंय वगैरे विचारत होतो आणि ते देखील चांगलं आहे असं देखल्या देवा सांगत होते. सगळेच नाटक फ़िल्ड मधले असल्यामुळे शाब्दिक कोटया करत होते. म्हणत होते की हे नासा नाही नासाडी आहे. ४ वाजायाला आले होते. पाहुणे अगदीच निराश झाले होते. आता आम्ही तरी काय करणार? तेव्हा आम्हाला असं वाटलं की खरंच ह्युस्टन किती रुक्ष आहे. काही असं विशेष नाही फ़िरायला. झु, अ‍ॅक्वेरियम, पार्क्स या गोष्टी सगळीकडे कॉमनच असतात. खरंतर त्यांना सॅन-अ‍ॅंटोनिओला जायचं होतं, पण वीकडे असल्याने ते प्रॅक्टीकल नव्हतं. ४-४:३० पर्यंत छायाला दिलीप काकांना घ्यायला जायचं होतं. दिप्तीला तेव्हढ्यात आयडिया सुचली आणि ती म्हणाली की ती, आदिश आणि छाया दिलीप काकांना घेवून राम कडे जातील आणि मी सगळ्यांना वॉटर-वॉल दाखवायला घेवून जावं. पाहुण्यांना काहीतरी विशेष, म्हणजे आता त्यातल्या त्यात, बघायचं होतं. आम्ही लगेच निर्णय घेतला, कारण कोणाला माहीत जर ह्यांना वॉटर-वॉल आवडलं तर उरलेला दिवस चांगला जाणार होता. लगेच गाडी फ़िरवली वॉटर-वॉलच्या दिशेने. १ तासात आम्ही तिकडे पोहोचलो. मी सगळ्यांना त्या तिथे उतरवून शिस्तीत गॅलरीया मॉलच्या पार्कींग लॉटमध्ये गाडी पार्क करुन आलो. कारण तिथुन नंतर मॉल करणं होतंच. ते १ पॅकेजच आहे असंच समजा हवं तर. सगळ्यांना वॉटर-वॉल आवडलं होतं. मला एकदम नासा चं पाप त्या वॉटर-वॉल च्या पाण्यात धुवुन निघाल्याचा आनंद झाला होता. मग अपेक्षेप्रमाणे फ़ेसबुक प्रोफ़ाइल फ़ोटोज तिकडे काढले गेले. विजय काका मग मुद्दामहुन बाकीच्यांना चिडवायला माझ्या जवळ येवून विचारु लागले, "काय रे, नायगारा फ़ॉल्स आणि ह्यात जास्त काही फ़रक नाही ना रे?, नाही म्हणजे आता नायगारा ट्रीप रद्द केली तरी काही हरकत नाही. काय?" मला लगेच त्यांचा खेचण्याचा वास आला मग मी पण त्यांना सामील होत म्हणालो की, "नायगारापेक्षा हे सुंदर आहे." ते हसायला लागले.
तिथुन मग आम्ही सगळे चालत चालत गॅलरीया मॉल मध्ये घुसलो. दोन बायकांना आत शिरल्या शिरल्या शॉपींगचा वास आल्याने त्या अति खुश झाल्या. मग पुन्हा सगळे परतायची जागा आणि वेळ ठरवून वेगवेगळ्या दिशांना विखुरले. कोणी सोनी मध्ये, कोणी बेड-बाथ-बियॉंड तर कोणी लेदरच्या ब्रॅंडेड दुकानात होते.
१ तासाने सगळे एकत्र भेटलो आणि राम कडे यायला निघालो. सगळे खुपच दमले होतो. माझ्या मनाला थोडंसं समाधान मिळालं होतं त्यांना वॉल आणि मॉल दाखवून. पण नासाडी काही ते आयुष्यात विसरणार नव्हते.
तिकडे योगायोगाने दिप्तीला गाडीत दिलीप काकांशी मनसोक्त भरपूर गप्पा मारायला मिळाल्या, त्यामुळे तीही खुपच खुश होती. त्यांच्या घशावर खुप ताण पडला आहे असंही ते म्हणाले. दिप्तीने त्यांना जेष्टीमध आणि मधाचं चाटण करुन देते असं सांगितलं.
अखेर आमच्या दोघांच्याही गाड्या अगदी थोड्या वेळेच्या फ़रकाने राम कडे पोहोचल्या तेव्हा ७ वाजले होते. आम्ही लगेच आमच्या घरचे पाहुणे गाडीत भरुन घरी यायला निघालो. २-३ दिवसांत बरयाच गोष्टी पार पाडल्या होत्या, १ गोष्ट राहिली ती म्हणजे स्विमींग. मग काय घरी ७:३० पर्यंत पोहोचलो आणि पाहुणे सगळे कपडे घेवून स्विमींग पुलवर पळाले, आयुषही होताच त्यांच्याबरोबर. मी थोड्या वेळाने आदिशला घेवून गेलो. पाहुण्यांनी डुंबण्याची खुप मज्जा घेतली. अपार्टमेंटमधलं स्विमींग पुल सुद्धा त्यांना मुंबईतल्या एखाद्या तारांकित हॉटेल सारखं वाटत होतं. स्वच्छ पाणी, आर्टिफ़िशल धबधबा अजुन काय पाहिजे? अर्ध्या पाउण तासाने आम्ही जेवायला घरी परतलो. त्या रात्री सगळं जेवण आमच्याच बिल्डींगमध्ये राहणारया सुहास देशपांडेच्या घरुन येणार होतं. काळी दाल, टोमॅटो-कांदा-बटाट्याचा रस्सा असा बेत होता. सोबत तिखट चटणी होती. मग काय़ पाहुण्यांची पुन्हा मज्जाच होती खाण्याची.
जेवण झाल्यावर दिप्तीने सगळ्यांना ताकीद दिली होती की आज रात्री उशीरापर्यंत तिला गप्पा मारायच्या आहेत तेव्हा कोणी सबबी सांगायच्या नाहीत. मुलांना झोपवून दिप्ती आमच्याबरोबर गप्पा मारायला आली. त्यांना आमच्याकडुन काहीतरी भेटवस्तु म्हणुन मी लपुन छपुन मॉलमधुन काही एअर-फ़्रेशनर्स आणले होते ते दिले. सगळे एकदम सेंटी झाले २ मि. करता. किशोर आणि प्रकाश त्या आधीच आमच्यासाठी किशा आणि पका भाऊ झाले होते. त्यानंतर आम्ही तब्बल २ २ १/२ तास गप्पा मारल्या. गप्पांमध्ये साहजिकच नाटक, सिरियल्स हा विषय होता. त्या तिघांनी मुंबईत नाटक फ़िल्डमधले अपडेट्स दिले. धम्माल किस्से सांगितले, सुयोग च्या सुधीर भटांचे, संजय मोने, कुशल बद्रीके, प्रशांत दामले, मंगेश कदम, अमिता खोपकर असे अनेक जणांचे किस्से सांगितले.
शेवटी अगदी हसुन हसुन दमलो आणि दुसरया दिवशीच्या त्यांच्या प्रवासाचा विचार करुन आम्ही झोपायला गेलो.

२ मे २०१२, बुधवार.

सकाळी आम्ही जरा लवकरच उठलो. सगळ्यांना उठवलं. श्येड्युलमध्ये उपमा होता नाश्त्याला. १०:३० ला एअरपोर्टला पोहोचणं भाग होतं. सगळ्यांचा निरोप घेताना खुप जड जात होतं. आत्तापर्यंत ते आमचे नातेवाईक होवून गेले होते, कारण नातेवाईक बरयाच दिवसांनी परतताना जसा त्रास होतो तसाच त्रास होत होता. एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या, फ़ोन नंबर्स एक्स्चेंज झाले, फ़ोनवरुन टच मध्ये राहायचंय अशी आश्वासनं झाली. किशा भाऊ तर आपणहुन सकाळी उठुन आदिशच्या बेडजवळ गेला होता. ते सगळे आदिशला खुप मिस करणार होते. आदिश खुपच लाघवी आहे. त्या सगळ्यांची एव्हढी गट्टी जमली होती आदिशबरोबर की गेल्या ३-४ दिवसांत ते आदिशचे काही कॉपीराइट्स असलेले शब्द म्हणायला लागले होते. उदाहरणार्थ वाया (वारा), आईट (लाईट), चब्बा (संपलं) वगैरे वगैरे. आयुषला शाळेत सोडलं. त्यालाही खुप जड जात होतं, पण तो जास्त एक्सप्रेस करत नाही. तो सकाळपासुन विचारत होता की तो संध्याकाळी घरी येईल तेव्हा हे कोणी नसतील का? सगळ्यांनाच जड होत होतं.
एअरपोर्टला जायला निघालो आणि अगदी वेळेतच आम्ही पोहोचलो. थोड्यावेळाने सगळे आपापल्या होस्ट च्या गाड्यांमधुन पोहोचले. मग पुन्हा तिकडे एकदा रडारडीचा एक अगदी छोटासा कार्यक्रम पार पडला. दिप्तीला खुपच जड गेलं, ती खुपच हळवी आहे मनाने. ह्या सगळ्यांशी आम्ही एक अतुट नातं बांधलं होतं त्या ५ दिवसांत. दिलीप काकांनी तर दिप्तीला शब्द ही दिला की पुढच्या वेळेला मी तुझ्याकडे राहीन म्हणुन. खुप भरुन पावल्यासारखं वाटलं तेव्हा. त्यांनी आपलं सहज विचारलं दिप्तीला त्या चाटणाबद्दल, त्यांना वाटलं विसरली असेल ह्या गडबडीत, पण दिप्तीने ते बॅगेतुन काढुन दिल्यावर ते थक्कच झाले. थोड्यावेळाने जितु देखील त्याच्या भावाबरोबर पोहोचला, मग त्याची सगळे खेचायला लागले.
आणि अचानक एकमेकांना अनेक बाय बाय करत सुयोग ची "वा गुरु" ची टीम अदृश्य झाली.

Impressum

Tag der Veröffentlichung: 04.06.2012

Alle Rechte vorbehalten

Nächste Seite
Seite 1 /